लोकसंग्रह

    दिनांक  21-Aug-2019 20:12:48समर्थांचा 'महंत' हा आध्यात्मिक पुढारी असला तरी त्याला समाज एकत्र आणण्यासाठी सामाजिक पुढाऱ्याची भूमिका बजवावी लागे. समर्थांच्या मते, नेत्यावर त्याच्या समुदायातील लोकांचा विश्वास तर हवाच, पण त्या समुदायाबाहेरील लोकांचाही त्याच्यावर विश्वास हवा.


'मुख्य ते हरिकथा निरूपण' अशी स्वामींची भूमिका आपण मागील लेखात पाहिली. दासबोधातील दशक ११, समास ५ मधील ओवी क्र.४ व ५ या ओव्यांतून स्वामींनी आदर्श जीवन पद्धतीची चतुःसूत्रीसांगितली आहे. त्यात पहिले सूत्र 'हरिकथा निरूपण,' दुसरे 'राजकारण,' तिसरे 'सर्व ठिकाणी सावधपणा' आणि चौथे सूत्र 'अत्यंत साक्षेप' म्हणजे आळसाला यत्किंचितही थारा न देता सतत उद्योग करीत राहणे, हे आहे. या चारही सूत्रांना समर्थांनी महत्त्व दिले आहे. ही चतुःसूत्री सामान्य माणसाला जीवनात यशस्वी होण्यासाठी आहे. तितकीच नव्हे, तर त्यापेक्षा अधिक ती चारही सूत्रे लोकसंग्रह करू पाहणाऱ्या पुरुषांसाठी आहे. त्याच ओवीत स्वामींनी लोकसंग्रह करू पाहणाऱ्या पुढाऱ्यांच्या अंगी असावे अशा गुणांचे महत्त्व सांगितले आहे. ती ओवी पुन्हा देतो-

 

चौथा अत्यंत साक्षेप ।

फेडावे नाना आक्षेप ।

अन्यायो थोर अथवा अल्प ।

क्षमा करीत जावे ॥

 

चौथे सूत्र अत्यंत साक्षेप हे सांगताना स्वामींनी समाज संघटकांना काही महत्त्वाचा उपदेश केला आहे. लोकसंग्रह करू पाहणाऱ्या संघटकाने अनुयायांचे काही आक्षेप त्यांची वेगळी मते असतील, तर ती नीट ऐकून घेऊन त्यांच्या शंकांचे निरसन केले पाहिजे. संघटनेत सर्व तर्‍हेचे अनुयायी असतात. त्यांच्या हातून काही चुका घडतात. अशावेळी पुढाऱ्याने छोट्या-मोठ्या चुकांना उदार अंतःकरणाने क्षमा केली पाहिजे. पुढाऱ्याने जर तसे केले नाही, तर ती माणसे दुरावतील. प्रसंगी ती माणसे संघटन सोडून जातील. त्यामुळे संघटन कमकुवत होईल. कुठल्याही परिस्थितीत संघटन तुटू न देण्याची जबाबदारी पुढाऱ्यावर, नेत्यावर असते. म्हणून त्याने संघटनेतील लोकांच्या चुकांबाबत जास्त कठोर धोरण स्वीकारू नये. वर सांगितलेल्या चारही सूत्रात स्वामींनी हरिकथा निरुपणाला पहिले स्थान दिले आहे. ते यासाठी की, स्वामींना हरिकथा निरुपणाद्वारा संघटित समाजाला सज्जनांच्या पातळीवर नेऊन ठेवायचे होते. असे असतानाही काही टीकाकार हरिकथा निरूपण प्रथम स्थानावर का, असा आक्षेप घेतात. त्याकाळी हरिकथा करणे, कीर्तन करणे हे विशिष्ट सुशिक्षित वर्गाचे काम होते. त्या वर्गाचे महत्त्व वाढावे म्हणून स्वामींनी हरिकथा निरुपणाला पहिल्या स्थानावर बसवले असे टीकाकारांना वाटते. अर्थात, अशा स्वरुपाची टीका ही खोडसाळपणाची असून ती अयोग्य आणि अकारण आहे, हे नव्याने सिद्ध करायची गरज नाही.

