फ्रान्स संबंधांचे नाशिक कनेक्शन

    दिनांक  25-Aug-2019 19:10:14   
 
 
युरोपीयन युनियनच्या ‘इरासमुस’ कार्यक्रमांतर्गत फ्रेंच शिष्टमंडळाचा भारत दौरा प्रायोजित करण्यात आला होता. या मंडळांच्या माध्यमाने शैक्षणिक, सांस्कृतिक देवाण-घेवाण यासोबतच समाजकार्याचेही आयोजन करण्यात आले असल्याने हा दौरा एक विशेष बाब म्हणून ओळखला गेला.
 
 
नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या फ्रान्स दौर्यावत भारताच्या बदललेल्या स्थितीची मांडणी केली. एखाद्या देशाशी संबंध प्रगल्भ होणे किंवा नव्याने संबंध प्रस्थापित होणे यांचे धोरण जरी देशोदेशींच्या राजधानीतून स्पष्ट होत असले तरी, देशातील शहरेदेखील या प्रक्रियेत मोलाचे योगदान देत असतात. राजधानी जरी देशाचे हृदय असली तरी, देशातील इतर शहरेदेखील महत्त्वाची अंगे असतात. याच तत्त्वानुसार भारत आणि फ्रान्स या देशांच्या संबंधांनादेखील नाशिक कनेक्शनची जोड प्राप्त होत आहे. भारत-फ्रान्स-युरोप सांस्कृतिक मंडळ आणि विश्व शैक्षणिक-सांस्कृतिक केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने फ्रान्सच्या आमसेद सॉलिडॅरिटी अॅण्ड डेव्हलपमेंट सेंटर या संस्थेच्या सहा फ्रेंच स्वयंसेविकांच्या शिष्टमंडळाने नुकतीच नाशिकला भेट दिली. नाशिकच्या जिल्हाधिकार्यांयनी यावेळी त्यांचे स्वागत केले. या शिष्टमंडळात पाऊलिन होल्झाऊसर, एलिन हेन्रीश, एलोडी फुश, सलोमे बाले, लिडिया कीशो आणि सोनिया दगृत या फ्रेंच नागरिकांचा समावेश होता. यावेळी त्यांनी नाशिक आधाराश्रमातील सेवाकार्यात आपले योगदान दिले. या शिष्टमंडळाचा उद्देश नाशिक शहर व परिसरातील अनाथ, वृद्ध, अंध, दिव्यांग, मतिमंदांसाठी सेवाकार्य करणे, वैद्यकीय, क्रीडा, सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्राचा अभ्यास करणे, मानवाधिकारासंबंधी अभ्यास करणे, हा होता. याव्यतिरिक्त मंडळाच्या सदस्यांनी भारतीय कुटुंंबात वास्तव्य करून भारतीय जीवनाचा अनुभव घेतला. भारतीय खान-पान, सण-उत्सव, संस्कृती, कला, शिक्षण यांचाही अनुभव घेतला. भारतातील सुप्रसिद्ध अशा योगाचा अभ्यासदेखील त्यांनी यावेळी केला. याशिवाय आयुर्वेदिक जीवन शैली हर्बल फार्महाऊसद्वारे त्यांनी जाणून घेतली. यावेळी त्यांनी नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात वास्तव्य करत भारतीय ग्रामीण जीवनदेखील अभ्यासले.
 
भारत दौऱ्यासाठी फ्रान्स येथील भारतीय दूतावास, भारतातील फ्रेंच वाणिज्य दूतावास आणि राजदूतावास, भारतासोबत कार्य करणार्या फ्रेंच आणि युरोपियन संस्थांचे सहकार्य त्यांना लाभले. युरोपीयन युनियनच्या ‘इरासमुस’ कार्यक्रमांतर्गत फ्रेंच शिष्टमंडळाचा हा भारत दौरा प्रायोजित करण्यात आला होता. या मंडळांच्या माध्यमाने शैक्षणिक, सांस्कृतिक देवाण-घेवाण यासोबतच समाजकार्याचेही आयोजन करण्यात आले असल्याने हा दौरा एक विशेष बाब म्हणून ओळखला गेला. अत्यंत उत्साही आणि प्रभावी व्यक्तिमत्त्वाचे धनी असलेल्या फ्रेंच नागरिकांसमवेत असणारा हा दौरा विज्ञान-तंत्रज्ञानासोबतच संस्कृती व समाजाबाबतची जाणीव आणि मानवतावादी फ्रेंच नागरिकांसोबत सोहार्दाचे नाते निर्माण करण्यात उत्तेजन देणारा ठरेल, अशी प्रतिक्रिया यावेळी उमटली. यावेळी फ्रेंच गटाच्या वतीने प्रमुख लिडिया किशो यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्या म्हणाल्या की, “आमच्या आमसेद सॉलीडॅरिटी सेंटरमार्फत अनेक आंतरराष्ट्रीय उपक्रम आयोजिले जातात. त्यातील समाजकार्याच्या उपक्रमांसाठी आम्ही नाशिकच्या भारत-फ्रान्स-युरोप मंडळांची आग्रहाने निवड केली. कारण ही मंडळे युरोपात शिक्षण, सांस्कृतिक, सामाजिक, कृषी, औद्योगिक क्षेत्रात सुप्रसिद्ध आहेत. भारत-फ्रान्स संबंध पूर्वीपासूनच आहेत. सध्या ते आधिकाधिक दृढ होत आहेत.” यातून फ्रान्सचा भारताप्रती असणारा प्रगल्भ दृष्टिकोन समजण्यास नक्कीच मदत होते. जगाच्या पाठीवर अनेक युरोपियन राष्ट्रे असताना सर्वसमावेशक असा विचार करून आंतरराष्ट्रीय संबंधांना वेगळा आयाम देण्याचा भारताचा यातून प्रयत्न असल्याचे द्योतक म्हणजे मोदी यांचा फ्रान्स दौरा, असे वर्णन या सर्व पार्श्वभूमीवर करावेसे वाटते. देशाच्या परराष्ट्र धोरणात राजधानी नक्कीच महत्त्वाची भूमिका निभावत असते. मात्र, देशातील इतर शहरांचे परदेशाशी असणारे कनेक्शनदेखील जागतिक पटलावर महत्त्वाचे ठरते. फ्रान्स शिष्टमंडळाचा नाशिक दौरा हा मानवता आणि सेवाभाव यांच्यात बंध निर्माण करणारा ठरला आहे. राजकारणाच्या पलीकडे जात आणि राजकीय मुत्सद्देगिरीच्या पल्याडदेखील मानवता धर्म जोपासला तर जागतिक पटलावर दोन देशांत चिरकाल टिकणारे संबंध निर्माण होऊ शकतात. याचीच मुहूर्तमेढ फ्रान्स आणि नाशिक कनेक्शनच्या माध्यमातून रोवली गेली आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.