‘ति’च्यासाठी घरटे बांधणारी ‘ती’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Aug-2019   
Total Views |


प्रत्येक कुटुंबातील स्त्रीला हक्काचे घर हवे. तिच्या पिल्लांना हक्काचा निवारा मिळावा, तिची स्वतःची ओळख त्यातून अधोरेखित व्हावी, अशी संकल्पना मांडणार्‍या उद्योजिका प्रज्ञा पोंक्षे यांच्याविषयी...

 

लहानपणी भातुकलीच्या खेळात घर घर खेळताना रमणारी, लहानशा खेळण्यांतून आपला चिमुकला संसार मांडणारी, त्याच खेळातून आपल्या आयुष्यातील घरट्याचे स्वप्न पाहणारी आई-बाबांची लाडकी लेक एक दिवस दुसर्‍या घरची होते. तेथील माणसं, नातीगोती, कुटुंब, समाज सांभाळण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचते. मात्र, या घराचा एकही कोपरा तिच्या हक्काचा कधीच नसतो. ‘सून’ म्हणून ‘हक्काचं घर ’ तिचंच असतं. पण, आयुष्याची पुंजी म्हणून अखेरच्या क्षणी तिच्या हाती काहीच नसतं.

 

स्वतः उद्योजिका असलेल्या प्रज्ञा पोंक्षे यांच्या मनात ही सल लागून होती. त्यांनी या दृष्टिकोनातून विचार करत ‘हर हायनेस्ट’ ही संकल्पना मांडली. यात महिलांना येत्या १० वर्षांत किमान एक हजार परवडणारी घरे बांधून देण्याचा संकल्प त्यांनी सोडला आहे. लोणावळ्यातील वडगावजवळ त्यांच्या पहिल्या प्रकल्पाचे काम सध्या सुरू आहे. राज्य सरकार आणि बांधकाम क्षेत्रातील विविध कंपन्यांना सोबत घेऊन या संकल्पनेसाठी काम करण्याचीही तयारीही त्यांनी दर्शवली आहे. महिलांना त्यांच्या हक्काचं घर असावं, तिला समाजात मानाचे स्थान असावे या हेतूने पोंक्षे या कामात उतरल्या. सध्या समाजात कितीही स्त्री-पुरुष समानतेबद्दल मते व्यक्त केली, तरीही तिला पाहताना स्वतःच्या एक पायरी खालीच पाहणार्‍या पुरुषी मानसिकतेविरुद्ध त्या थेट दंड थोपटून उभ्या राहतात. महिला सक्षमीकरणासाठी हवी ती मदत करण्याची तयारी आणि त्याच हिरीरीने महिलांसाठी काम करण्याची तयारी ठेवतात.


प्रज्ञा पोंक्षे यांचा जन्म आणि बालपण दोन्ही मुंबईतील शिवाजी पार्कमधील
. त्यामुळे धावत्या जगाशी जुळवून घेण्याची सवय बालपणापासूनच होती. त्यांचे शालेय शिक्षण दादरच्या बालमोहन विद्यालयातून झाले. जिंकण्याची जिद्द व खिलाडूवृत्ती त्यांनी बालपणापासूनच जोपासली. मुंबईतील सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स, येथे फाईन आर्ट्समधून त्यांनी शिक्षण घेतले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरीपेक्षा व्यवसायच करावा, हा निश्चय त्यांनी केला होता. शिक्षकांकडूनही तितकेच मोलाचे मार्गदर्शन त्यांना लाभले. शेवटच्या वर्षात अभ्यासातील उत्तम कामगिरीबद्दल त्यांचा शिष्यवृत्ती आणि गुणगौरवही झाला होता. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी आपल्या काही मित्रांसोबत इंटिरिअर डिझाइनिंगचा व्यवसाय सुरू केला. व्यवसायात उत्तम जम बसत होता. मात्र, त्यावेळी स्वतःचा वेगळा व्यवसाय सुरू करण्याचा विचार प्रज्ञा यांच्या मनात आला. ‘जे काम मी करेन त्यावर फक्त माझे नाव असायला हवे’ असा निश्चय त्यांनी केला होता. दादरच्या कार्यालयामध्ये त्यांनी आपला व्यवसाय सुरू केला. इंटिरिअर डिझाईन, आर्किटेक्चर क्षेत्रातील ‘त्रिमित रचना’ ही कंपनी त्यांनी सुरू केली होती.

