केसरी टिळक

    दिनांक  25-Aug-2019 18:19:46
 
लोकमान्यांचे विचार पूजणार्‍या शेठच्या वडिलांनी याचं नाव ’केसरी’ असं ठेवलं खरं, पण तस्करी केलेल्या ’केसर’प्रमाणे यातही ‘केसर’च्या जागी लाकडाचा भुगाच जास्त. वाचनाची आवड एवढाच काय तो ’केसर’चा अंश. वडिलांची पेन्शन आली की अर्धी आईच्या हातात देऊन अर्धी स्वतःकडे ठेवत साहेब मुशाफिरी करायला मोकळे. केसरीशेठचा जीवनपट लोकमान्यांनी बघितला, तर त्या स्वातंत्र्य सिंहालासुद्धा घाम फुटला असता कदाचित.
 
 
 
गेल्या वर्षीची गोष्ट. गणेशोत्सवाचे दिवस सुरू होते. दुपारच्या वेळी गणपतीच्या मंडपात बसायला कोणी नसतं म्हणून मी आणि माझा मित्र ती जबाबदारी निभावत होतो. समोरच्या चहावाल्याकडून दोन कटिंग मागवले. बाहेर हलका पाऊस सुरू होता. असा काहीसा मस्ताना मौसम असताना मंडपात एक इसम आला. आपली छत्री बंद करण्याच्या लगबगीत तो चपला आतपर्यंत घालून आला होता. ’‘केसरीशेठ चपला तरी काढा,” असं म्हणताच त्वरेनं बाहेर जाऊन चपला काढून तो परत आत आला. केसरी टिळक! काय गंमत आहे पाहा. या दोन शब्दांचा काडीमात्र प्रभाव या माणसावर कुठ्याच स्वरूपात नव्हता. ‘अजागळ’ या शब्दाला अगदी पुरून उरेल असं व्यक्तिमत्त्व. डोक्यावर सतत असलेली झोपण्यापुरती काढून ठेवलेली टोपी. एक साईज जास्तच असलेला अघळपघळ शर्ट, त्याला शोभणारी ढगळ पॅण्ट, पायात आपण सहसा चाळीतल्या नळावर घालून जातो त्या चपला आणि त्याच्या ओंगळवाणी अवताराला साजेसा चष्मा. हातात न चुकता एक वर्तमानपत्र असे हे विशेष! तेवढाच काय तो टिळकांचा प्रभाव या माणसावर. “काय केसरीशेठ कुठंवर दौरा? आमच्या मंडळाचा गणपती बघायला आलात. भाग्य उजळलं आमचं. पेटी जास्त जमणार वाटतं यावर्षी,” आम्ही दोघंही हसलो. केसरीनेसुद्धा “काय च्यायला थट्टा करता तुम्ही मालक लोक” असं म्हणून हसून घेतलं. “शेठ काय मग आज कुठचा सिनेमा?” असं मधूनच माझ्या मित्राने विचारलं...
 
मला प्रश्नाचा रोख न कळुन मी “म्हणजे?” विचारता, “अरे शेठ दररोज एक मेटिनी शो बघतात. दादरला ठरलेलं थेटर आहे शेठचं. काय शेठ?” यावर उसन्या विनयाने ’‘काय आता बघतो तसा रोज. तेवढाच विरंगुळा” या इसमाने ‘विरंगुळा’ हा शब्द जणू असा काही वापरला की, हा दिवसाला बारा-बारा तास काम करीत असेल. वास्तविक पाहता या महारथी माणसानेआजवर म्हणजे वयाची चाळीशी उलटेपर्यंत नोकरी म्हणून कधी केली नव्हती. दररोज सकाळी उठणार आणि दादरच्याच एका ठरलेल्या गार्डनमध्ये जाऊन बसणार. जागाही ठरलेली. तिथे मग सार्वजनिक वाचनालयातून आणलेल्या कादंबरीचा फडशा पाडत तास दोन तास वेळ घालवणार. ते झालं की मग थिएटरला जाऊन जो लागला असेल तो चित्रपट अगदी २५ वेळा का होईना, पण बघणार. मागच्या दाराने सवलतीच्या दरात हे विशेष. मग संध्याकाळ होईपर्यंत मुंबईतील रस्ते ‘बेस्ट’च्या पासवर फिरणार की रात्री शेठचा दिवस संपला. खरं म्हणजे, केसरी शेठचे वडील शास्त्रज्ञ. लोकमान्यांचे विचार पूजणार्‍या शेठच्या वडिलांनी याचं नाव ’केसरी’ असं ठेवलं खरं, पण तस्करी केलेल्या ’केसर’प्रमाणे यातही ‘केसर’च्या जागी लाकडाचा भुगाच जास्त. वाचनाची आवड एवढाच काय तो ’केसर’चा अंश. वडिलांची पेन्शन आली की अर्धी आईच्या हातात देऊन अर्धी स्वतःकडे ठेवत साहेब मुशाफिरी करायला मोकळे. केसरीशेठचा जीवनपट लोकमान्यांनी बघितला, तर त्या स्वातंत्र्य सिंहालासुद्धा घाम फुटला असता कदाचित. असो. मंडपात केलेला देखावा निरखत असल्याचा आविर्भाव आणत ’छान जमलंय’ असा एक गौरवोद्गार शेठच्या तोंडून आला. ’शेठ काय चहा वगैरे पिणार का तर मागवतो समोरून?’ पुढ्यात ठेवलेले कटिंग चहाचे रिकामे पेले केसरी पाहत असल्याचे जाणवून मित्राने विचारले. “हा आता पिऊ थोडा थोडा” असं म्हणून अगदी कुठलाही शिष्टाचाराचा आढेवेढे न घेता त्याने संमती दिली. चहा आला, केसरी तो अगदी भुरके घेऊन पिऊलागला. तो ते करीत असताना माझं लक्ष एकंदरीतच त्याच्या व्यक्तिमत्त्वावर स्थिरावलं होतं. काय अजब रसायन होतं हे. वडील शास्त्रज्ञ. हा शास्त्रज्ञ नाही तर किमान काहीतरी शिकून आपला चरितार्थ चालेल अशा स्थितीत तरी असायला हवा होता. हे असं दररोजचं तसं काहीच न करण्याचं याचं वेळापत्रक कसं काय निभावून नेतो हा? बाप आणि मुलात एवढी तफावत! बरं आळसाचा किंवा काही न करण्याचाही कंटाळा येऊन कामाला लागलेले अनेक जण मी पाहिले होते. शेठ त्यातही मोडत नाहीत. पुस्तकं वाचणं, चित्रपट बघणं आणि ‘बेस्ट’ने फिरून मुंबईचे रस्ते अवलोकणं हा या माणसाच्या आयुष्याचा गेल्या २० वर्षांपासूनचा रतीब. वरवर आळशी, ओंगळवाणा वाटणारा हा माणूस नक्कीच आयुष्यात मागे कधीतरी मृगजळा मागे धावत एखाद्या खोल दरीत पडलेला असणार. ’का? कशासाठी?’ हे प्रश्न आता फोल आहेत. दरीमधील अंधाराचे वास्तव्य याला प्रिय झालं आहे, हे सत्य भयानक आहे आणि कदाचित त्याच काळोख्या दरीत हा केसरी टिळक काळाच्या पडद्याआड जाईल हे त्याहून विदारक!