पूरग्रस्त भागात पसरली 'हॅप्पीवाली फिलिंग'

    दिनांक  20-Aug-2019 22:52:58अगदी बरोबर वाचलतं. मुंबईतील 'हॅप्पीवाली फिलिंग' नावाचा १४ जणांचा समूह पूरग्रस्त भागात मदत करणे, हे आपले कर्तव्य समजून पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, मिरज या भागात जीवनावश्यक वस्तूंच्या ७५० पाकिटांचे वाटप करत शुक्रवार ते रविवार दिवसभर घरोघरी किटरुपी 'हॅप्पीवाली फिलिंग' पसरवत होता.


आता तुम्ही विचार कराल इतकी मदत या तरुणांनी जमवली कशी? मुंबईत एकंदर १२ ठिकाणी या तरुणांनी मदत गोळा करण्याचे केंद्र उभे केले आणि आपल्या मित्रमंडळी, नातेवाईकांसोबत त्यांनी संपूर्ण मुंबईकरांना मदतीचा हात पुढे करण्याची विनंती केली आणि या याचनेला प्रतिसाद म्हणजे आठवड्याभरात एक मोठा ट्रक भरून त्यांनी मदतीचे सामान गोळा केले. दि. १५ ऑगस्ट रोजी या मुलांनी मोठ्या प्रमाणात आलेल्या या साहित्याचे लहान भागात वाटप केले. हा कार्यक्रम माझ्या राहत्या घराच्या इमारतीच्या पार्किंग लॉटमध्ये पार पडला. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार या एका किटमध्ये खाली नमूद गोष्टींचा समावेश होता - दोन किलो तांदूळ, एक किलो दळलेले गव्हाचे पीठ, बिस्कीटचे दोन पुडे, साबण, टूथपेस्ट, टूथब्रश, डेटॉल बॉटल, तुरटी पावडर, अंगवस्त्र, सॅनिटरी पॅड, पाण्याच्या दोन बॉटल, एक साडी, एक शर्ट इ. १५ ऑगस्ट रोजी रात्री म्हणजेच गुरुवारी हा ग्रुप उशिरा रात्री पश्चिम महाराष्ट्राच्या वाटेवर सज्ज झाली आणि शुक्रवारी पहाटे इस्लामपूर येथील नेरले गावात असणाऱ्या शिवशंभू वृद्धाश्रमात त्यांनी नियोजित थांबा घेतला. पुढील एक-दोन तासांमध्ये सांगलीच्या वाटेवर असणाऱ्या कृष्णा नदीच्या पत्रा शेजारी वसलेल्या गावाला भेट देण्यास सुरुवात केली. कारण, कटावर असणाऱ्या गावांना पुराची विशेष झळ पोहोचली असून तेथील पाणी लवकर न ओसरल्याने त्या गावांपर्यंत जास्त मदत पोहोचली नव्हती, या गोष्टीची त्यांनी विशेष दक्षता घेतली होती.

 

तीन दिवसांमध्ये नऊ गावे आणि २२ वाड्यांचा आकडा त्यांनी गाठला, हे कळताच थोङे थक्क व्हायला झाले. कारण, सांगली, मिरज येथील गावे मोठी आहेत आणि एका ट्रकमधील मदत नऊ गावांपर्यंत कशी पुरेल, असा प्रश्न आम्हाला पडला. मात्र नंतर आम्हाला वाटले की, मदत मर्यादित आहे. पण आमच्या ग्रुपने मोठ्या मेहनतीने ती गोळा केली होती आणि मदत देणाऱ्यांनी पण मोठ्या विश्वासाने ती आम्हाला पोहोच केली होती. त्यामुळे आम्हाला ती मदत फक्त गरजू हातातच सुपूर्द करायची होती आणि त्याचे संपूर्ण नियोजन मुंबईमध्ये असल्यापासून केले होते. मी माझ्या इस्लामपूर सांगली तसेच मिरज येथील स्थानिक मित्रांना माझ्या येण्याचे दिवस सांगितले होते आणि त्यानुसार मदत वाटण्याच्या ठिकाणची पाहणी करायला सांगितले होते. विशेष म्हणजे या किट वाटपासाठी आम्ही कुपन पद्धतीचा वापर केला. म्हणजे एखाद्या गावात वाटप करायचे असेल तर मी मित्रांसोबत दुचाकीवरून त्या गावातील घरटी जाऊन पाहणी करायचो. त्यांचे जे नुकसान झाले आहे त्या पद्धतीने त्यांना तितके कुपन द्यायचो आणि पुढील दहा मिनिटांमध्ये त्यांना त्यांच्या घराजवळील चौकात रांग लावायला सांगायचो आणि त्याप्रमाणे आमची मदत गाडी तिथे दाखल होऊन त्या कुपनच्या बदल्यात किटचे वाटप करायची. या उपक्रमामुळे दोन हेतू साध्य झाले. पहिला हेतू म्हणजे ज्याला गरज आहे अशा व्यक्तीला गडबड, गोंधळ न होता शांततेत मदत पोहोच झाली आणि दुसरा हेतू म्हणजे मला माझ्या टीमला गावातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचता आले आणि थोडा का होईना संवाद साधता आला, त्यांना धीर देता आला. तसेच समजा एका गावात १०० घरे आहेत, त्यातल्या फक्त ३० घरांना पुराचा फटका बसला आहे तर ते किट फक्त ३० घरांपर्यंत पोहोचवायचो आणि बाकींना पाणी आणि बिस्कीट वाटप करून निघायचो. या सगळ्यात आम्हाला सांगली, मिरज, तांबवे येथील ग्रामस्थांचा जीवंत प्रामाणिकपणा उघड्या डोळ्यांनी पाहायला मिळाला. या उपक्रमाला गावातील ग्रामस्थांचा आणि सरपंचाचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला आणि कळत नकळत 'हॅप्पीवाली फिलिंग'ची गाडी गावात आली की, गावकऱ्यांच्या चेहऱ्यावरदेखील नावाप्रमाणे 'हॅप्पीवाली फिलिंग' पाहायला मिळे. आम्ही समडोळी, कसबे डिग्रज, बोरगाव, बणेवाडी, फार्णेवाडी, ताकारी, नागराळे, रेठरे हरणाक्ष, बिचूद या नऊ गावांपर्यंत पोहोचलो आणि इथे पोहोचण्यासाठी खालील व्यक्तींची विशेष मदत माझ्या टीमला झाली.

