भीम आर्मीचा 'रावण' अटकेत; १४ दिवसाची कोठडी

22 Aug 2019 18:27:33

 

 
नवी दिल्ली: दिल्लीतील तुघलकाबाद मधील रविदास मंदिर हिंसाचार प्रकरणी भीम आर्मीच्या रावण उर्फ चंद्रशेखर याला पोलिसांनी ताब्यात घेतले. यांच्यासह अजून ९६ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी अटक केलेल्या सर्वाना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. हे प्रकरण बुधवारी रात्री तापले असून हिंसाचारात शेकडो गाड्यांची तोडफोड करण्यात आली. यामध्ये १५ पोलीस देखील जखमी झाले आहेत.

 

रविदास मंदिर पडल्याने आक्रमक झालेल्या दलित समाजाने बुधवारी रामलीला मैदानावर आंदोलन केले. या आंदोलनात भीम आर्मीचा प्रमुख चंद्रशेखर आझाद रावण हा देखील उपस्थित होता. याबरोबरच आंदोलनासाठी पंजाब, हरयाणा, राजस्थान आणि उत्तर प्रदेश येथील दलित समाजाचे लोक जमले होते. दिल्ली सरकारमधील मंत्री असलेले राजेंद्र पाल गौतम हे देखील या आंदोलनात उपस्थित होते. सुरुवातीला शांततेत सुरु असलेल्या या आंदोलनाला अचानक हिंसक वळण लागले. आंदोलनात सहभागी आंदोलनकर्त्यांनी तुफान दगडफेक करत शेकडो गाड्यांचे नुकसान केले. यात १५ पोलीस अधिकारीही जखमी झाले.
 
 

 

हिंसाचार वाढल्याने पोलिसांनी लाठीचार केला. तसेच हवेत गोळीबार करत जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला. या हिंसाचाराप्रकरणी आत्तापर्यंत ९६ जणांना अटक झाली आहे. त्यांच्यावर दंगल भडकावणे, सरकारी तसेच खाजगी मालमत्तेचे नुकसान करणे याप्रकरणी गोविंदपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आज न्यायालयाने यांना १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीची शिक्षा सुनावली आहे.
Powered By Sangraha 9.0