चीनला व्यापारयुद्धातून उत्तर देण्याची गरज

    दिनांक  25-Aug-2019 16:51:36   


अवैध आयात व्यापार हा कडक निर्बंधाखाली आणला पाहिजे. अवैध व्यापारासाठी भारताच्या सीमा सील कराव्या लागतील. सरकारने वेळीच हालचाल केली तर हे संकट निश्चितपणे थोपवले जाऊ शकते यात काही शंका नाही. मात्र, त्यासाठी राष्ट्रीय कल्याणाची दुर्दम्य इच्छा आणि राजकीय इच्छाशक्ती असली पाहिजे. चीनवर बहिष्कार टाकून त्याच्याशी सर्व व्यवहार बंद केला पाहिजे. ‘स्वदेशी’चा शत्रू आणि ‘स्वदेशा’चा शत्रू यात काही भेद नाही!

 

कलम ३७०’ हटवल्यानंतर काश्मीर प्रश्नावर अगदी अपेक्षितपणे चीनने पाकिस्तानची बाजू उचलून धरली. हा विषय पाकिस्तानला संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा मंडळात नेण्यास चीनने मदतही केली. या विषयावर एकतर्फी निर्णय घेतल्याने स्थिती अत्यंत गुंतागुंतीची बनते, त्यामुळे असे निर्णय एकतर्फी घेतले जाऊ नयेत, असेही चीनने म्हटले आहे. लडाखला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्याच्या भारताच्या निर्णयाचा चीनने विरोध केला. चीनने म्हटले आहे की, भारत-चीनच्या पश्चिम सीमेवरील काही भूभाग आपला असल्याचा भारताचा दावा आम्हाला मान्य नाही. चीन हा पाकिस्तानचा सर्वात मोठा समर्थक आहे, हे या सगळ्या घटनाक्रमांवरुन पुन्हा एकदा स्पष्ट झाले. कारण, पाकिस्तानची मदत घेऊन चीनला भारताला दहशतवादामध्ये अडकवून आर्थिक प्रगतीपासून थांबायचे आहे. म्हणूनच पाकिस्तानला समर्थन दिल्यामुळे चीनला धडा शिकवणे गरजेचे आहे. त्यामध्ये आपल्या हातामध्ये असलेली असलेला एक हुकमी एक्का म्हणजे चीनचा भारताशी होणारा प्रचंड व्यापार. आपण चीनवर व्यापार अस्त्राचा वापर करून दबाव आणू शकतो. गेल्या पाच वर्षांपासून आपण चीनशी व्यापारी समतोल साधण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु, चीन लबाडी करून भारताला आयातीपेक्षा पाच पटीने जास्त वस्तू निर्यात करतो. आंतरराष्ट्रीय व्यापारी कायद्यामुळे आपल्याला चीनच्या आयातीवरती बंदी घालता येत नाही. म्हणून सामान्य नागरिकांनी चिनी वस्तूंवर बहिष्कार घालून चीनमधून होणारी विनाकारण आयात थांबवली व देशाला मदत केली पाहिजे. भारतीय सैनिक युद्धांसाठी सदैव सज्ज असतात. तसे आपणही चीनसोबतच्या या व्यापार युद्धासाठी सदैव तयार राहायला हवे.

 

सणांच्या सर्व वस्तूंमध्ये चिनी घुसखोरी

गेल्या काही दशकांपासून चिनी घुसखोरी ही फक्त सीमेपुरतीच मर्यादित नाही, तर त्यांनी भारतीय बाजारपेठाही काबीज करायला सुरुवात केली. सणातील व निवडणुकांनंतर फटाक्यांची मागणी लक्षात घेऊन चिनी फटाके मोठ्या प्रमाणावर भारतीय बाजारपेठांमध्ये विक्रीसाठी दाखल होत आहेत. भारतीय फटाक्यांच्या तुलनेत चिनी फटाके सुरक्षिततेच्या/पर्यावरणाच्या दृष्टीने अधिक धोकादायक आहेत. भारत हा सणांचा देश आहे. मागच्या वर्षी रक्षाबंधनाकरिता ७५ टक्के राख्या चिनी बनावटीच्या होत्या. गणेशमूर्तीच्या बाजारपेठेत चीनने घुसखोरी पूर्वीच केलेली आहे. मोठ्या प्रमाणात साजर्या केल्या जाणाऱ्या उत्सवांना हेरून आकाशकंदील, दिवे, विविध भेटवस्तूंनी भारतीय बाजारपेठ चीनने व्यापत आहे. मागच्या दिवाळीत चिनी विक्रेत्यांनी भारतीय बाजारपेठेत १८०० कोटी रुपयांचा नफा कमावला. फराळाचे पदार्थ वगळता दिवाळीच्या सर्व वस्तूंमध्ये चीनने घुसखोरी केली आहे. चिनी आकाश कंदिलांनी बाजारपेठेवर कब्जा केला आहे. चिनी तोरणांनी घर-बाजार सजतो. प्लास्टिकच्या दिव्यांच्या माळांना मोठी मागणी आहे. गणेशोत्सव, दिवाळी अशा सणांसाठी सजावटीचे साहित्य, पणत्या, आकाशकंदील, फटाके, शोभेच्या वस्तू, माळा या भारतीय कामगारांनी, बचत गटांनी तयार केलेल्याच घेण्याचा निश्चय करावा. भारत व चीन व्यापारात आपल्याला ५२.८ अब्ज डॉलर्सचा तोटा होतो. हा तोटा रुपयांमध्ये ३५६६ अब्ज रुपये दरवर्षी आपण चीनला भेट म्हणून देत असतो आणि याच पैशांचा वापर चीन आपल्याविरुद्ध करतो.

