आयुष्मानच्या 'ड्रीम गर्ल' चित्रपटातील नवीन गाणे प्रदर्शित

    दिनांक  20-Aug-2019 15:58:31


 

राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त अभिनेता आयुष्मान खुराना नेहमीच स्वतःच्या क्षमतेला आव्हान देणाऱ्या भूमिका साकारत असतो. त्याच्या याच स्वभावाला अनुसरून 'ड्रीम गर्ल' हा त्याचा आगामी चित्रपट येत्या काळात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या पार्श्वभूमीवर आज या चित्रपटातील 'दिल का टेलिफोन' नावाचे कोरे करकरीत गाणे प्रदर्शित झाले. गाणे प्रदर्शित झाल्या झाल्याच त्याला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. विशेषतः आयुष्मानचे या गाण्यामधील हावभाव आणि अभिनय यांनी प्रेक्षकांना आकर्षित केले.

'दिल का टेलिफोन' हे गाणे कुमार यांनी शब्दबद्ध केले असून मीट ब्रोज यांनी गाण्याला संगीत दिले असून जॉनीता गांधी आणि नक्ष अझीझ यांनी या गाण्याला आपल्या आवाज दिला आहे. आयुष्मान खुराना या चित्रपटात एका वेगळ्याच भूमिकेत दिसणार आहे.

राज शांडिल्य दिग्दर्शित 'ड्रीम गर्ल' हा चित्रपट १३ सप्टेंबरला प्रदर्शित होईल. मात्र त्यापूर्वी आयुष्मानच्या चित्रपटातील भूमिकेमुळे प्रेक्षकवर्ग चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहे.