राधेयचा मृत्यू भाग-२

    दिनांक  21-Aug-2019 20:26:41अर्जुनाच्या बाणांपेक्षाही श्रीकृष्णाच्या वाग्बाणांनी राधेय अधिक घायाळ झाला. श्रीकृष्ण बोलतो आहे यात सत्य आहे, याची त्याला जाणीव होती. त्याने शरमेने मान खाली घातली व तो आपल्या रथाचे चाक जमिनीतून वर काढू लागला.


राधेयला आता आपले मरण जवळ आल्याचे जाणवत होते. ब्राह्मणाने त्याला दिलेला शाप खरा होऊ पाहत होता. कारण, त्याच्या रथाखालील जमीन अचानक मृदू झाली. त्याच्या रथाचे एकेक चाक जमीन गिळू लागली. सूर्य माळवण्याची वेळ जवळ आली होती. जसे देहातून हळूहळू प्राण निघून जातात, तसेच वातावरण होते. काही वेळातच राधेयच्या रथाचे चाक भूमीने पूर्ण गिळले. त्यामुळे रथाला धक्का बसून तो तिरपा झाला. राधेयच्या डोळ्यांसमोर तो जुना प्रसंग उभा राहिला. ती मेलेली गाय, ब्राह्मण, त्याचे लालबुंद डोळे आणि त्याची शापवाणी राधेयला पुन्हा ऐकू आली. "शत्रूबरोबर लढताना तुझ्या रथाचे चाक भूमीत रुलेल. माझी निष्पाप गाय तिला धोक्याची जाणीव नसताना तू नाहकपणे मारलीस. तसाच तूही तुझ्या शत्रूकडून मारला जाशील!" तरीही राधेयने धनुष्यावरती बाण चढवला व तो 'ब्रह्मास्त्रा'चा मंत्र आठवू लागला. पण, त्याला काही केल्या तो मंत्रच आठवेना. मृत्यू आता समीप आला होता. त्याला भार्गवांची आपल्या गुरूंची शापवाणीसुद्धा आठवली. "अस्त्राची जेव्हा तुला अत्यंत निकड असेल, त्यावेळी तुला काहीही आठवणार नाही. तुझी स्मरणशक्ती तुला ऐन वेळी सोडून जाईल. दगा देईल." आता आपण पूर्णपणे हरलो आहोत, हे राधेयला कळून चुकले. रथाचे चाक तर भूमीने पूर्णपणे गिळले होते. त्याची अस्त्रेही त्याच्या आज्ञेत राहिली नव्हती. 'नाग' अस्त्रसुद्धा निष्प्रभ झाले होते. कवचकुंडले केव्हाच गेली होती. इंद्राकडून मिळालेली वासवी शक्ती खर्च झाली होती. तो आपल्या प्राक्तनावरती संतापला. त्याचे डोळे अश्रूंनी भरून आले.

 

राधेयच्या धनुष्याची दोरी अर्जुन तोडून टाकत होता. त्याने नवी दोरी लावली की, अर्जुन ती पुन्हा तोडून टाकत होता. आपले हात रागाने चोळत अर्जुनाला तो म्हणाला, "असे म्हणतात की, सद्गुणी माणसांच्या पाठीशी व रक्षणासाठी नेहमी धर्म सिद्ध असतो. मी आजपर्यंत धर्माने वागलो व शर्थीने धर्माचे पालन केले आहे. परंतु, आता या क्षणी मला असे वाटते आहे की, धर्म हा स्वैर स्त्रीप्रमाणे वागतो. जे त्या स्त्रीवर अतोनात प्रेम करतात, त्यांना ती काहीही देत नाही. किंबहुना, या जगात धर्मच अस्तित्वात नाही." अर्जुनाचे तीक्ष्ण बाण त्याला जखमी करत होते. अर्जुनाने राधेयवर 'इंद्रास्त्र' सोडले. राधेयने सर्व शक्तीनिशी अर्जुनावर सोडवण्यासाठी 'ब्रह्मास्त्र' सिद्ध करून सोडले. भूमीने गिळलेले चाक काढण्यासाठी राधेय रथातून खाली उतरला. अर्जुनाने धनुष्यावर बाण चढवला व 'रुद्रास्त्र' सोडण्याठी मंत्र म्हणू लागला. क्रोध व असाहाय्यता यामुळे राधेयचे डोळे अश्रूंनी भरून आले. तो म्हणाला, "अर्जुना, माझ्या रथाचे डावे चाक जमिनीत रुतले आहे, हे केवळ माझे प्राक्तन आहे. तू एक महान धर्मयोद्धा आहेस. थोडा वेळ युद्ध थांबव. मला हे चाक जमिनीतून काढू देत. आपला प्रतिस्पर्धी तयार नसतात. त्याच्याशी युद्ध करणे योग्य नाही. तूू नैतिक नियम पाळशील, याची मला खात्री आहे. तू रथारूढ व सशस्त्र आहेस. मी भूमीवर नि:शस्त्र आहे. अशा वेळी तू शस्त्राचा वार करणे अयोग्य आहे. मी जमिनीतून हे चाक काढेपर्यंत थांब. आपण पुन्हा युद्धाला सुरुवात करू." श्रीकृष्ण राधेयकडे पाहून निर्दयीपणे हसत होता. तो म्हणाला, "म्हणजे अर्जुनाने तुझ्याशी चांगले वागावे अशी तुझी अपेक्षा आहे तर. तू कधी सदाचाराच्या मार्गाने चालला आहेस का राधेया? दुर्योधनाच्या कटात तूच सामील झालास. द्रौपदीला दु:शासनाने खेचत कौरवांच्या दरबारात आणली तेव्हा तुला धर्म नाही आठवला? तिची असाहाय्यता पाहून तुला आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. पांडवांशी कपटी शकुनी द्यूत खेळत होता, तेव्हा तुला सदाचार आठवला नाही? अरे अगदी चारच दिवसांपूर्वी तुम्ही सर्वांनी मिळून त्या नि:शस्त्र अभिमन्यूला ठार केले. त्यानेही विनवणी केली होती रथाचे चाक हाती घेऊन, 'माझ्याशी एक-एक जण लढा.' पण नाही! तुम्ही सर्वांनी त्याच्यावर एकत्र हल्ला केला. त्याला कल्पनाही न देता पाठीमागून येऊन त्याचे धनुष्य तोडले. हे काय युद्धाचे नीतिनियम पाळले? मग आता युद्धनीतीच्या गोष्टी करतोस? अर्जुनाने ते पाळावे अशी अपेक्षा का?" श्रीकृष्णाचे ओठ संतापाने थरथरत होते.