 

बेकायदेशीर आयातीमुळे फटाका उद्योग धोक्यात

चिनी बनावटीचे फटाके स्वस्त असल्याने भारतात चिनी बनावटीच्या फटाक्यांना अधिक मागणी असते. केंद्र सरकारने चिनी बनावटीच्या फटाक्यांवर बंदी घातली होती. समुद्रमार्गे बेकायदेशीररीत्या आयात होणाऱ्या या फटाक्यांमुळे फटाका उद्योग धोक्यात आला आहे. परदेशातून आयात केलेल्या फटाक्यांची किरकोळ बाजारात विक्री करणे बेकायदेशीर आहे. कायद्याचे उल्लंघन करून बाजारात फटाके विकताना कोणी आढळल्यास त्याविरुद्ध कारवाई होईल. यावर्षी याची काटेकोर अंमलबजावणी व्हावी. आपले फटाके गुणवत्ता आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने चिनी फटाक्यांपेक्षा निश्चित चांगले आहेत. चिनी फटाक्यांमध्ये ‘क्लोरेट’ या विषारी रसायनाचा वापर करण्यात येतो.एकूणच चिनी फटाके बनवताना हलक्या प्रतीचा व हानिकारक कच्चा माल वापरला जात असल्याने ते आपल्या फटाक्यांच्या तुलनेत स्वस्त आहेत. चिनी फटाके जास्त काळ टिकत नाहीत. त्या तुलनेत भारतीय फटाके वर्षभर टिकतात. मात्र, फटाका उद्योगाने आधुनिक बनण्याची गरज आहे, जेणेकरून भारतीय फटाके जागतिक उत्पादनांशी स्पर्धा करू शकतील. चिनी फटाके आपण टाळावेत. कारण, आपल्या फटाका उद्योगाचे हजारो कोटींचे नुकसान होते.
 
तस्करी रोखण्यात अपयश
 
परदेशातून येणाऱ्या कंटेनरची चौकशी करण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ नसल्याचे कस्टम विभागाचे रडगाणे असते. बंदरावर येणाऱ्या पाच-दहा टक्के कंटेनरची तपासणी केली जाते. मागे शिवाकाशीमध्ये चिनी फटाके जप्त करण्यात आले होते. हे फटाके तुतिकोरीनमधून मुंबईत नेले जात होते. दोन वर्षांपूर्वी नेपाळमधून देशात आलेले ६०० कंटेनर पकडण्यात आले होते. बहुतेक माल नेपाळमार्गे किंवा समुद्रमार्गे भारतात येतो. सध्या देशातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे मार्केट चीनने पूर्णपणे कॅप्चर केले आहे. मोठ्या शहरांपासून छोट्या गावापर्यंत चीनच्या वस्तूंना मोठ्या प्रमाणावर मागणी असते. या वस्तू आपल्या देशात तयार झालेल्या तशाच वस्तूच्या तुलनेत स्वस्त मिळतात, अनेकदा यात नावीन्यदेखील असल्याचे दिसते. भारतातील ग्राहकांची मानसिकता आपल्यापेक्षा चीननेच चांगली ओळखलेली दिसते. २०१९च्या निवडणुकांमध्ये अनेक ठिकाणी चिनी बनावटीच्या प्रचारसाहित्याला पसंती दिली होती. 
 
आता तरी देशी वस्तूच विकत घ्या!
 
