गंमतबाज बाई शेहला

    दिनांक  21-Aug-2019 21:10:47   सैनिकांनी कुठे, कसे, कधी, केव्हा आणि कोणाला छळले आहे, याबाबत दिनांक, वेळ, स्थळ वगैरे याबाबत शेहलाकडे उत्तर नाही. तिचे एकच पालुपद आहे की, तिथे गेलेल्या काही लोकांनी सांगितले की, भारतीय सैनिक काश्मिरी जनतेला भयंकर त्रास देत आहे. तिच्या विना पुरावा आरोपांमुळे सर्वोच्च न्यायालयाचे वकील अलख श्रीवास्तव यांनी तिच्यावर फौजदारी गुन्हाही दाखल केला आहे. खरे म्हटले तर शेहलाच्या बोलण्याला किंमत देऊच नये असेच तिचे आजवरचे मूर्खासारखे वागणे. मागेही तिने असेच बिनबुडाचे आरोप केले होते की, नितीन गडकरी आणि रा.स्व.संघ नरेंद्र मोदींच्या जीवावर उठले आहेत. तिच्या बेताल आणि बिनबुडाच्या आरोपांवर नितीन गडकरी यांनी कायदेशीर कारवाईचा बडगा उगारल्यानंतर तिने उत्तर दिले की, "अहो मी तर गंमत केली." अशी ही गंमतबाज बाई... असो, 'आझाद काश्मीर'च्या नावाखाली भरपूर आझादी उपभोगताना शेहला सैरभैरच होणार. तिला जर खरेच काश्मीरचा इतका लळा असता तर अफवा का होईना, पण काश्मीरमध्ये काय चालले आहे, हे सत्य जाणून घेण्यासाठी ती काश्मीरमध्ये का गेली नाही? ईदच्या दिवशी म्हणे तिला आईला ईद मुबारक बोलता आले नाही. त्यामुळे तिची ईद बेकार गेली. हे भारत सरकारचे पाप आहे, असे ती म्हणते. जेव्हा कश्मिरी पंडितांची आणि त्यांच्या आयाबहिणींची अब्रू, प्राण लुटले गेले, तेव्हा ते पाप कुणाचे होते? मुस्लीम महिलांनी बुरखा घालावा, या फतव्याला विरोध करणाऱ्या मुस्लीम तरुणींची काश्मीरमध्ये खांडोळी केली गेली, तेव्हा ते पाप कुणाचे होते? 'आझाद काश्मीर'च्या नावाखाली हिंसेचा नंगानाच करणाऱ्यांनी देशाला वेठीस धरले, हे पाप कुणाचे? यावर बोलायला शेहलाचे तोंड शिवले जाते. पण, भारतीय सैन्याबद्दल, भारतविरोधी गरळ ओकण्यासाठी ती जहरीली नागीण होते. शेहलाची मानसिकता एकाच वाक्यातून दिसते. ती म्हणते, "काश्मिरी मुसलमानांना वाटते की भारतीय मुसलमान त्यांच्याबद्दल आवाज उठवत नाहीत." याचाच अर्थ शेहला काश्मिरी मुसलमानांना भारतीय मुसलमान समजत नाही. शेहलासारख्या फुटीरतावाद्यांना 'कयामत'च्या दिनी अल्ला अक्कल देईलच, पण तोपर्यंत भारत शासन अशांना नक्कीच ताळ्यावर आणेल, अशी आशा.. आमेन..!

 

ये कश्मीर हमारा है।

 

कोण ही शेहला रशीद? शाह फैजल यांच्या 'जम्मू-काश्मीर पीपल मूव्हमेंट' या राजकीय पक्षाची ती पदाधिकारी आहे. सध्या वय वर्षे ३१ असून ती जेएनयुमधून पीएचडी करते आहे, ती विद्यार्थिनी आहे म्हणे. ही जेएनयुच्या 'तुकडे तुकडे गँग'ची साथीदार. कन्हैयाकुमार वगैरेंसोबत भारतविरोधी नारे देण्यामध्ये ही पुढे होती. ३७० कलम रद्द केल्यानंतर, जगभरातून पाकडे सोडले आणि चिनी मकाऊ सोडले, तर सगळ्यांनी भारताच्या निर्णयाचे स्वागत केले. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची वाहव्वा तर पाकिस्तानची छी!थू! होत आहे. भारतात राहून भारताचे खाऊन वर जेएनयुच्या सवलती लाटणाऱ्या शेहला आणि तिच्या 'तुकडे गँग'ला हे पाहून जळफळाट झाला आहे. पुलवामा घटनेनंतर भारतीय सैन्याची विजयी घोडदौड सुरू आहे. भारतीय सैन्याची वीरश्री भारत विरोधकांच्या काळजात धडकी भरवून गेली. त्याचवेळी भारतीयांना आत्मविश्वास देऊन गेली. त्यामुळे भारतीय सैन्याच्या विरोधात जनमत आणि जगमत व्हावे, यासाठी भारतीय सैन्याविरोधात धांदात खोटे आरोप शेहलाने केले. तिने सलग १० ट्विट केली, ज्यांचा साधारण अर्थ होता- काश्मिरी नागरिकांच्या घरात घुसून भारतीय लष्कराचे जवान तरुणांना उचलून नेत आहेत. शोपियाँ इथल्या लष्करी तळामध्ये चार तरुणांना सैनिक घेऊन गेले आहेत. त्यांचा तिथेे अतोनात छळ केला गेला. त्यांच्या किंकाळ्या लोकांनी ऐकाव्यात आणि घाबरून जावे म्हणून त्या तरुणांसमोर माईक ठेवण्यात आला. सैनिक घरात घुसतात, तोडफोड करतात, तांदळात तेल टाकतात, नासधूस करून काश्मिरी जनतेचे हाल हाल करत आहेत, अशा प्रकारचे अनेक आरोप शेहला रशीदने भारतीय सैन्यावर केले आहेत. सैन्याने या आरोपाला बिनबुडाचे म्हटले आहे, तर देशाने शेहलाकडे पुरावे मागितले आहेत. तिचे म्हणणे, मी पुरावे देईन. पण, पुरावे देऊन काय होणार आहे? तिने कशाच्या आधारावर आरोप केला आहे?, असे विचारल्यावर तिचे म्हणणे, तिच्या काही 'सोर्सेस'कडून तिला कळाले. तिला भारतीय जनता, जग मूर्ख वाटते आहे. पण, अंधारलं म्हणून सूर्य उगवायचा राहत नाही. शेहलासारख्यांनी काश्मीर प्रश्न चिघळत राहावा म्हणून जंग जंग पछाडले, तरी 'कश्मीर हमारा था, हमारा है और हमारा रहेगा।'