डॉ. जेम्स लव्हलॉक-शतक पूर्ण, फलंदाजी चालू!

23 Aug 2019 22:46:15



गेली ७०-७२ वर्षे डॉ. जेम्स लव्हलॉक यांचे विज्ञानाच्या अनेक शाखांमधील संशोधन कार्य अविरत सुरूच आहे. १९७४ साली ब्रिटिश सरकारने त्यांची 'रॉयल सोसायटी'चे प्रमुख म्हणून नेमणूक केली. त्यानंतर ब्रिटनच्या वैज्ञानिक क्षेत्रात नव्या संशोधन प्रकल्पांचा अगदी पूरच आला. त्याचे प्रेरणास्थान होते, अर्थातच डॉ. लव्हलॉक.


परवा २६ जुलै, २०१९ रोजी डॉ. जेम्स लव्हलॉक यांनी वयाची शंभरी पूर्ण केली. त्यांची प्रकृती ठणठणीत आहे. त्यांनी भेटायला आलेल्या पत्रकारांशी छान गप्पा मारल्या. इतकेच नव्हे, तर ब्रायन अ‍ॅपलयॉर्ड या लेखक-पत्रकार मित्रासोबत लिहिलेल्या आपल्या 'नोव्हासीन' या ताज्या पुस्तकाची माहिती दिली. लव्हलॉक यांच्या मते, आता मानवी क्रियांचा, हालचालींचा परिणाम होऊन पृथ्वीवर काहीतरी असं घडून येण्याचा काळ संपला आहे. यालाच ते 'अ‍ॅन्थ्रोपोसीन' असं म्हणतात. आता येणारा काळ 'नोव्हासीन' असेल म्हणूनच वयाच्या शंभराव्या वर्षी लिहिलेल्या त्यांच्या नव्या पुस्तकाचे नाव आहे, 'नोव्हासीन दि कमिंग अ‍ॅन ऑफ हायपर इंटेलिसन्स' त्यात त्यांनी असं म्हटलंय की, लवकरच सायबोर्ग हे माणसाकडून पृथ्वीवरच्या एकंदर क्रियाकलापाचे नेतृत्व स्वत:च्या हाती घेतील. सायबोर्ग मानवाला आपली खेळणी किंवा पाळीव प्राणी किंवा संग्रहालयातील प्रेक्षणीय वस्तू बनवतील. कोण हे डॉ. लव्हलॉक आणि सायबोर्ग म्हणजे कोण? १९७४ ते १९८१ या काळात जगातल्या सर्व टेनिस स्पर्धा जिंकून सलग अकरा ग्रॅण्ड स्लॅम विजेतेपद पटकावणारा स्वीडनचा टेनिसपटू जॉन बोर्गचा हा मुलगा किंवा नातू तर नव्हे?

 

