ज्येष्ठ संगीतकार खय्याम यांचे निधन

20 Aug 2019 12:06:35

 


 

कभी कभी मेरे दिल में, खयाल आता हैं...या चिरतरुण गाण्याने प्रेक्षकांसाठी एक उत्कृष्ट संगीताचा नजराणा देणारे ज्येष्ठ संगीतकार मोहम्मद जहूर 'खय्याम' हाशमी म्हणजेच आपल्या सगळ्यांना ज्ञात असणारे खय्याम साहेब यांचे काल निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते. फुफ्फुसातील संसर्गामुळे त्यांना सुजय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर काल त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्याप्रती प्रेम व्यक्त करत चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

'कभी कभी', 'उमराव जान' यांसारख्या चित्रपटांना अविस्मरणीय बनवण्यात खय्याम साहेब यांचा खूप मोलाचा वाटा आहे. त्यांनी दिलेले संगीत हे त्यांच्याप्रमाणेच चिरतरुण आहे, जे प्रेक्षकांना कायम लक्षात राहील. त्यांच्या चित्रपटसृष्टीतील कार्याचा वारसा खूप मोठा आहे, जो संगीतकारांना नेहमीच प्रेरणा देत राहील.

१९४७ सालापासून खय्याम यांनी आपल्या सांगीतिक प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर 'कभी कभी मेरे दिल में', 'इन आंखों की मस्ती के दीवाने हजारों है', 'आजा रे ओ मेरे दिलबर आजा', 'मैं हर एक पल का शायर हूँ', 'वो सुबह कभी तो आएगी', 'जाने क्या ढूंढती रहती हैं ये आंखें मुझमें', 'बुझा दिए हैं खुद अपने हाथों, 'ठहरिए होश में आ लूं', 'तुम अपना रंजो गम अपनी परेशानी मुझे दे दो', 'शामे गम की कसम', 'बहारों मेरा जीवन भी संवारो' या आणि अशा कित्येक गाण्यांनी त्यांनी रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. आज त्यांच्या जाण्याने संगीतसृष्टीतील एक सुरेल स्वरमणी निखळला आहे.

Powered By Sangraha 9.0