चिदंबरम यांचा पैसा माध्यमांत का?

    दिनांक  21-Aug-2019 22:15:33


 


पी. चिदंबरम यांना माध्यमांत पैसा का गुंतवायचा होता? त्यामागे त्यांचा हेतू काय होता? केवळ गुंतवणूक करणे व त्यातून नफा कमावणे हे उद्दिष्ट होते काय? माध्यमांचा व्यवसाय खरेच इतका परतावा देणारा आहे का? असे अनेक प्रश्न निर्माण होतात. त्याची उत्तरे अर्थातच गंभीर आणि समाजमन अंतर्बाह्य ढवळून काढणारी आहेत.


माजी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांच्याभोवती भ्रष्टाचारप्रकरणी फास चांगलाच आवळल्याचे दिसते. 'आयएनएक्स मीडिया' कंपनीशी संबंधित हा घोटाळा असून दिल्ली उच्च न्यायालयाने पी. चिदंबरम यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला, तर सर्वोच्च न्यायालयानेही त्यावर तातडीने सुनावणीस नकार दिला. तेव्हापासून पी. चिदंबरम सुमारे २७ तास बेपत्ता झाले व नंतर अचानकच कुठूनतरी काँग्रेस कार्यालयात पत्रकार परिषद घेत अवतरले. इथे त्यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले व आपला आयएनएक्स मिडीया प्रकरणाशी संबंध नसल्याचेही म्हटले. तद्नंतर सीबीआय व ईडीचे अधिकारी आणि चिदंबरम यांच्यातील अटकनाट्य चांगलेच रंगले. अखेरीस चिदंबरम यांच्या घराच्या गेटवरुन उड्या मारुन सीबीआयने त्यांना अटक केली. तत्पूर्वी दिल्ली उच्च न्यायालयाने असेही म्हटले की, मनी लॉन्डरिंग कशाप्रकारे केले जाते, याचे 'आयएनएक्स मीडिया' प्रकरण हा एक उत्तम नमुना आहे. म्हणजेच चिदंबरम यांनी या प्रकरणात आपल्याकडील सत्ताशक्तीचा वापर करत अतिशय बेमालूमपणे आर्थिक हेराफेरी केली की, जी चटकन कोणाच्या लक्षातही येणार नाही. हीच बाब न्यायालयानेही आपल्या निरीक्षणातून नोंदवली आणि त्याच्याच तपासासाठी पी. चिदंबरम यांची अटक अत्यावश्यक असल्याचे म्हटले. आता पी. चिदंबरम, त्यांचे पुत्र कार्ती चिदंबरम आणि 'आयएनएक्स मीडिया'शी संबंधित हे संपूर्ण प्रकरणात या सर्वांची चौकशी होईलच. परंतु, या सगळ्या घटनाक्रमांतून पी. चिदंबरम यांना माध्यमांत पैसा का गुंतवायचा होता? त्यामागे त्यांचा हेतू काय होता? केवळ गुंतवणूक करणे व त्यातून नफा कमावणे हे उद्दिष्ट होते काय? माध्यमांचा व्यवसाय खरेच इतका परतावा देणारा आहे का? असे अनेक प्रश्न निर्माण होतात. त्याची उत्तरे अर्थातच गंभीर आणि समाजमन अंतर्बाह्य ढवळून काढणारी आहेत. तसेच पी. चिदंबरम यांच्यासारखे राजकारणी अशा उद्योगांतून काय काय डाव खेळू पाहतात, हेही समजून घेण्यासारखे आहे.

 

