भित्यापाठी ब्रह्मराक्षस!

    दिनांक  20-Aug-2019 21:15:48


 


आता अपूर्ण अवस्थेतला कोहिनूर स्क्वेअर टॉवर शिवसेना भवनासमोर उभा आहे. त्यामुळे उद्योजकतेपेक्षा हा राजकीय वजन वापरून झटपट नफा कमाविण्याचा धंदा होता, हे हळूहळू समोर येत आहे. या सगळ्याच उद्योगात राज ठाकरेंनी स्वत:ची विश्वासार्हता मात्र कमालीची गमावली.


राजकारणात अटक होणे किंवा तसे वातावरण निर्माण होणे याला एक राजकीय महत्त्व असते. राजकारणाच्या क्षेत्रात अशा अटका तर नवसंजीवनी मानल्या जातात. २००० साली छगन भुजबळांनी बाळासाहेब ठाकरेंना अटक करण्याचा प्रयत्न केला होता. शिवाजी पार्कच्या महापौर निवासात बाळासाहेबांना प्रातिनिधीक अटक झाली आणि प्रसंग आटोपला. पण, त्या दिवशी सकाळपासून दुपारपर्यंत मुंबई चांगलीच तापली होती. भुजबळ हे सगळे राजकीय सूडबुद्धीने करीत आहेत, अशी एक भावना जनसामान्यांमध्ये निर्माण झाली होती आणि सहानुभूतीची एक मोठी लहर बाळासाहेबांच्या बाजूने निर्माण झाली. अशीच राजकीय नाट्ये या देशात अनेकदा झाली आहेत. आणीबाणीच्या काळात जॉर्ज फर्नांडिस यांना झालेली अटक आणि त्यानंतर साखळदंड हाताच्या मुठीत गच्च आवळून उंचावलेला त्यांचा हात... जयललिता आणि करुणानिधी यांच्या राजकीय सूडाच्या नाट्यात एकमेकांना केलेल्या अटका. रात्री घरातून उचलून नेलेले करुणानिधीही आपल्या सगळ्यांना आठवत असतील. इंदिरा गांधींना अटक झाल्यावर त्यांनी तीन मूर्ती भवनसमोर मारलेली बसकण. या अशा कितीतरी मसालेदार राजकीय कथा या देशाने पाहिल्या आणि अनुभवल्या. या लढाया राजकीय वैराच्याच होत्या. पण, या प्रत्येक नेत्याकडे स्वत:चे असे काही नक्की होते. राजकीय अस्मिता होत्या. जयपराजयाच्या भावना होत्या. अन्य कुणासाठी राजकीय उठाठेवी करणारी ही मंडळी कधीच नव्हती. काँग्रेसच्या उमेदीच्या काळात या लढाऊ राजकीय नेत्यांनी स्वत:चे असे स्थान निर्माण केले, ते याच लढाऊपणातून!

 

हा सगळा तपशील आज आठविण्याचे कारण म्हणजे, राज ठाकरे यांना आलेली 'इडी'ची नोटीस. राज ठाकरे हा वलयांकित नेता. आजही त्यांच्या सभेला लाखोंची गर्दी हा हा म्हणता जमते. पण, ती राजकारणासाठी नव्हे, तर त्यांनी केलेल्या नकला आणि वक्तृत्वाचा मसालेदार नमुना म्हणून. राजकारणात अनेकदा सत्ताधारी पक्षाने केलेल्या या लढाया विरोधी पक्षातल्या लोकांना नवसंजीवनी देऊन जातात. भुजबळांच्या अटक नाट्याने त्यावेळी सत्तेच्या बाहेर असलेल्या शिवसेनेतील मरगळ झटकायला मदत केली होती. बाळासाहेबांशी निष्ठा बांधून असलेल्या कार्यकर्त्यांना त्वेषाने पेटून उठायला लावणारी ही घटना होती. शिवसेनेला त्याचा लाभच झाला. राज ठाकरेंच्या बाबतीत जे झाले, ते मात्र त्यांची घसरती प्रतिमा अजून गटांगळ्या खायला लागल्याचे सिद्ध करणारे ठरले. अद्याप, राज ठाकरेंनी झाल्या प्रकारावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. एका खाजगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या पत्नीने अशा नोटीस आपल्याला येत असतात, असे सांगून बाजू मारून नेण्याचा प्रयत्न केला, हा प्रयत्न केविलवाणा आहे, हे दिसत होते. त्यानंतर शिवसेनेतून मनसेत गेलेल्या बाळा नांदगावकर यांनी पत्रकार परिषद घेऊन आपण सहकार्य करणार असल्याचे सांगितले. काल 'ईडी'ची नोटीस राज ठाकरेंना दिली गेल्यानंतर ताबडतोब ठाणे बंद करणार असल्याची घोषणा करण्यात आली. त्यानंतर संपूर्ण मनसे राज ठाकरे यांच्यासोबत चौकशीसाठी जाणार असल्याचे सांगितले गेले. सोशल मीडियावर मनसेच्या पद्धतीने बेंडकुळ्या फुगवून दाखविण्याचे प्रकारही झाले. मात्र, मुख्यमंत्र्यांनी आपल्या पत्रकार परिषदेत कायदा-सुव्यवस्था बिघडविणाऱ्यांवर कडक कारवाई करणार असल्याचे सांगितले आणि नंतर सगळ्या प्रकरणाचा नूरच बदलला. बंद मागे घेण्यात आला. सोबत जाणाऱ्या कार्यकर्त्यांना आस्ते कदम येण्याचे फर्मान सुनावले गेले वर राज ठाकरेंची ही रणनीती आहे, असेही सांगितले गेले. मात्र, खरे प्रकरण काही औरच असल्याची चर्चा सुरू झाली.

