दोनशे खासदारांना सरकारी बंगले खाली करण्याचे मोदी सरकारचे आदेश

20 Aug 2019 17:23:18

 

नवी दिल्ली : खासदारकी गेल्यानंतरही सध्या वास्तव्यास असलेल्या दोनशे माजी खासदारांना आपले सरकारी बंगले खाली करण्याचे आदेश मोदी सरकारने दिले आहेत. बंगले खाली करण्यास येत्या सात दिवसांची मुदत देण्यात आली असून तीन दिवसांत या बंगल्याचा वीजपुरवठा, पाणीपुरवठा आणि गॅसपुरवठा तोडण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. लोकसभेच्या आवास समितीने याबाबतचा निर्णय घेतला असून समितीचे अध्यक्ष सीआर पाटील यांनी याबाबतची माहिती दिली.
 
  
 

 

खासदारकीचा कार्यकाळ संपल्यानंतर नियमानुसार एका महिन्याच्या आतमध्ये सरकारी बंगले व गाड्या खाली करणे अपेक्षित असते. मात्र सोळाव्या लोकसभेचा कार्यकाळ संपून चार महिन्याचा कालावधी झाला तरीही या माजी खासदारांनी अद्याप आपले बंगले खाली केले नाहीत. त्यामुळे आवास समितीच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला असल्याचे पाटील यांनी सांगितले. त्यामुळे येत्या सात दिवसांत या २०० माजी खासदारांना आपले सरकारी बंगले खाली करावे लागणार आहेत.
Powered By Sangraha 9.0