मेट्रो-३ चे १५ वे भुयार पूर्ण

02 Aug 2019 18:04:50

 


५० टक्यांपेक्षा अधिक भुयारीकरणाची प्रक्रिया फत्ते

 

मुंबई ( विशेष प्रतिनिधी ) : 'कुलाबा-वांद्रे-सीप्झ' या 'मेट्रो-३' भुयारी मार्गिकेतील १५ व्या भुयाराचे काम शुक्रवारी पूर्ण झाले. 'आझाद मैदान ते मुंबई सेंट्रल' दरम्यान असलेले हे ३ किमीचे भुयार आहे. 'वैतरणा-१' या 'टनल बोअरिंग मशीन'ने (टीबीएम) २० महिन्यांमध्ये हे भुयार खणून पूर्ण केले. 'मेट्रो-३' च्या निर्माण कार्यात भुयारीकरणाचे काम पॅकेजनुसार सुरू असून एका पॅकेजचे सलग भुयारीकरण करणारी 'वैतरणा-१' ही पहिलीच 'टीबीएम' आहे.
 
 

देशातील पहिल्या पूर्णत: भुयारी मेट्रो मार्गिकेच्या निर्मितीचे काम शहरात सध्या वेगाने सुरू आहे. यासाठी जमिनीपासून ३० ते २० मीटर खाली भूगर्भात १७ 'टीबीएम' यंत्रे कार्यरत आहेत. आजवर 'मेट्रो-३' चे ५० टक्क्यांहून अधिक भुयारीकरण पूर्ण झाले आहे. या कामाअंतर्गत जमिनीखाली दोन भुयारे खणण्यात येत आहेत. या संपूर्ण प्रकल्पाची लांबी ५२ किमीची असून शुक्रवारी त्यापैकी ३१ किमीचे भुयारीकरण पूर्ण झाले. आझाद मैदान येथून डिसेंबर,२०१७ मध्ये भूगर्भात सोडलेले 'वैतरणा-१' हे 'टीबीएम' शुक्रवारी मुंबई सेंट्रल येथून बाहेर पडले. यावेळी पार पडलेल्या छोटेखानी कार्यक्रमाला राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता, पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार गुप्ता आणि 'मेट्रो-३'च्या व्यवस्थापकीय संचालिका अश्विनी भिडे उपस्थित होत्या.

 
 

गेल्या दीड वर्षांमध्ये 'वैतरणा-१' या यंत्राने ३.८१४ किमीचे भुयारीकरण पूर्ण केले. यादरम्यान यंत्राचा भुयारीकरणाचा वेग १९० मी प्रती महिना होता. त्याने भूगर्भात २० मीटर खाली बेसाल्ट आणि ब्रेसिया या कठीण दगडातून मार्गक्रमण केले. याकरिता २७२० सेगमेंट रिंगचा वापर करण्यात आला. 'मेट्रो-३'च्या भुयारीकरणामधील ही आव्हानात्मक प्रकिया होती. कारण, 'वैतरणा-१'च्या मार्गात १४ उंच इमारती, २८ ऐतिहासिक वारसा वास्तू आणि अतिशय जुन्या इमारतींचा समावेश होता. परंतु, सुरक्षिततेची पूर्ण काळजी घेऊन भुयारीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले. महत्वाचे म्हणजे, एका पॅकेजमध्ये सलग भुयारीकरण करणारे 'वैतरणा-१' हे पहिले 'टीबीएम' ठरले आहे. 'मेट्रो-३'च्या भुयारीकरणाचे काम ७ पॅकेजमध्ये विभागले आहे. या पॅकेजमध्ये टप्याटप्याने भुयारीकरणाचे काम केले जाते. मात्र पॅकेज २ मध्ये 'वैतरणा-१' 'टीबीएम'ने आझाद मैदानापासून मुंबई सेंट्रलपर्यंत सलग भुयारीकरण केले. मुंबई सेंट्रलचे मेट्रो स्थानक पश्चिम रेल्वेवरील मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानक आणि एसटी डेपोजवळ आहे. त्यामुळे मेट्रोचे हे स्थानक प्रवाशांना सुलभ सेवा प्रदान करेल.


वैतरणा-१ च्या माध्यमातून पूर्ण झालेली भुयारीकरणाची प्रक्रिया अतिशय आव्हानात्मक काम होती. परंतु पॅकेज-२ चे काम आम्ही दिलेल्या वेळेत पुर्ण केल्याने आमचा आत्मविश्वास दुणावला आहे. -

                                                                                                                            अश्विनी भिडे, व्यवस्थापकीय संचालिका
 
Powered By Sangraha 9.0