कोंडून ठेवलेल्या उदमांजराची येऊर वनाधिकाऱ्यांनी केली सुटका

18 Aug 2019 22:44:58


 

दहा दिवसांपासून उदमांजर आरोपीच्या ताब्यात


मुंबई (विशेष प्रतिनिधी) - येऊर वनाधिकाऱ्यांनी ठाण्याच्या येऊर गावामधून एका इसमाने घरात कोंडून ठेवलेल्या उदमांजराच्या पिल्लाची सुटका केली आहे. ही कारवाई रविवारी सायंकाळी पार पडली. या इसमाने 'संजय गांधी राष्ट्रीय उद्याना'च्या वनक्षेत्रामधून उदमांजराचे पिल्लू पकडले होते. वन अधिकाऱ्यांनी इसमास ताब्यात घेतले असून त्याच्यावर 'वन्यजीव संरक्षण कायद्या'अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 
 
 
 

गेल्या काही महिन्यांपासून बोरिवलीच्या 'संजय गांधी राष्ट्रीय उद्याना'च्या येऊर वनपरिक्षेत्रात वन्यजीव गुन्हे संदर्भातील घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे येऊरच्या वनाधिकाऱ्यांनी वन्यजीव गुन्ह्यांविरोधात धडक कारवाईस सुरुवात केली आहे. अशीच एक कारवाई वन अधिकाऱ्यांनी रविवारी सायंकाळी येऊर गावामध्ये केली. गावात राहणाऱ्या महेंद्र चंदर फुफाणे या व्यक्तीने उदमांजर पकडल्याची माहिती वनाधिकाऱ्यांनी मिळाली होती. त्यानुसार फुफाणेेच्या घरावर सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास धाड मारण्यात आली. यावेळी वनाधिकाऱ्यांना घरामधील एका प्लास्टिकच्या टोपलीत उदमांजराचे लहान पिल्लू आढळून आले. हे पिल्लू पाम सिवेट या प्रजातीचे आहे.

 

 
 

आरोपी फुफाणेने १० दिवसांपूर्वी उदमांजराच्या या पिल्लाला येऊर पूर्वेकडील वनक्षेत्रामधून पकडल्याची माहिती येऊरचे वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्र पवार यांनी 'मुंबई तरुण भारत'ला दिली. गेल्या दहा दिवासांपासून हे पिल्लू त्याच्याजवळ होते. त्यामुळे तो या पिल्लाचे नेमके काय करणार होता, यासंदर्भात चौकशी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, आरोपी या पिल्लाला विकण्याच्या किंवा मारण्याच्या तयारीत असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. वन्यजीव संरक्षण कायदा, १९७२ अंतर्गत उदमांजराला दुसऱ्या श्रेणीत संरक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे त्याची शिकार करणे, पकडणे आणि तस्करी करणे गुन्हा आहे. अशा गुन्ह्यातील आरोपींना तीन ते सात वर्षांची शिक्षा होऊ शकते. तसेच राष्ट्रीय उद्यानाच्या परिक्षेत्रात विनापरवानगी प्रवेश करणे, संरक्षित वन्यजीवांना पकडणे व त्यांना बंदिस्त करुन ठेवणे हादेखील कायद्याने गुन्हा आहे. त्यामुळे आरोपी फुफाणेने हे सर्व गुन्हे केल्याने त्याच्याविरोधात 'वन्यजीव संरक्षण कायद्या'नुसार वनगुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही संपूर्ण कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्र पवार, परिमंडळ अधिकारी सुजय कोळी, विकास कदम, रमाकांत मोरे, वनरक्षक अमित राणे, राजन खरात, जितेंद्र देशमुख आणि भगवान भगत यांनी केली.


वन्यजीव व पर्यावरण विषयक मजकूरासाठी लाईक करा...

facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat


Powered By Sangraha 9.0