जेटलींच्या मुलाची पंतप्रधान मोदींना विनंती

24 Aug 2019 17:18:20


'देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी तुम्ही परदेशात, दौरा अर्धवट सोडू नका.'

नवी दिल्ल्ली: भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. वयाच्या ६६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दिल्लीतील एम्स रुग्णालयात गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. जेटलींना सॉफ्ट टिश्यू कॅन्सर होता. श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना ९ ऑगस्ट रोजी एम्समध्ये दाखल करण्यात आले. परंतु आज जेटलींनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने संपूर्ण देशभरातून शोक व्यक्त केला जात आहे. फ्रान्स दौऱ्यावर असल्याकारणाने पंतप्रधान मोदींनीही फोनवरून जेटलींच्या कुटुंबियांशी संपर्क साधला.

 

 
आपण खूप जवळचा मित्र गमावला असल्याची भावना मोदींनी यावेळी व्यक्त केली. त्यावेळी अरुण जेटली यांच्या कुटुंबीयांनी तुम्ही देशासाठी परदेशात गेले आहेत. त्यामुळे दौरा अर्धवट सोडून परत येऊ नये असे पंतप्रधान मोदींना सांगितले. जेटलींच्या निधनाचे वृत्त कळताच पंतप्रधान मोदींनी जेटली यांच्या कुटुंबियांशी फोनवरून संपर्क साधला. तुमच्या दुःखात सहभागी असल्याचे सांगत जेटली कुटुंबियांचे सांत्वन मोदींनी केले. परंतु यादरम्यान जेटली यांचा मुलगा रोहन याने,"तुम्ही देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी परदेशात गेला आहात. त्यामुळे शक्य असल्यास दौरा रद्द करू नका. देश हा सर्वात आधी येतो. त्यामुळे तुम्ही दौरा अर्धवट सोडू नका. अशी विनंती मोदींकडे केली.

 

 
मोदी २२ ऑगस्ट पासून परदेश दौऱ्यावर आहेत. २५ ते २६ ऑगस्टपर्यंत मोदी जी-७ परिषदेसाठी फ्रान्सच्या दौऱ्यावर असणार आहेत.याच परिषदेदरम्यान मोदी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचीही भेट घेणार आहेत. या वेळापत्रकात कोणताही बदल करण्यात येणार नसल्याचे पंतप्रधान कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.
Powered By Sangraha 9.0