जागावाटपावरून आंबेडकर-ओवैसींत ठिणगी?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Aug-2019
Total Views |



मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीत जागावाटपावरून वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम यांच्यात बिनसल्याची चर्चा सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळात आहे. एमआयएमने प्रकाश आंबेडकर यांच्याकडे मागितलेल्या १०० जागांच्या संभाव्य यादीमुळे दोन्ही पक्षांमध्ये गेल्या काही दिवसांत अविश्वासाचे वातावरण तयार झाल्याचे चित्र होते. यामुळे येत्या दि. २६ ऑगस्ट रोजी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमचे प्रमुख खा. असदुद्दीन ओवैसी यांच्यात चर्चा होणार आहे. हैदराबाद येथील एमआयएमचे मुख्यालय असलेल्या 'दारुस सलाम' येथे ही भेट होणार आहे.

 

सध्या दोन्ही पक्षांच्या संबंधाबाबत अविश्वास असताना तो निवळण्यासाठी ओवैसींनी प्रकाश आंबेडकरांना भेटायला एक विशेष दूत पाठविला. औरंगाबाद येथील एमआयएमचे नेते डॉ. गफ्फार कादरी यांच्यामार्फत ओवेसींनी एक विशेष संदेश आंबेडकरांसाठी पाठवला. काल मंगळवारी संध्याकाळी मुंबईतील वंचित बहुजन आघाडीच्या पक्ष कार्यालयात कादरी यांनी अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली. यावेळी डॉ. गफ्फार कादरी यांनी पक्षाचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी यांचे बंद लिफाफ्यातील एक विशेष पत्र प्रकाश आंबेडकरांकडे सुपूर्द केले. गेल्या महिन्यात दिल्ली येथे प्रकाश आंबेडकर, ओवैसी, एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष खा. इम्तियाज जलील आणि डॉ. गफ्फार कादरी यांच्यात बैठक झाली होती. यामध्ये दोन्ही पक्षांमध्ये जागावाटपासंदर्भात प्राथमिक चर्चा झाली होती. एमआयएमने वंचित बहुजन आघाडीच्या संसदीय समितीकडे १०० जागांची मागणी केली आहे. मात्र त्यावरूनच दोन पक्षांत विसंवादाचे वातावरण तयार झाले आहे. एमआयएमच्या जागासंदर्भातील संभाव्य मागणीवर वंचितने जाहीरपणे काही बोलणे टाळले होते.

 

लोकसभा निवडणुकीत दलित, मुस्लीम आणि ओबीसी फॉर्मुल्यामुळे औरंगाबादेत एमएमआयएमचे इम्तियाज जलील खासदार म्हणून निवडून आले. त्यानंतर प्रदेशाध्यक्षपदी नियुक्त झालेल्या जलील यांनी विधानसभेच्या १०० संभाव्य जागांची यादी वंचितच्या संसदीय मंडळाकडे दिली होती. या यादीत आंबेडकरांची ताकद असलेल्या ३ जागांचा समावेश आहे. अकोला जिल्ह्यात विधानसभेचे एकूण पाच मतदारसंघ आहेत. अकोला महापालिकेतील एक नगरसेवक वगळता एमआयएमची जिल्ह्यात कुठलीच ताकद नाही. एमआयएमच्या या यादीमुळे हे संबंध काही प्रमाणात ताणल्याचे म्हटले जात आहे.

@@AUTHORINFO_V1@@