मार्च २०२३मध्ये धावणार देशातील पहिली 'रॅपिड ट्रेन'

    दिनांक  02-Aug-2019 11:21:18
 


नवी दिल्ली : काही तासांचा रेल्वे प्रवास अवघ्या काही मिनिटांत करणे आता शक्य होणार आहे. गाझियाबाद येथील साहिबाबाद या स्थानकातून देशातील सर्वात वेगवान रेल्वे गाडी धावणार आहे. रेल रॅपिड ट्रांझिट सिस्टम (आरआरटीएस) दिल्ली ते मेरठ कॉरीडोअर या १७ किमीच्या परिसरातील प्रवास वेगवान होणार आहे. मार्च २०२३मध्ये या गाडीला हिरवा कंदिल दाखवला जाणार आहे.

 

एनसीआर ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२३ पर्यंत दिल्ली ते मेरठ हा पल्ला तयार होणार आहे. संपूर्ण कॉरिडोअर २०२५ पर्यंत पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे. गेल्या चार महिन्यांपासून कामाला सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात साहिबाबाद ते दुहाई या टप्प्याची निर्मिती केली जाणार आहे, त्यात गुलधर आणि गाझियाबाद स्थानके असणार आहेत. दुहाई येथे आगाराचीही बांधणी केली जाणार आहे.

 

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, साहिबाबाद ते दुहाई हा टप्पा २०२३ पर्यंत पूर्ण होईल, उर्वरित कॉरिडोअरची निर्मिती २०२५ पर्यंत पूर्ण केली जाणार आहे. यामुळे दिल्ली ते मेरठ हा रेल्वे प्रवास एका तासांत पूर्ण होणार आहे. या प्रकल्पानंतर परिसरातील विकासालाही चालना मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.