वाचू... ऐकू श्रुतिवाणी!

    दिनांक  21-Aug-2019 19:07:06श्रावण महिना हा वेदादी शास्त्राच्या श्रवणावर आणि स्वाध्यायावर भर देतो. श्रवण नक्षत्र याच भावनेशी अनुसरून आहे. या महिन्यात प्रत्येकाने धार्मिक व आध्यात्मिक ग्रंथांचे वाचन केले पाहिजे. विशेषत: वैदिक साहित्यात दडलेल्या कल्याणकारी विचारांचे अध्ययन आणि श्रवण करणे आवश्यक आहे. कारण, वेदवाणी ही 'पावमानी' म्हणजेच सर्वांना पवित्र करणारी आहे. तिचे अध्ययन करणारा सदैव आनंदी राहतो.


पावमानीर्यो अध्येत्यृषिभि: संभृतं रसम्।

तस्मै सरस्वती दुहे क्षीरं सर्पिमर्धूदकम्॥

(ऋग्वेद ९.६७.३२, साम.११९९)

 

अन्वयार्थ

 

(य:) जो मानव (ऋषिभि:) तपस्वी ऋषी व मुनिवृंदांद्वारे (सम् भृतम्) चांगल्या प्रकारे धारण केलेल्या (पावमानी:) अंत:करणाला पवित्र बनवणाऱ्या (रसम्) ज्ञानयुक्त अशा वैदिक रसाचे-ऋचांचे (अध्येति) अध्ययन करतो, (सरस्वती) ज्ञानरसाने परिपूर्ण अशी सरस्वती, वेदवाणी (तस्मै) त्या अध्ययन करणाऱ्या माणसाकरिता (क्षीरम्) दूध, (सर्पि:) तूप व (मधु उदकम्) गोड पेय पदार्थ इत्यादींचे (दुहे) दोहन करते, प्रदान करते.

 

विवेचन

 

श्रावण महिना हा श्रवण-मनन आणि स्वाध्यायाचा महिना म्हणून ओळखला जातो. गावोगावी मंदिरांमध्ये विविध ज्ञानसप्ताहांचे आयोजन केले जाते. कुठे रामायण, तर कुठे महाभारत. कुठे ज्ञानेश्वरी, तर कुठे तुकाराम गाथा. या ग्रंथांची पारायणे आणि सोबत भजन-कीर्तन, प्रवचने असे कार्यक्रम आयोजित केले जातात. याच दरम्यान जपानुष्ठान, नामावली, हरिनाम, पूजा-अर्चा, अभिषेक आदी कार्यक्रम व त्याकरिता त्यांना मोठ्या प्रमाणावर देण्यात येणारे व्यापक स्वरूप! हे सर्व असले तरी या सर्व ज्ञानग्रंथांची मूल अधिष्ठात्री म्हणजे वेदज्ञान संपदा होय. हिच्याकडे कदापि दुर्लक्ष करून चालणार नाही. वेदांविना श्रावण शोभणार तरी कसा? याच पवित्र महिन्यात वेदप्रचार सप्ताहाचे आयोजन करून परमेश्वराच्या या अमृतवाणीचा प्रसार करणे गरजेचे असते. पूर्वी आपल्या देशात वेदपारायणे मोठ्या प्रमाणात चालत. गावोगावी वेदमंत्रांचे गायन, वेदकथा, तत्त्वचर्चा आदी होत असत. दुर्दैवाने अलीकडील काळात मात्र श्रुतिवचनांच्या स्वाध्याय, श्रवण-मनन-चिंतनाची परंपरा खंडित झाली आहे. संतशिरोमणी श्री ज्ञानेश्वरांनी आपल्या रसाळ व मधुर अशा अप्रतिम वाग्विलासाने नटलेल्या ग्रंथराज ज्ञानेश्वरीची सुरुवात 'ओम् नमोजी आद्या वेदप्रतिपाद्या' या वेदवचनाने केली. त्या वेदवाणीकडे आणि तिच्या विशुद्ध अशा कल्याणकारी ज्ञानभंडाराकडे मात्र पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. महर्षी मनू महाराजांनी 'वेदोऽखिलो धर्ममूलम्।' असे उद्गार काढून सर्व सत्य कर्म व कर्तव्यांचे मूळ वेद आहेत, असे प्रतिपादन केले. आधुनिक काळातील वेदविद्येचे प्रकांड विद्वान महर्षी दयानंद म्हणतात, “वेद हे सर्व सत्य विद्यांचे मूलभूत आधार ग्रंथ आहेत. वेदांचे वाचन करणे किंवा ते ज्ञान शिकणे आणि इतरांना शिकविणे तसेच ते ऐकणे व ऐकविणे हे प्रत्येक मानवाचे कर्तव्य आहे.”