 

अर्जुनाच्या बाणांपेक्षाही श्रीकृष्णाच्या वाग्बाणांनी राधेय अधिक घायाळ झाला. श्रीकृष्ण बोलतो आहे यात सत्य आहे, याची त्याला जाणीव होती. त्याने शरमेने मान खाली घातली व तो आपल्या रथाचे चाक जमिनीतून वर काढू लागला. खरंतर कृष्णाला राधेयची क्षमता ठाऊक होती, पण राधेयने दुर्योधनाचीबाजू घेऊन मोठा अधर्म केला होता. या गोष्टीची किंमत त्याला आता आपल्या रक्ताने द्यावी लागणार हे कृष्ण जाणून होता. दुर्योधनासाठी राधेयने पाप केले होते व त्याला खरे तर शकुनीचे डावपेच पसंत नव्हते, पण दुर्योधनाला परावृत्त करण्याची त्याला हिंमत झाली नव्हती. तो मध्येच रथाचे चाक काढण्याचा प्रयत्न करत होता व युद्धही चालू ठेवत होता. देवांच्याही डोळ्यांमध्ये अश्रू यावेत, असा हा प्रसंग होता. राधेयला कोणीही मदत करू शकत नव्हता. कारण, अर्जुनाच्या बाणांचा वर्षाव त्यांच्यावर होत होता. शल्य तर रथाचे घोडे सांभाळण्यात गुंतला होता. शेवटी अर्जुनाला ठार करण्यासाठी एक शक्तिशाली बाण राधेयने सोडला व त्याचा भयंकर परिणामही झाला. अर्जुन मूर्च्छित झाला. पांडवांना तर वाटले की, अर्जुन धारातीर्थी पडला. त्याच्या हातातील 'गाण्डिव' धनुष्य गळून पडले. अर्जुन ठार झाला, असे वाटून कौरवांनी जल्लोष केला. इतक्यात अर्जुन भानावर आला. त्याने बाण सोडून राधेयच्या रथावरील ध्वज पाडला. हे पाहून कौरवांना खूप दु:ख झाले. राधेय रथाचे चाक काढण्याचा प्रयत्न करत होता. त्याच्या धमन्या फुगल्या होत्या. त्याला खूप घाम फुटला होता. कपाळाच्या जखमेतून रक्त वाहत होते. कृष्ण म्हणाला, "अर्जुना, हाच क्षण आहे. आता वेळ घालवू नकोस." अर्जुनाने विजेच्या वेगाने राधेयकडे एक तीक्ष्ण बाण सोडला. तुच्छतेने अर्जुनाच्या त्या बाणाकडे राधेय पाहत असतानाच त्या बाणामुळे राधेयचे मस्तक धडावेगळे झाले. कौरवांचा सेनापती राधेय धारातीर्थी पडला. त्याच्या देहातून दिव्य ज्योत बाहेर पडली व आकाशाच्या दिशेने निघाली. ती एवढी संथपणाने जात होती, जणू काही तो देखणा देह सोडण्यास ती तयारच नव्हती.(क्रमश:)

 

- सुरेश कुळकर्णी