तसे पाहता 'आयएनएक्स मीडिया'चे हे प्रकरण वरवर तरी समभागांच्या अफरातफरीचे, मनी लॉन्डरिंगचे, काळ्याचे पांढरे करण्याचे वाटते. मात्र, ते तसे नाही, हा विषय केवळ भ्रष्टाचाराचा वा व्यवहार करतेवेळी कायदेशीर प्रक्रियांचे पालन झाले अथवा नाही, यापुरता मर्यादित नाही, तर याला एक निराळा आयाम आहे, जो अधिक महत्त्वाचा म्हटला पाहिजे. देशातील सर्वात मोठे उद्योगसमूह म्हणून रिलायन्स आणि टाटाचे नाव घेतले जाते. मात्र, या उद्योगांनी माध्यमक्षेत्रात पैसा गुंतवून नफा कमावण्याचे काम केले नाही किंवा केले तरी नंतर तो पैसा काढूनही घेतला. कारण, सध्या सुरू असलेली बहुतांश दैनिके, वृत्तवाहिन्या, वेबपोर्टल्स तोट्यातच चालतात, त्यात नफा असा होत नाहीच. अशा व्यवसायक्षेत्रात चिदंबरम जर पैसा गुंतवत असतील तर त्यामागे नफा कमावण्याचे उद्दिष्ट नसेलच, तर मग नेमके काय? आपल्या देशात लोकशाही व्यवस्था आहे. त्यामुळे माध्यमांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. तसेच इथे माध्यमांना लोकशाहीचा 'चौथा स्तंभ'ही म्हटले जाते. सोबतच माध्यमांकडे समाजप्रबोधनाचे, जनजागृतीचे साधन म्हणूनही पाहिले जाते. इथपर्यंत तर ठीकच, पण माध्यमांचा उपयोग अभिमत, जनमत तयार करण्यासाठीही केला जातो. सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोच असलेल्या माध्यमांच्या प्रभावाने एखाद्या व्यक्तीच्या विरोधात वा समर्थनात वातावरण तयार केले जाऊ शकते. जनतेला पाहिजे त्या दिशेने वळवता येऊ शकते, नियंत्रित केले जाऊ शकते. अर्थातच, हे ज्याला कोणाला करायचे असेल, तो नक्कीच माध्यमांवर नियंत्रण मिळवण्यासाठी, त्यांना ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न करणार. कारण, तसे केले तरच संबंधित व्यक्तीला माध्यमांच्या साह्याने आपल्याला हव्या त्या विचारांना, तत्त्वांना, मुद्द्यांना प्रसिद्धी देऊन अन्यांची गळचेपी करता येईल किंवा त्यांना मुख्य प्रवाहातून बाजूला करता येईल. म्हणजेच माध्यमांचा वापर नॅरेटिव्ह सेट करण्यासाठी, अजेंडा राबवण्यासाठी करता येतो, हे यातून स्पष्ट होते. चिदंबरम यांनीदेखील पैशाची गुंतवणूक करून 'आयएनएक्स मीडिया'चा यासाठीच उपयोग करून घेतला. विविध माध्यम संस्थांमध्ये पैसा गुंतवून ती माध्यमे आपल्या बाजूने, काँग्रेसला पूरक भूमिका कशी घेतील, हे पाहिले. गेल्या काही काळापासून यापैकी एका माध्यम समुहात पी. चिदंबरम समोरच्या बाकावरुन शब्दफेक करताना दिसतात, तर अन्य एका वृत्तवाहिनीने दोन दिवसांपासून त्यांच्या बचावासाठी कार्यक्रम चालवल्याचेही पाहायला मिळाले. अर्थात पी. चिदंबरम ज्यावेळी चौकशी यंत्रणांच्या हाती लागतील, तेव्हाच या सर्वांचे लागेबांधे उघड होतील, हेही खरेच. दुसरीकडे चिदंबरम यांच्यावरील आरोप व अटकेच्या आदेशावरून राहुल व प्रियांका गांधी ही भावंडेही धावून आली. यावरून चिदंबरम यांच्या साथीने काँग्रेसचे मालक असलेले घराणेही बरबटलेले आहे, असे समजावे का, हाही प्रश्न निर्माण होतो. अर्थात, 'नॅशनल हेराल्ड' आणि 'ऑगस्टा वेस्टलॅण्ड' हेलिकॉप्टरमध्ये जे गुंतलेले आहेत, ते 'आयएनएक्स' प्रकरणातही गुंतलेले असले तरी त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नसेलच.

 

'आयएनएक्स मीडिया'च्या या प्रकरणात पी. चिदंबरम यांनी किती लाच घेतली वा कार्ती चिदंबरम यांनी कशाप्रकारे समभाग खरेदी-विक्री केले, हा छोटा विषय आहे. कारण, जिथे लाखो-कोट्यवधी रुपयांचे व्यवहार, निधी तरतुदी होतात, त्या अर्थमंत्रालयाच्या दृष्टीने ही रक्कम खूपच नगण्य आहे. मात्र, हे प्रकरण आपल्या अंगाशी आल्याचे कार्ती चिदंबरम यांच्या लक्षात आले, तेव्हा त्यांनी त्यातून बाहेर पडण्याचे प्रयत्न सुरू केले. त्यानंतर हा प्रकार अधिकाधिक उजेडात येत गेला व चिदंबरम पिता-पुत्र गर्तेत जाऊ लागले. आगामी काही दिवसांत त्यांची चौकशीही होईल, न्यायालयीन आदेशही निघतील, पण हे सर्व काही करण्यामागचा त्यांचा उद्देश हाच यातला गाभ्याचा भाग होता व आहे. आता यात 'आयएनएक्स मीडिया'चीही चौकशी होईलच, पण हे असे देशातले पहिलेच प्रकरण आहे, असेही नाही. तर यापूर्वीही माध्यमे तपासयंत्रणांच्या निशाण्यावर आलेली होतीच आणि यापुढेही येतीलच. फक्त त्यावरून कोणी कांगावा करायला नको, तसेच खोट्याची बाजूही घ्यायला नको. कारण, प्रश्न विश्वासार्हतेचाही आहे. आज पी. चिदंबरम असो वा कार्ती किंवा काँग्रेस यांची विश्वासार्हता रसातळाला गेल्याचे दिसते. हाच प्रकार काही माध्यमांबाबतही झाल्याचे पाहायला मिळते. त्यामुळेच मुख्य प्रवाहातील माध्यमांपेक्षा समाज माध्यमे अधिक लोकप्रिय ठरत आहेत, वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी त्यांचा वापर होत आहे. अशा परिस्थितीत माध्यमांना पी. चिदंबरम यांसारख्या घोटाळेखोरांचा उपयोग होऊ शकत नाही, तर उलट अशा लोकांना उघडे पाडण्यातूनच माध्यमेही सशक्त होऊ शकतील.