राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची घोषणा

    दिनांक  21-Aug-2019 14:20:31 


मर्झबान पटेल यांना 'द्रोणाचार्य' तर नितीन कीर्तने यांना 'ध्यानचंद' पुरस्कार


नवी दिल्ली : क्रीडा क्षेत्रातील सर्वोत्तम कामगिरीसाठी देण्यात येणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. महाराष्ट्रातील मर्झबान पटेल यांना हॉकीतील योगदानासाठी 'द्रोणाचार्य जीवनगौरव' तर नितीन कीर्तने यांना टेनिसमधील योगदानासाठी 'ध्यानचंद' पुरस्कार जाहीर झाला आहे. केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्रालयाच्या वतीने 'राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार २०१९' ची घोषणा करण्यात आली.

 

यंदाचा 'राजीव गांधी खेलरत्न' पुरस्कार कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि पॅरा ॲथलेटिक खेळाडू दीपा मलिक या दोघांना जाहीर झाला आहे, तर द्रोणाचार्य पुरस्कारासाठी तीन प्रशिक्षकांची निवड करण्यात आली आहे. अर्जुन पुरस्कारासाठी १९ खेळाडूंची निवड करण्यात आली आहे तर तीन ज्येष्ठ खेळाडूंना 'ध्यानचंद' पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. दोन संस्थांना राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार जाहीर झाले आहेत, तर चंदीगडच्या पंजाब विद्यापीठाला मौलाना अबुल कलाम आझाद चषकजाहीर झाला आहे.