'या' दोन भारतीय अधिकाऱ्यांनी पाकिस्तानची अक्षरशः कोंडी केली

    दिनांक  19-Aug-2019 10:55:47
 
 

इम्तियाज हुसेन, शाहीद चौधरींचा पाकला जबर दणका

 


श्रीनगर : काश्मीरमधील आयपीएस अधिकारी इम्तियाज हुसेन आणि आयएएस अधिकारी शाहीद चौधरी या दोन अधिकार्‍यांनी सध्या पाकिस्तानला अक्षरश: जेरीस आणले आहे. या दोन बुद्धिमान व कर्तव्यनिष्ठ अधिकार्‍यांनी पाकिस्तानचे दात त्यांच्याच घशात घातले आहेत. एवढेच नव्हे, तर पाकिस्तानच्या अपप्रचाराचा एकूण एक मुद्दा ते असा काही उधळून लावत आहेत की, त्यामुळे पाकी मुत्सद्दी केवळ हातावर हात चोळत बसले आहेत.

काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे 'कलम ३७०' आणि कलम '३५ अ' हटवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतल्यानंतर काश्मीरमध्ये हिंसाचार होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, सरकारने केलेली पूर्वतयारी आणि चोख बंदोबस्तामुळे काश्मीरमध्ये अशांतता माजवण्याचे फुटीरतावादी आणि पाकिस्तानचे प्रयत्न फोल ठरले आहेत. त्यामुळे आता काश्मिरी जनतेमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण करण्यासाठी पाकिस्तानकडून सोशल मीडियावर खोटी माहिती पसरवली जात आहे. मात्र, येथेही इम्तियाज हुसेन आणि शाहीद चौधरी हे तडफदार अधिकारी पाकिस्तानचा दांभिकपणा चव्हाट्यावर आणत आहेत.

 

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात धडाकेबाज कारवाई करणारे श्रीनगर येथे तैनात असलेले आयपीएस अधिकारी इम्तियाज हुसेन सबळ पुरावे आणि तर्कांच्या आधारावर पाकिस्तानच्या खोटेपणाला सोशल मीडियावर उघडे पाडत आहेत. तसेच, आपल्या तिखट प्रत्युत्तराद्वारे पाकिस्तानी ट्रोलर्सवर जोरदार पलटवार करत आहेत. भारताच्या स्वातंत्र्य दिनी काळा दिवस पाळण्याच्या पाक पंतप्रधान इमरान खानच्या आवाहनाचीही हुसेन यांनी खिल्ली उडवली आहे. “सर्व प्रकारची आक्रमकता, दहशतवाद आणि भडकविण्याचे एवढे प्रयत्न करूनही पाकिस्तान सरकार काश्मीर बळकावू शकत नाही. आता ट्विटरवरून असे प्रयत्न करत असतील तर त्यांना ते करू द्या,” असा टोला इम्तियाज हुसेन यांनी हाणला आहे.

 

आयएएस अधिकारी शाहीद चौधरीदेखील पाकिस्तानचा खोटारडेपणा उघडा पाडत आहेत. काश्मीरमध्ये परिस्थिती बिघडलेली असून, लोकांना ठार मारले जात असल्याचा खोटारडा दावा पाकिस्तानकडून जगभरात करण्यात येत आहे. मात्र, शाहीद चौधरी वस्तुस्थिती आणि प्रत्यक्ष चित्रफितींच्या माध्यमातून काश्मीरमधील शांत परिस्थिती जगाला दाखवत आहेत. काश्मीरमधील रुग्णालयातील फोन बंद असल्याचा एका विदेशी पत्रकाराने केलेला दावा त्यांनी पुराव्यानिशी खोडून काढला असून अफवा न पसरविण्याचा सल्ला संबंधित पत्रकाराला दिला आहे. तसेच ते सातत्याने ट्विट करून श्रीनगरमधील परिस्थितीची ताजी माहिती देत आहेत व अडचणीत सापडलेल्या लोकांना मदतही करत आहेत.