चीनच्या ‘मेड इन चायना’ वस्तूंनी भारतात जम बसवला आहे. त्यांनी आतापर्यंत देशी बाजारपेठेतील २०-२५ टक्के वाटा पटकावला आहे. किंमती कमी असल्याने भारतीय विक्रेते व ग्राहकांची चिनी वस्तूंना पसंती लाभत आहे. भारतीय बाजारपेठेत मोबाईल, इलेक्ट्रॉनिक वस्तूंपासून देवांच्या तसबीरी ते पूजेच्या साहित्यापर्यंत चीनची घुसखोरी आहे. आपली बाजारपेठ चिनी वस्तूंनी ओसंडून वाहते आहे. टाचण्यांपासून, लहान मुलांच्या निरनिराळ्या प्रकारच्या खेळण्यांपर्यंत, वॉटर प्युरिफायर, गॅस गीझर, इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू, इलेक्ट्रिकच्या आकर्षक माळा, इलेक्ट्रिकच्या इस्त्रीसारख्या अनेक वस्तू अशा प्रकारच्या चिनी बनावटीच्या वस्तू कमी किंमतीत बाजारात सहज मिळतात.चीन खास भारताकरिता वस्तू बनवून आपल्या लहान, मध्यम उद्योगांना पद्धतशीरपणे बरबाद करत आहे हे आपण लक्षात का घेत नाही? खेळण्यांचे मार्केट ८० टक्के चिनी बनावटीच्या खेळण्यांनी भरले आहे. ‘सेंटर फॉर सायन्स अॅण्ड एन्व्हायर्न्मेंट’प्रमाणे चिनी बनावटीच्या ५७ टक्के खेळण्यांमध्ये प्रमाणाबाहेर विषारी रसायने आढळली होती. लहान मुलींच्या ज्वेलरीत शिसे वापरले जाते. त्यामुळे शरीराला धोका असतो. भारतात अशा खेळण्यांवर नियंत्रण ठेवणारी कुठलीही स्वतंत्र यंत्रणा नाही. पालकांनी एकत्र येऊन या खेळण्यांवर बंदी घालण्यासाठी दबाव आणला पाहिजे.

 

चीनच्या आर्थिक नाड्या आवळा
 
चिनी बनावटीचे स्मार्ट फोन नको. दिवाळीत होणारा चिनी फटाक्यांचा आवाज नको. चिनी माळांचा आणि दिव्यांचा लखलखाट नको. चिनी उत्पादने नकोत. असंख्य दर्जेदार अशा भारतीय कंपन्या आहेत. त्यांना आपण हात देऊ. मोठे करायचेच झाले तर आपल्या भारतीय उद्योजकांना मोठे करू. नागरिकांनी स्वयंखुषीने, स्वयंघोषित घातलेल्या आर्थिक निर्बंधानेच या आर्थिक दहशतवादावर विजय मिळवता येईल. चीनच्या अशा प्रकारे आर्थिक नाड्या आवळल्या तर त्यांना पाकिस्तानला मदत करण्याचे भरल्या पोटीचे निरुद्योग सुचणार नाहीत. अवैध आयात व्यापार हा कडक निर्बंधाखाली आणला पाहिजे. अवैध व्यापारासाठी भारताच्या सीमा सील कराव्या लागतील. सरकारने वेळीच हालचाल केली तर हे संकट निश्चितपणे थोपवले जाऊ शकते यात काही शंका नाही. मात्र, त्यासाठी राष्ट्रीय कल्याणाची दुर्दम्य इच्छा आणि राजकीय इच्छाशक्ती असली पाहिजे. चीनवर बहिष्कार टाकून त्याच्याशी सर्व व्यवहार बंद केला पाहिजे. 

 

‘स्वदेशी’चा शत्रू आणि ‘स्वदेशा’चा शत्रू यात काही भेद नाही!’

चीनच्या वस्तू सगळ्या नागरिकांना ओळखता आल्या पाहिजे. राष्ट्रभक्ती, राष्ट्रसेवा म्हणजे फक्त सीमेवर जाऊन लढणे एवढेच नव्हे, तर आपल्या भारतावर होणारे चीनचे आर्थिक आक्रमण रोखणे, आपल्या बेरोजगार होणाऱ्या बांधवांना अशा प्रकारे मदत करणे हीपण एक प्रकारे देशसेवाच आहे. आपण सर्वांनी या चीनच्या वस्तू न घेण्याचा संकल्प करूया व या राष्ट्रकार्यात सहभागी होऊया.