नाशिकची सुरक्षा आता रामभरोसे

    दिनांक  23-Aug-2019 22:23:59   "प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिक नगरीत आपले सहर्ष स्वागत आहे," असे विधान नाशिकमध्ये आयोजित करण्यात आलेल्या प्रत्येक सांस्कृतिक कार्यक्रमात सूत्रसंचालकाच्या तोंडून ऐकावयास मिळते. किंबहुना, असे काही ऐकले नाही तर, कार्यक्रम नाशिकमध्येच होता किंवा नाही याबाबत मनात शंका उपस्थित होते. सांगण्यामागील उद्देश इतकाच आहे. प्रभू राम आणि नाशिक यांचे एक अतूट नाते आहे. सत्ययुग ते कलियुग अशा प्रत्येक युगात या नात्यात आणि भक्तीभावात कायमच वाढ झाली, हे विशेष. परंतु, धार्मिक नाशिक नगरी आता 'चोरभूमी' म्हणून आता ओळखली जाणार का, हाच मोठा प्रश्न मागील दोन दिवसांत सलग घडलेल्या घटनांवरून समोर येत आहे. येथील जेलरोड परिसरातील मंजुळा मंगल कार्यालयाजवळील स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम मशीन फोडून १३ लाख, ३० हजार, ५०० रुपयांची रोकड लंपास केली आणि लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे दि. २२ ऑगस्ट रोजी मखमलाबाद परिसरातील एसबीआयचे एटीएम चोरट्यांनी फोडून तेथून सुमारे ३० ते ३१ लाख रुपये चोरल्याची घटना घडली. म्हणजेच केवळ दोन दिवसांत नाशिकमधून ४० लाखांपेक्षा जास्त रक्कम लंपास झाली. आता यातील चोर नाशिकचेच आहेत की, कोठून बाहेरून आले हे तपासांती आणि आरोपी जेरबंद झाले की समोर येईलच. पण, येथे प्रश्न आहे तो, रामभूमीच्या कायदा आणि सुव्यवस्थेचा. नाशिक शहरात आज जवळपास प्रत्येक चौकात, गल्लीत जवळपास प्रत्येक बँकेचे एटीएम आपल्याला सहज पाहावयास मिळते. पण मिळत नाहीत ते तेवढे सुरक्षारक्षक. नाशिकमधील बहुतांश एटीएम मशीनला सुरक्षारक्षकच नसून त्या एटीएमची सुरक्षा ही देखील बँकांनी रामभरोसेच सोडली आहे. तसेच, पोलीस दलासाठी गस्ती घालताना क्यूआर कोड स्कॅनिंग अनिवार्य केले आहे. काही एटीएममध्येच हे कोड आहेत. तेथे जाऊन पोलिसांना ते स्कॅन करावे लागतात. तरीही एटीएम फोडले जातात, हे पाहून नाशिक नगरीची सुरक्षा आता रामभरोसेच असल्याचे खेदाने म्हणावे लागेल.

 

आकर्षक राम दरबार

 

प्रभू रामचंद्र यांच्या वनवासकालीन जीवनाचा नाशिकनगरीमधील तपोवन हा एक अविभाज्य भाग. पंचवटी आणि तपोवन या भागात प्रभू राम यांनी आपले वनवासकालीन जीवनमान व्यतीत केले. याच तपोवन परिसरात सुरेख असा राम दरबार साकारला जात आहे. प्रभू रामचंद्रांच्या दरबाराची साक्ष हा दरबार पाहिला असता प्राप्त होते. येथील गोदावरी कपिला संगमाच्या प्रवेशद्वारासमोर मानव उत्थान सेवा समितीच्या सर्व धर्म आश्रमांमध्ये हा दरबार उभारला जाणार आहे. नाशिकमध्ये येणारे देशातील आणि परदेशातील नागरिक तपोवनास आवर्जून भेट देत असतात. आता तेथे आकर्षणाचे नवे केंद्रबिदू विकसित झाल्याने स्वाभाविकच पर्यटन संख्येतदेखील वृद्धी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या दरबारात रामायणातील अनेक प्रसंग साकारण्यात आले आहेत. यात वनवासाला प्रस्थान करणारे प्रभू रामचंद्र, लक्ष्मण, माता सीता, रामांच्या पादुकांवर नतमस्तक झालेले भरत, सीता अपहरण प्रसंग, शूपर्णखेचे नाक कापण्याचा प्रसंग आदी फायबर कोटिंगच्या माध्यमातून साकारण्यात आले आहेत. अशाप्रकारे स्थापन केले जाणारे प्रसंग हे पर्यटकांना आणि समस्त मानवाला काही संदेश देण्यासाठी साकारले जात असतात. नाशिक नगरीत रामराज्य होते आणि ते पुन्हा उदयास यावे, हीच अपेक्षा बाळगून असे दरबार साकारले जात असतात. येथे साकारण्यात आलेल्या दरबाराच्या माध्यमातूनदेखील अशी अपेक्षा बाळगली गेली असल्याची शक्यता नाकारता येत नाही. तपोवनात केवळ वृक्ष आणि मंदिरे आपणास पाहावयास मिळतात. प्रभू रामांच्या जीवनात अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या तपोवनमध्ये खास पाहावे किंवा ज्यामुळे भावी पिढीला रामराज्य समजू शकेल, असे काही आजवर नव्हते. केवळ पुस्तके आणि संदर्भ ग्रंथ या माध्यमातून तपोवन म्हणजे नेमके काय, हे वाचले जात होते. मात्र, येथे साकारण्यात आलेला दरबारच्या माध्यमातून सचित्र आणि आखीवरेखीव अशा मूर्तीकलेच्या माध्यमातून प्रभू राम यांच्या जीवनातील प्रसंग रेखाटण्यात आले आहेत. त्यामुळे हा दरबार आगामी काळात भावी पिढीला रामायणाची महती विशद करण्यात नक्कीच मोलाची भूमिका बजावेल, याची खात्री वाटते.