 

 
 

. प्रतीक जयंत पाटील : माजी ग्रामविकास कॅबिनेट मंत्री जयंत पाटील यांचे चिरंजीव प्रतीक यांची या कार्यात नि:स्वार्थ मदत झाली.

. कवी विकास पाटील : इस्लामपुरात आपले चहाचे दुकान एक दिवस बंद ठेवून आमच्या सोबत प्रत्येक गावात फिरले आणि प्रत्येक वेळी योग्य ते मार्गदर्शन केले.

. मुकेश अगरवाल : खास पुण्याहून दोन दिवसांची सुट्टी घेऊन गावो गावी आपल्या आणखी एका मित्राच्या साथीने आमच्या सोबत फिरले.

. पवन पाखळे : ज्यांनी स्वतः बोरगाव ते जुनी ताकारी गावापर्यंत आमच्या सोबत राहून मार्गदर्शन केले. स्वतःच्या गाडीतून नागराळे येथील ४० कुटुंबांना आपले किट व्यवस्थित पोहोच केले.

. चेतन पडवळे : तशी तर फेसबुक मैत्री, पण वाटपाच्या दुसऱ्या दिवशी आजारी असूनसुद्धा खुद्द स्वतः गावो गावी उंबरठा गाठण्यात आमच्या सोबत सक्रिय सहभाग घेतला.

. प्रकाश पाटील : स्वतः पुराची झळ सोसत असले, तरी माणुसकी या नात्याने मला बिचूद गाव आणि सर्व वाड्यांपर्यंत पोहोचवले. विशेष म्हणजे स्वतःचे घर पण पाण्यात गेलेले असूनदेखील त्यांनी सांगितले, "माझी परिस्थिती चांगली आहे. माझ्यावरचे जे काही आहे ते अगदीच गरीब एखाद्या कुटुंबाला द्या."

. सर्व गावांचे सरपंच आणि ग्रामस्थ : आम्ही नऊ गावांपर्यंत आपली मदत पोहोचवली. त्या प्रत्येक गावच्या सरपंचांकडून आणि ग्रामस्थांकडून लाभलेल्या सहकार्यामुळे कार्य यशस्वीपणे संपन्न होऊ शकले.

. शिव शंभू वृद्धाश्रम ( नेरले ) : ज्यांनी आमच्या दोन दिवसांच्या राहण्याची आणि जेवण्याची व्यवस्था केली.

 

अगदी शेवटी मला खालील व्यक्ती / संस्थांचे आभार मानायचे आहेत. कारण, या एकंदरीत मदतीत त्यांचा वाटा हा खूप महत्त्वाचा आहे.

 

.शेतकरी शिक्षण संस्था कॉलेज, घणसोली.

.विक्रोळीचा कैवारी गणेश मंडळ.

. सोलापूर ते अक्कलकोट वारी स्वामी भक्त ग्रुप.

. माझा मित्रपरिवार आणि जवळील इमारतीतील ग्रुप आणि संपूर्ण टीम 'हॅप्पीवाली फिलिंग.'

तुम्हा सगळ्यांच्या साहाय्याशिवाय पश्चिम महाराष्ट्रात 'हॅप्पीवाली फिलिंग' पसरवणे शक्य झाले नसते.

 

बिचूद गावातील सरपंचांचे मनाला सुखावून गेलेले शब्द

 

"स्थलांतरानंतर आमच्यापर्यंत मदतीचे हात पोहोचले होते खरे, पण तुम्ही आणि तुमच्या टीमने फक्त वस्तुरुपी मदत न करता घरा-घरातील लोकांना आधार दिलात, त्यांच्याशी प्रत्यक्ष बोलून नावाप्रमाणे प्रत्येकाला 'हॅप्पीवाली फिलिंग' दिलीत. अशी मदत झाली नव्हती आणि बहुधा अशा नियोजित पद्धतीत होईल याची शंकाच आहे! या पुढेही मदतरूपी नाही तर कायमस्वरूपी आनंदरुपी 'हॅप्पीवाली फिलिंग' भेटायला आली तर आवडेल आम्हा ग्रामस्थांना.

 

- विजय माने