 

ज्या पुरुषाला समाज संघटन करण्याची इच्छा आहे, त्याच्या ठिकाणी अनेक गुणांची आवश्यकता असते. सर्वात महत्त्वाचा गुण म्हणजे त्या पुढाऱ्याच्या ठिकाणी प्रथम जनसामान्यांविषयी कळवळ असणे आवश्यक आहे. ज्या समाजासाठी हे संघटन उभे करायचे आहे, तो समाज कसा आहे, त्याच्या अडचणी, समस्या कोणत्या प्रकारच्या आहेत, हे त्या पुढाऱ्याने नीट जाणून घेतले पाहिजे. नंतर एकान्त स्थानी बसून त्यावर विचार केला पाहिजे. त्या समस्या सोडवण्यासाठी उपाययोजना निश्चित केल्या पाहिजेत. यासाठी स्वामींच्या धरित्रीचा अभ्यास केला तर ते कळते. समर्थांनी लोकसंग्रह व समाज संघटनासाठी आधी सर्व लोकांना जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्यांनी अपार कष्ट केले. थोडेथोडके नव्हे तर, सतत १२ वर्षे पायी फिरून भोवतालची स्थिती न्याहाळून लोकसमुदायाचा अभ्यास केला आणि मगच लोकसंग्रहाविषयीचे व संघटन कसे करावे, यासंबंधीचे विचार ग्रंथातून प्रकट केले. अर्थात, आपले विचार लोकांपर्यंत जाण्यासाठी कीर्तनांतून, प्रवचनांतून त्यांनी ते मांडले असतील. त्यांच्या अमोघ वाणीतून निघालेले सर्व विचार ग्रंथनिविष्ट झाले असण्याची शक्यता नाही. तरीसुद्धा समाजसंघटनासंबंधी जे विचार त्यांच्या वाङ्मयातून आढळतात, ते वेगळे काढून दाखवता येतात. स्वामींनी प्रथम जनसामान्यांच्या अडचणी समजून घेतल्या. त्या समस्या ऐकून त्यांच्या उद्धारासाठी स्वामींच्या मनात तळमळ निर्माण झाली. त्यानंतर सज्जनांच्या पातळीवर समाज संघटन करण्याच्या कामाला ते लागले. स्वामींच्या या संबंधातील व्यक्तिमत्त्वाचे चित्रण गिरीधरस्वामींनी त्यांच्या 'समर्थप्रताप' या ग्रंथात केले आहे. त्यातील पुढील ओव्या वाचल्यावर समर्थांच्या ठायीची कळकळ दिसून येते.

 

श्रीसमर्थ एकांती बैसती ।

प्रांतीची लोक दर्शना येती ।

सकळप्राप्तीचा स्वामी परामर्श घेती ।

चिंता करिती विश्वाची ।

देशकाल वर्तमाने ।

आपण चिंताग्रस्त होती मनें ।

म्हणती कैसी वाचतील जनें ।

कैसी ब्राह्मण्ये राहतील ।

कैसी क्षेम राहेल जगती ।

कैसी देवदेवाल्ये तगती ।

कैसे कुटुंबवत्सल लोक जगती ।

कोणीकडे जातील हे ।

 

