पी.व्ही. सिंधूची सुवर्ण कामगिरी

25 Aug 2019 20:24:34


वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये विजेतेपद पटकविणारी पहिली भारतीय बॅडमिंटनपटू

स्वित्झर्लंड: भारताची जागतिक बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू हिने सुवर्ण पदक जिंकत इतिहास रचला आहे. सिंधूने वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिपचा अंतिम सामना जिंकत बॅडमिंटन स्पर्धेतील महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले. ही कामगिरी करणारी सिंधू पहिली भारतीय बॅडमिंटनपटू ठरली. रविवारी झालेल्या अंतिम फेरीत सिंधूची लढत जपानच्या नोजोमी ओकुहारा हिच्याशी झाली. सिंधूने ओकुहाराचा २१-७, २१-७ असा सरळ सेटमध्ये पराभव केला. सिंधूने सेमीफायनलमध्ये चीनच्या चेन यू फेईला २१-७, २१-१४ असे पराभूत केले होते. सिंधूने हा सामना केवळ ४० मिनिटातच संपवला होता. यापूर्वी भारताकडून जागतिक पातळीवर पुरुष किंवा महिला अशा कोणत्याही गटाने हि ऐतिहासिक कामगिरी केलेली नाही, त्यामुळे सिंधू हि कामगिरी करणारी पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली.

 

सिंधू सलग तिसऱ्यांदा या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहोचली होती. परंतु मागील दोनवेळा विश्वविजेता होण्यापासून थोडक्यात चुकलेल्या सिंधूने यंदा मात्र या सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. भारताने आत्तापर्यंत जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत ३ रौप्य व ६ कांस्यपदकांसह एकूण ९ पदकांची कमाई केली आहे. त्यामधली प्रत्येकी २ पदके हि सिंधुनेच जिंकलेली आहेत. तिच्या या कामगिरीबद्दल पंतप्रधान मोदींनी ट्विटरवर तिचे कौतुक केले आहे. देशभरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
 
Powered By Sangraha 9.0