'सायबरनेटिक ऑर्गेनिझम' या शब्दाचे लघुरुप म्हणजे मराठीत 'शॉर्टफार्म' 'सायबोर्ग'. आपल्याला सहजपणे कळणाऱ्या साध्या भाषेत यंत्रमानव किंवा रोबो हा पूर्णपणे यांत्रिक असतो. सायबोर्ग हा त्यांच्या आणखी पुढची पायरी आहे. त्याच्यात मानवी जीव असतो. 'आर्टिफिशल इंटेलिलन्स' म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेखेरीज मानवी भावभावना, विचारशक्ती, विवेकशक्ती असते. अशा प्रकारच्या सायबोर्ग बनवण्याचे प्रयत्न जगभर अगदी कसून चालू आहेत. किंबहुना, वैज्ञानिक असा सायबोर्ग बनवण्याच्या अगदी उंबररठ्यावर येऊन ठेपले आहेत. आता डॉ. जेम्स लव्हलॉक कोण ते पाहा. डॉ.लव्हलॉक हे इंग्लडंमधल्या एका खेड्यातल्या अत्यंत गरीब घरात जन्मले. त्यांची आई लोणचं बनवणाऱ्या कारखान्यात कामगार होती आणि बाप पूर्ण निरक्षर असा शिकारी होता. डॉ. लव्हलॉक सांगतात, “कुटुंबासाठी माझ्या बापाने पडेल ते काम केले. तो निरक्षर होता. पण वन्यप्राणी, पक्षी, वनस्पती आणि निसर्ग यांच्याबद्दल त्याला अतिशय सूक्ष्मज्ञान होतं. वडिलांकडून मी ते आत्मसात केलं. स्वत: जेम्सलाही लहानपणी शाळेतल्या चाकोरीबद्ध अभ्यासक्रमाचा अतिशय कंटाळा येत असे. पण, शिकणं तर भागच होतं.” दिवसभर एका फोटोग्राफरच्या दुकानात काम करून, संध्याकाळी शाळा-महाविद्यालय करीत जेम्स लव्हलॉकने शिक्षणात मोठी भरारी मारली. मँचेस्टर विद्यापीठात नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ प्रा. अलेक्झांडर टॉड यांचा तो आवडता विद्यार्थी बनला. तेवढ्यात दुसरे महायुद्ध सुरू झाले. त्यावेळच्या सर्व तरुणांमध्ये जेम्स लव्हलॉकनेही सैन्यात भरती होण्यासाठी नाव नोंदवले, पण त्याला सैन्यात प्रवेश नाकारण्यात आला. कारण, देण्यात आले की, 'तू देशासाठी अत्यंत महत्त्वाचे संशोधन करीत आहेत, ते पूर्ण कर. सैन्यात भरती होण्याचे नंतर पाहू.' तोफेगोळे बॉम्ब किंवा अन्य स्फोटक द्रव्यांमुळे मानवी त्वचेवर ज्या भाजण्याच्या जखमा होतात, त्या कशा टाळता येतील किंवा लवकर बऱ्या करता येतील, यावरच त्याचे संशोधन सुरू होते. १९४८ साली जेम्स लव्हलॉकला त्याची पहिली 'डॉक्टरेट' पदवी मिळाली. तेव्हापासून गेली ७०-७२ वर्षे डॉ. जेम्स लव्हलॉक यांचे विज्ञानाच्या अनेक शाखांमधील संशोधन कार्य अविरत सुरूच आहे. १९७४ साली ब्रिटिश सरकारने त्यांची 'रॉयल सोसायटी'चे प्रमुख म्हणून नेमणूक केली. त्यानंतर ब्रिटनच्या वैज्ञानिक क्षेत्रात नव्या संशोधन प्रकल्पांचा अगदी पूरच आला. त्याचे प्रेरणास्थान होते, अर्थातच डॉ. लव्हलॉक. पण, त्यांचं फार महत्त्वपूर्ण संशोधन आणि त्यांनी प्रस्थापित केलेल्या 'गाया सिद्धांत' हा त्यापूर्वीच ख्यातनाम झाला होता. त्याचे असे झाले की, १९६१ साली अमेरिकेच्या 'नासा' या अंतराळ संशोधन संस्थेने डॉ. जेम्स लव्हलॉकना एक महत्त्वपूर्ण प्रकल्पावर काम करण्यासाठी पाचारण केले. पृथ्वीबाहेर अंतराळात अन्यत्र मानवसदृश जीवसृष्टी आहे का? हे शोधणे हे या प्रकल्पाचे उद्दिष्ट होते. हे काम करत असताना डॉ. लव्हलॉकना 'सीएफसी' वायूचा शोध लागला. पृथ्वीवर मानवाने वापरात आणलेल्या अनेक नव्या रसायनांमधून किंवा त्यांच्या वापरात आणलेल्या अनेक नव्या रसायनांमधून किंवा त्यांच्या वापरातून अनेक घातक वायू निर्माण होतात. हे पृथ्वीवरच्या मानवासह सगळ्याच जीवनसृष्टी अत्यंत विनाशकारी आहे. या वायूंना डॉ. लव्हलॉकनी नाव दिले 'क्लोरो फ्लेरो फ्लुरो कार्बन' वायू म्हणजेच सीएफसी वायू.

 

या शोधामुळे पाश्चिमात्य जगात सीएफसी निर्माण करणाऱ्या रसायनांवर बंदी घालण्यात आली. ज्यातून सीएफसी निर्माण होतो, अशा आपल्या रोजच्या वापरातल्या वस्तू म्हणजे फ्रीज आणि एसी मशीन (वातानुकूलित) पाश्चिमात्य व्यापारी कंपन्या भलत्याच हुशार! त्यांनी सीएफसी विरहित फ्रीज आणि एसी (वातानुकूलित यंत्रणा) बनवले आणि मग सीएफसीयुक्त फ्रीज, एसी मोडीत काढले की काय? छे! छे! त्यांनी जुने फ्रीज, एसी अत्यंत उदार मनाने तिसऱ्या जगातल्या गरीब देशांमधील (यात भारतही आलाच) बाजारपेठांमध्ये ढकलून दिले. म्हणजे बघा! आम्ही पर्यावरणाला अजिबात हानी पोहोचवत नाही, मग कोण पोहोचवतं? तर हे तिसऱ्या जगातील गरीब, अडाणी, मागास, काळे, देश! याला म्हणतात 'व्यापारी डोकं.' असो. या धंदेवाईक मनोवृत्तीला डॉ. लव्हलॉक काय करणार? अंतराळात जीवसृष्टी शोधताना डॉ. लव्हलॉक यांना एक वेगळीच गोष्ट आढळली. ती म्हणजे, आपल्या या पृथ्वी ग्रहाला तिचे म्हणून एक स्वतंत्र सजीव असं अस्तित्व आहे. सर्वसाधारणपणे आपण असे धरून चालतो की, आपली ही पृथ्वी म्हणजे दगड-धोंडे, माती, डोंगर, पर्वत, नद्या, वाळवंट, समुद्र या सगळ्या निर्जीव वस्तू आहेत आणि या निर्जीव वस्तूंवर आपण मानव, पशु-पक्षी, वनस्पती आदी सजीव वस्तू निवास करतो. डॉ. लव्हलॉकना असे आढळले की, आपण साऱ्या सजीवांसह या निर्जीव समजल्या जाणाऱ्या वस्तू म्हणजेच आपली ही पृथ्वी ही सजीव आहे. तिला तिचे म्हणून एक स्वतंत्र अस्तित्व आहे, चैतन्य आहे. ती सतत स्वतःमध्येबदल उत्क्रांती घडवून आणत असते. आपले हे निरीक्षण डॉ. लव्हलॉकनी एक शास्त्रीय सिद्धांत म्हणून मांडले. पाश्चिमात्य जगात कोणत्याही मांडणीला एकदम मान्यता मिळत नाही. आपल्याकडे एखाद्या भूकंप प्राध्यापकाला एकदम महान अर्थतज्ज्ञ वगैरे मानले जाते आणि त्याने केलेल्या. मांडणीला 'ब्रह्मवाक्य' मानले जाते. कारण, तो डाव्या विचारसणीचा असतो. तसं तिकडे चालत नाही. कितीही मोठा माणूस असो त्याने मांडलेल्या सिद्धांतावर अनेक लोक साधकबाधक विचार करतात. प्रत्यक्ष प्रयोग करतात. अनुभव घेतात आणि मग हळूहळू त्याच्या सिद्धांताला मान्यता मिळते. डॉ. लव्हलॉकनी १९७०च्या दशकात मांडलेल्या वरील पृथ्वीविषयक सिद्धांताला आता वैज्ञानिक जगतात जवळपास पूर्ण मान्यता मिळाली आहे. या सिद्धांताला म्हणतात, 'गाया हायपोथिसिस.'