 

श्रावण महिना हा वेदादी शास्त्राच्या श्रवणावर आणि स्वाध्यायावर भर देतो. श्रवण नक्षत्र याच भावनेशी अनुसरून आहे. या महिन्यात प्रत्येकाने धार्मिक व आध्यात्मिक ग्रंथांचे वाचन केले पाहिजे. विशेषत: वैदिक साहित्यात दडलेल्या कल्याणकारी विचारांचे अध्ययन आणि श्रवण करणे आवश्यक आहे. कारण, वेदवाणी ही 'पावमानी' म्हणजेच सर्वांना पवित्र करणारी आहे. तिचे अध्ययन करणारा सदैव आनंदी राहतो. खरे तर स्वत: शिकल्याशिवाय इतरांना शिकवता येत नाही. म्हणूनच वाचनाची प्रक्रिया सदैव नवनवे ज्ञान प्रदान करणारी आहे. वेदांचे वाचन म्हणजेच त्या दिव्य ज्ञानाचा अंगिकार होय. मंत्रातील अर्थ समजणे आणि अर्थाचा भाव आत्मसात करणे, तसेच त्यांचा आपल्या जीवनाशी संबंध जोडणे यालाच तर 'वाचन' म्हणायचे! अन्यथा शब्द व वाक्यांचे केवळ पारायण केल्याने काहीच उपयोग नाही. स्वत:मध्ये काही बदल घडत असेल तरच वाचनालाही अर्थ उरतो. वैदिक ऋचांमध्ये प्रतिपादित सत्य व सर्वकल्याणाचे तत्त्वज्ञान जीवनात रुजविल्यास त्याला कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही. वरील मंत्रांशात - 'य: पावमानी: रसम् अध्येति, तस्मै सरस्वती क्षीरं सर्पि: मधु उदकम् दुहे।' असा जो अन्वयार्थ आहे, तो निश्चितच अध्ययनकर्त्या वेदाभ्यासकास सर्व काही प्रदान करणारा आहे. वेदविज्ञाता, विद्वान व वैदिक पंडित हे कधीच उपाशी राहत नाहीत. त्यांचा सर्व ठिकाणी गौरव होतो. 'विद्वान सर्वत्र पूज्यते।' हे खरेच आहे. वेदाभ्यासकाला आत्मिक आनंदाच्या प्राप्तीसोबतच भौतिक संसाधने पण मिळतातच. वेदपंडितांना विविध ठिकाणाहूंन निमंत्रणे येतात. यजमान लोक विविध भेटवस्तू व दक्षिणा देऊन त्यांना सन्मानित करतात. आधुनिक युगातील विविध संस्था व सरकारतर्फे दिले जाणारे वाङ्मयीन सेवा पुरस्कार हे एक प्रकारे वरील मंत्राचा आशय कथन करणारेच आहे.

 

जो वेदज्ञानी साधक अहर्निश वेदाभ्यास करतो, वैदिक तत्त्वज्ञानावर चिंतन करतो. वेदमंत्रांवर सूक्ष्म संशोधन करतो. आपल्या वाणी व लेखणीद्वारे हे वैदिक ज्ञान पसरवतो. वेदज्ञानाच्या माध्यमाने समाजातील पीडितांच्या दु:खांना वाट काढून देतो. देशात वाढत चाललेल्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी अहर्निश आपली काया व वाचा झिजवतो, तो खऱ्या अर्थाने धन्य होय. एका अर्थाने ईश्वराची ही वेदवाणी जनसामान्यांपर्यंत पोहोचविणे म्हणजे त्या भगवंताचेच पवित्र कार्य! म्हणूनच अशा वेदज्ञानाचे रक्षण ईश्वर स्वयमेव करतो. फक्त गरजे आहे ती त्या वेदोपासक विद्वानाच्या प्रामाणिकपणाची! त्याने आपल्या जीवनातदेखील वेदविचार रुजवावयास हवेत, अन्यथा लोकां सांगे ब्रह्मज्ञान आपण मात्रे कोरडे पाषाण, असे असेल तर त्याचा प्रभाव समाजघटकांवर कसा काय पडणार? वेदपंडितांच्या केवळ बोलण्यावरूनच नव्हे, तर आचार-विचार-व्यवहारातून वेदज्ञान प्रकटले पाहिजे. अशा कृतिशील विद्वानास ती वेदविद्या भरभरून देते. जो नित्यप्रति वेदमंत्रांचे पठन-पाठन करतो आणि त्यानुसारच जीवन जगतो, त्याकरिता ती वेदवाणी दूध, तूप व गोड पेयपदार्थ प्रदान करते, असा उल्लेख वरील मंत्रात आहे. गाईच्या दूध व तुपात मोठे सामर्थ्य आहे. गोमाता पवित्र, निर्मळ, निष्पाप, करुण व दयाळू असते. तिच्याकडून मिळालेले दूध-तूप हे तर अतिशुद्धच! तसेच दुसरी आई म्हणजे धरणी. या वसुंधरेला 'रत्नगर्भा' म्हटले जाते. अन्नधान्य, खनिजद्रव्य इत्यादींबरोबरच गोड पाणी हे तिचे रत्न सर्वश्रेष्ठ! म्हणूनच वेदवाणी वेदाभ्यासकास मधुर, शुद्ध व गोड पाणी हे अमृतरस प्रदान करून उपकृत करते. पाणी म्हणजे प्राणशक्तीचे प्रतीक! दूध, तूप आणि पाणी हे तिन्ही जीवनदायी अमृततत्त्वे देऊन वेदमाता आपल्या लाडक्या वेद उपासकास प्रदान करीत असेल, तर मग त्याला कशाचीच कमतरता भासणार नाही. त्याचे चहुबाजूने रक्षण होईल व तो अमरत्वाला प्राप्त होईल. आपण श्रावण महिन्यात वेदमंत्रांचे अध्ययन करून स्वत: पवित्र होऊ या व इतरांना आनंदी बनवूया...

 

- प्रा. डॉ. नयनकुमार आचार्य