स्वामींच्या कार्याची महती समजल्यावर ठिकठिकाणांहून लोक दर्शनासाठी येऊ लागले. त्यांच्याकडून त्या त्या प्रांतातील वृत्तान्त स्वामी जाणून घेत. लोकांतील 'ब्राह्मण्य' गुणविशेष व आपली देवदेवालये कशी वाचवता येतील, ही चिंता स्वामींच्या मनात होती. जगातील सर्वांचे कल्याण कसे होईल, हे कुटुंबवत्सल लोक कुठेे जातील, त्यांना कोण आधार देईल, या प्रेरणांतून ते समाजसंघटनाकडे वळले. लोकसंग्रह कसा करावा, लोकांना सांभाळून समुदायाचे भले कसे करावे, संघटकांच्या अंगी असणाऱ्या गुणांवर चर्चा त्यांच्या वाङ्मयातून येते. समर्थांचा 'महंत' हा आध्यात्मिक पुढारी असला तरी त्याला समाज एकत्र आणण्यासाठी सामाजिक पुढाऱ्याची भूमिका बजवावी लागे. समर्थांच्या मते, नेत्यावर त्याच्या समुदायातील लोकांचा विश्वास तर हवाच, पण त्या समुदायाबाहेरील लोकांचाही त्याच्यावर विश्वास हवा. नेत्याची वृत्ती उदासीन आणि निःस्वार्थी असावी. त्याने नीती, न्याय कधीही सोडू नये. नेत्याने सर्वकाळ सर्वांशी नम्रतेने वागावे. त्याने अनेक ग्रंथांचा अभ्यास करावा. तसेच त्याचे पाठांतर उदंड असावे. त्याच्या अंगी परोपकारी वृत्ती असावी. एवढे सांगून झाल्यावर समर्थ जणू नेत्याच्या अंगी असलेल्या गुणांची परीक्षा पाहतात. समर्थ पुढे सांगतात की, "नेत्यालाही स्वतःचा असा प्रपंच असतो. त्याला स्वतःच्या प्रपंचातील गोष्टी नेटक्या सांभाळाव्या लागतात. तथापि त्याने आपल्या प्रापंचिक गोष्टी प्रपंचातून ठेवाव्यात. त्या राजकारणात आणू नयेत." (सामाजिक पुढारीपण करणाऱ्या नेत्याच्या अंगी जे चातुर्य लागते, त्याला समर्थ 'राजकारण' म्हणतात.)

 

नेत्याने चित्त एकाग्र करण्याचा अभ्यास करावा. चित्त एकाग्र केले की राजकारण व लोकसंग्रहाचे काम कसे पार पाडायचे याचे त्याला आकलन होते. लोकसंग्रहाचे काम करणाऱ्या नेत्याने मानसन्मानाची इच्छा करू नये. असा निःस्वार्थी नेता आपले काम झाले की तेथून निघून जातो. त्याच्या सत्कारासाठी तो शोधूनही सापडत नाही. आज मानसन्मानासाठी, सत्कारासाठी हपापलेले पुढारी पाहिले की, समर्थांची दृष्टी किती व्यापक होती याची कल्पना येते. समर्थ पुढे सांगतात, एका विशिष्ट कार्यासाठी नैतिक पातळीवर जो समूह एकत्र येतो, ते दुभंगणार नाही याची काळजी नेत्याने घ्यावी. अनुयायी लहान-मोठ्या चुका करतात. त्यांना सांभाळून घ्यावे. दुसऱ्यांचे अवगुण सर्वांसमक्ष बोलून दाखवू नये. पूर्वी काही कारणांनी माणसे दुखावली गेली असतील, तर त्यांची समजूत घालून नेत्याने परत त्यांना आपुल्या समुदायात आणावे. कठीण प्रसंगी नेत्याने शांत राहून अनुयायांनाही शांत राहण्यास शिकवावे. कुणाशीही अतिवाद घालू नये. अतिवादाने संघटनावर परिणाम होऊन ते तुटून नाश पावण्याची भीती असते. नेत्याने अनुयायांच्या सुखदुःखातसहभागी व्हावे. हे खरे असले तरी नेत्याने समाजाचे किती सोसायचे याला मर्यादा आहे. येथे एक महत्त्वाचा सल्ला स्वामी नेत्याला देतात. ते म्हणतात, "नेत्याने लोकांचे दुःख मर्यादेबाहेर सोसणे याला 'गुण' म्हणता येत नाही. अशामुळे आपली किंमत राहात नाही. समाजसंघटन करताना माणसाची नीट परीक्षा करून कोणाला जवळ करायचे, कोणाला दूर करायचे हे विवेकाने ठरवावे. जे मुळात तापट स्वभावाचे, समजून सांगूनही जे मनावर घेत नाहीत, अशांशी संबंध आला तर त्यांना सोडून देणे उत्तम." समर्थांनी या विषयावर बारकाईने विचार केला आहे. त्या विषयावर स्वतंत्रपणे एक 'दासबोध' झाला असता, तर तो पिढ्यान्पिढ्यांना मार्गदर्शक ठरला असता.

 

- सुरेश जाखडी