 

राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडले आणि मनसेची निर्मिती करण्यात आली. त्यावेळी शिवसेनेच्या अंतर्गत राजकारणावर खूप चर्चा झाली होती. मुळात शिवसेना हा रस्त्यावर उतरून संघर्ष करणाऱ्यांचा पक्ष. त्याला लागणारी जिगर आणि जिद्द शिवसेनेने बाळासाहेबांकडून घेतली होती. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना काहींना मवाळ वाटली. पण, वस्तुत: राजकीय कार्यकर्त्यांच्या दृष्टीने तीच अधिक फलदायी ठरली. सेनेतून बाहेर पडलेल्या राज ठाकरेंच्या मागे जाणाऱ्यांना तत्काळ काही तरी मिळाले. मात्र, दूरगामी स्वरूपात अनेकांचे नुकसानच झाले. मनसेचा हा सगळा प्रवास अशाच प्रकारे अधोगतीकडे जात असतानाच आपल्या पक्षाला पुन्हा सचेतन करण्यासाठी राज ठाकरेंनी थेट मोदींनाच अंगावर घेतले. मूळ मुद्दा म्हणजे, याच मोदींच्या आरत्या ओवाळण्यासाठी राज ठाकरे सपत्नीक गुजरातला जाऊन पोहोचले होते. राजकारणातल्या माणसाला अशाप्रकारे बेताल वागता येत नाही. त्याला सर्वात आधी स्वत:ची विश्वासार्हता टिकवावी लागते. किमान आपल्या पाठीराख्यांना कळेल, अशा प्रकारची पारदर्शकता तरी मिळवावी लागते. राजकारण्यांनी व्यवसाय करायला हरकत नाही, पण एकंदरीतच आपल्या पाठीराख्यांना आपली बाजू मांडण्याकरिता तरी जागा ठेवावी लागते. राज ठाकरेंनी कोहिनूर मिलची जागा विकत घेतली, त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्राच्या भुवया उंचावल्या होत्या. बाळासाहेबांनी मग पुढे येऊन 'एक मराठी उद्योजक' वगैरे अशा प्रकारचा मुलामा या सगळ्याला दिला. मात्र, हा सगळा उद्योजकतेचा प्रकार नव्हताच. कारण, अगदी कमी कालावधीत राज ठाकरेंनी या कंपनीतून काढता पाय घेतला आणि त्या मोबदल्यात भरपूर मोबदलाही मिळविला. आता अपूर्ण अवस्थेतला कोहिनूर स्क्वेअर टॉवर शिवसेना भवनासमोर उभा आहे. त्यामुळे उद्योजकतेपेक्षा हा राजकीय वजन वापरून झटपट नफा कमाविण्याचा धंदा होता, हे हळूहळू समोर येत आहे. या सगळ्याच उद्योगात राज ठाकरेंनी स्वत:ची विश्वासार्हता मात्र कमालीची गमावली. कारण, ज्या सामाजिक स्तरातला मराठी तरुण राज ठाकरेंच्या पाठीमागे उभा होता, त्याला हा माणूस नेत्यापेक्षा 'बिल्डर' म्हणून दिसायला लागला. या सगळ्या प्रकरणात पुढे काय होईल, हे पाहणे औत्सुक्याचे असेल. पण, आपले आर्थिक व्यवहार पारदर्शक न ठेवल्याने 'ईडी'समोर जाण्याची वेळ आलेल्या राज ठाकरेंनी बचावाचा जो काही पवित्रा घेतला आहे, तो बचावापेक्षा कांगावाच भासायला लागला आहे. राजकारणात 'आरंभ' आणि 'अंत' असे काही नसते. इथे रावाचे रंक आणि रंकाचे राव होतात. मात्र, स्वत:चा विचार, कार्यकर्ता आणि सहानुभूतीदार यांच्याशी बेईमानी केल्यावर काय घडते, याचे राज ठाकरे उदाहरण ठरावे.