योगदौड'निमित्त धावली नवी मुंबई : 'वर्ल्ड आयुष एक्स्पो २०१९' योगाथॉनमध्ये आबालवृद्धांचा उत्स्फूर्त सहभाग

    दिनांक  18-Aug-2019 13:09:58
 
 

नवी मुंबई (विशेष प्रतिनिधी) : योग जनजागृतीसाठी  'वर्ल्ड आयुष एक्स्पो २०१९ आणि आरोग्य' नवी मुंबईतील गणपत तांडेल मैदान, सीवुड्स येथे घेण्यात आलेल्या 'योगदौडमध्ये आबालवृद्धांसह नवी मुंबईतील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह अनेक ज्येष्ठ नागरिकांनी या योगदौडमध्ये सहभागी होत योग आणि 'वर्ल्ड आयुष एक्स्पो २०१९' या कार्यक्रमाबद्दल जनजागृती केली.
 

 

'वर्ल्ड आयुष एक्स्पो २०१९ आणि आरोग्य' चे आयोजन समिती अध्यक्ष आ. प्रशांत ठाकूर आणि बेलापूर विधानसभा मतदार संघ आमदार मंदा म्हात्रे यांनी ध्वज फडकवत योगदौडची सुरुवात केली. तीन, पाच आणि सात किलोमीटरच्या या योगदौडमध्ये महिला आणि पुरुष अशा विविध गटांमध्ये हजारो स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. रविवार सुटीचा दिवस असतानाही पहाटे सहा वाजल्यापासूनच स्पर्धकांनी नोंदणीसाठी तुफान गर्दी केली होती.
 

 

केंद्र सरकारचे आयुष मंत्रालय, राज्य सरकार, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, भारतीय चिकित्सा परिषद, सिडको, नवी मुंबई महापालिका, डॉ. जी. डी. पोळ फाऊंडेशन, डॉ. डी. वाय पाटील विद्यापीठ आदींच्या संयुक्त विद्यमाने आणि आ. प्रशांत ठाकूर व मंदा म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केल्या जाणाऱ्या 'वर्ल्ड आयुष एक्स्पो २०१९' आणि आरोग्य या कार्यक्रमाबद्दल माहिती स्पर्धकांना देण्यात आली. दि. २२ ते २५ ऑगस्ट दरम्यान सकाळी ९ ते सायंकाळी ९ पर्यंत वाशी येथील सिडको एक्झिबिशन सेंटर येथे होणाऱ्या या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी उत्सुक असल्याची प्रतिक्रिया स्पर्धकांनी यावेळी दिली. योगदौड स्पर्धेमध्ये विजयी झालेल्या विविध गटातील स्पर्धकांचा चषक, पदक आणि प्रमाणपत्राद्वारे गौरव करण्यात आला. सहभागी विद्यार्थ्यांनाही डॉ. जी. डी. पोळ फाऊंडेशनतर्फे प्रमाणपत्र वितरित केले जाणार आहे.

 

 

विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन


आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी, योग, निसर्गोपचार आणि सिद्ध (आयुष) या चिकित्सापद्धतींना आणि या क्षेत्रातील मान्यवरांना एकत्रित आणत या क्षेत्रातील विविध संधी आणि आव्हाने यांची माहिती दिली जाणार आहे. मेडिकल जर्नालिझम आणि मेडिकल टुरिझम आदीसारख्या विविध विषयांची माहिती या कार्यक्रमानिमित्त दिली जाणार आहे.


उद्घाटनाला मान्यवरांची उपस्थिती

कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण देण्यात आले आहे. आयुषमंत्री श्रीपाद नाईक, परराष्ट्र राज्यमंत्री मुरलीधरन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदी मान्यवर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी असणार आहेत. कार्यक्रमावेळी या क्षेत्रातील विद्यार्थी, संस्थांचे प्रतिनिधी यांच्यासह सर्वसामान्य नागरिक उपस्थित राहावे, असे आवाहन कार्यक्रमाच्या आयोजन समितीचे अध्यक्ष आ. प्रशांत ठाकूर आणि सचिव डॉ. विष्णू बावने यांनी केले आहे.

 

योगदौडच्या निमित्ताने नवी मुंबईकर हे आरोग्याबद्दल जागरूक असल्याचे समजले. 'वर्ल्ड आयुष एक्स्पो २०१९ आणि आरोग्य' हा आंतरराष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रम नवी मुंबईत होत असून आयुष मंत्रालयातर्फे नागरिकांसाठी एक अनोखी संधी दिली जात आहे. 'आयुष' क्षेत्रातील माहिती आणि महाआरोग्य शिबिरांचा लाभ नागरिकांनी घ्यायला हवा. आमदार प्रशांत ठाकूर, वर्ल्ड आयुष एक्सो २०१९ आयोजन समिती अध्यक्ष

 

माझ्या मतदार संघातील युवा आणि ज्येष्ठ नागरिकांचा योगदौडमधला उत्साह पाहून आनंद झाला. इतकाच उत्साह नागरिकांनी 'वर्ल्ड आयुष एक्स्पो २०१९ आणि आरोग्य' या संमेलनावेळीही दाखवावा, असे आमचे आवाहन आहे.

- आमदार मंदा म्हात्रे, बेलापूर विधानसभा मतदार संघ