नवा व्यवसाय सुरू करणे अवघड होते, तितकेच कठीणही होते. कौटुंबिक अडचणीही समोर होत्या. मात्र, त्या सर्वांवर मात करत त्यांनी आपले ध्येय गाठले. याच दरम्यान त्यांनी स्वतःचे घरही घेतले. त्यामुळे एक गृहिणी आणि उद्योजिका, अशी तारेवरची कसरत सोपी कधीच नव्हती. ही काटेरी वाट चालण्यामुळे समाजातील इतर महिलांनाही एक आत्मविश्वास मिळणार होता. सर्व काही नव्याने सुरू केल्यानंतर भांडवलापासून ते ग्राहकांपर्यंत सारेकाही मिळवण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागणार होती. हे सर्व करताना “Quality is first engineered; only then it is inspected.” हा जेआरडी टाटा यांचा विचार व्यवसाय करताना संपूर्णपणे त्यांनी अवलंबला. परिणामी, ग्राहकांचाही विश्वास त्यांना जिंकता आला. आज बहुराष्ट्रीय कंपन्यांची भारतातील मोठमोठी वाणिज्य कार्यालये त्यांच्याच संकल्पनेतून उभी राहिली आहेत.

त्रिमित रचनाम्हणजेच ग्राहकांसमोर कागदावर त्रिमितीय रचना मांडणे आणि जशीच्या तशी संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्याचे काम. यामुळेच ग्राहकांच्या पसंतीस उतरलेल्या या कंपनीला ‘क्रिसिल’चेही मानांकन मिळाले. कामाबद्दल प्रचंड निष्ठा आणि ग्राहकांसोबत जपलेल्या प्रामाणिकपणामुळेच त्यांचा व्यवसाय यशोशिखर गाठू शकला. दररोज कार्यालयात वेळेत पोहोचणे, सुरू असलेल्या प्रकल्पांचा प्रत्यक्ष भेटी देऊन आढावा घेणे आणि नव्या कामाची मांडणी चोखपणे करणे प्रज्ञा यांना अचूक जमते. आपल्या कामातून इतरांनाही प्रेरणा देण्याचे काम त्या करतात. महिलांनी फक्त ‘चूल आणि मूल’ सोडून जगात वावरण्याची मानसिकता बदलावी, यासाठी समाजकार्यातही त्या हातभार लावतात. आजघडीला ‘झेरोक्स,’ ‘ब्रिजस्टोन,’ ‘महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा,’ ‘रिलायन्स,’ ‘ग्लेनमार्क,’ ‘वोक एक्सप्रेस,’ ‘फ्युचर ग्रुप’ अशा अनेक कंपन्या ‘त्रिमित रचना’च्या ग्राहक आहेत.

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अ‍ॅण्ड अ‍ॅग्रीकल्चर’च्या (मसिआ) त्या महिला विभाग अध्यक्षा आहेत. या माध्यमातून महिला सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबविले जातात. उद्योगक्षेत्रात महिलांशी निगडित विविध संधी उपलब्ध करून देण्याचे ध्येय त्यांनी समोर ठेवले आहे. ज्या महिलांना या कार्यात आपले योगदान द्यायचे असेल किंवा मार्गदर्शन हवे, असेल तर त्यांनी ९८२०५३३६७६ या क्रमांकावर किंवा [email protected] या ईमेलवरही संपर्क करण्याचे आवाहन त्या करतात. समाजाप्रति आपले दायित्व म्हणून त्यांनी ‘हार्मोनी सेफ लिव्हिंग’ हा उपक्रमही सुरू केला आहे. या माध्यमातून ‘पाणी फाऊंडेशन,’ जैवइंधनावर चालणारी बस आणि अग्निसुरक्षा आदी समाजहिताची कामे त्या करत असतात. प्रज्ञा पोंक्षे यांच्या या कार्याला दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे शुभेच्छा...!

@@AUTHORINFO_V1@@