 

आपल्या पुराणकथांमध्ये एक गोष्ट अनेकदा येते. दुर्जनांच्या पापांच्या भाराने पृथ्वी संत्रस्त होते आणि गाईच्या रूपाने भगवान विष्णूची करुणा भाकते, मग भगवंताला तिला दुष्टदुर्जनांचे निर्दालन करून भूभार हलका करण्याचे वचन देतात इ. गोपाळकृष्णांच्या चित्रात त्याच्यामागे गाय दाखवतात. त्यातील आध्यात्मिक संकेत हेच आहे की, ती गाय म्हणजे पृथ्वी आहे, भगवान दत्तात्रेयांच्या चित्रातील चार कुत्रे आणि पाठीमागे उभी असलेली गाय यांचाही असाच आध्यात्मिक संकेत आहे. चार वेद म्हणजेच चार कुत्रे आणि पृथ्वीमाता म्हणजेच गाय. ग्रीक पुराणथांमध्ये 'झ्यूस' म्हणजे चंद्र. 'अपोलो' म्हणजे सूर्य तसेच, 'गाया' म्हणजे पृथ्वी आपल्याकडचे प्राचीन ग्रीक भाषातज्ज्ञ गोरखपूरचे डॉ. शिवाजी सिंह यांच्या मते, प्राचीन ग्रीक भाषा ही जवळ जवळ संस्कृत भाषाच आहे. डॉ. जेम्स लव्हलॉक म्हणतात की, “माझ्या पृथ्वीविषयक सिद्धांताला 'गाया' हा प्राचीन ग्रीक शब्द माझे मित्र सर विल्यम गोल्डिंग यांनी सुचवला. सर विल्यम हे प्रसिद्ध इंग्रजी लेखक, कादंबरीकार आणि कवी होते. त्यांच्या 'लॉर्ड ऑफ दि फ्लाईन' या गाजवलेल्या पुस्तकाचे मराठी भाषांतर लेखक जी. ए. कुलकर्णी यांनी केलेले आहे. सर विल्यम हे इंग्लंडमधील कॉर्नवॉलचे रहिवासी स्वतःला 'केल्ट' किंवा 'सेल्ट' या जमातीचे वंशज समजतात आणि हे 'केल्ट' लोक स्वतःला भारतातून स्थलांतरीत झालेल्या आर्यांचे वंशज समजतात. 'नोव्हासीन' या आपल्या ताज्या पुस्तकात डॉ. लव्हलॉकनी भाकीत केलं आहे की, मानवाला मागे सारून आता सायबोर्ग जगाचा कारभार हाती घेणार. पण, ते पुढे म्हणतात सायबोर्ग मानवाला नष्ट करणार नाहीत. कारण, सायबोर्गच्या अस्तित्त्वासाठी मुळात मानव अस्तित्त्वात असलाच पाहिजे, हे सायबोर्ग जाणत असणार. डॉ. लव्हलॉक यांचे पुढचे म्हणणे तर तमाम अंध विज्ञानवादी मंडळींना धक्का देणारे आहे. ते म्हणतात, “मला लागलेले बहुतेक वैज्ञानिक शोध हे इहवादी भौतिक मेथॉडिकल पद्धतीने लागले नसून माझ्या अंतःप्रेरणेतून (इंट्युइशन) लागलेले आहेत.” उपनिषदातील एकऋषी आपल्या शिष्याला सांगतात, “मुला, तुला जर ज्ञान मिळवण्याची आत्यंतिक तळमळ असेल, तर ते ज्ञान तुझ्यापर्यंत पोहोचवले जाईल.”

Powered By Sangraha 9.0