कल्पनाविलासच बरा

    दिनांक  18-Aug-2019 16:40:55   

 

 
महासत्तेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मनात सध्या एका नवीनच कल्पनेने जन्म घेतला आहे. ती कल्पना म्हणजे ग्रीनलँड बेट विकत घेण्याचा विचार सध्या ट्रम्प महाशय करत आहेत. हे बेट विकत घेण्याबाबतची चाचपणी करण्याचे आदेश ट्रम्प यांनी आपल्या सल्लागारांना दिले असल्याची बातमी ‘दी वॉल स्ट्रीट जर्नल’ने दिली असल्याचे वृत्त आहे. मात्र, ट्रम्प यांच्या या प्रस्तावाबाबत व्हाईट हाऊसची अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. असे असले तरी, ट्रम्प असा विचार करू शकतात याची शक्यता जास्तच आहे.
 
 

मानवी मन कल्पनाच्या हिंदोळ्यावर झुलत सहजरित्या एका ठिकाणाहून दुसर्‍या ठकाणी जात असते. कल्पना करणे वाईट नाहीच. मात्र, आपली कल्पना जर अस्थैर्य निर्माण करणारी ठरणार असेल तर मात्र त्यावर भाष्य होणे आणि त्याबाबत विविध मतमतांतरे समोर येणे, ही एक स्वाभाविक नैसर्गिक क्रिया होणे क्रमप्राप्त आहे. कल्पना आणि वास्तव यांच्यात तसे पाहिले तर बरेच अंतर असते. मात्र, जेव्हा महासत्तेचा सत्ताधीश आपली कल्पना मांडतो आणि ती साकारण्यासाठी प्रयत्न सुरू करतो तेव्हा मात्र, कल्पना आणि वास्तव यातील रेषा पुसट होण्यास सुरुवात होते. या सर्व बाबींचा ऊहापोह करण्याचे कारण इतकेच की, महासत्तेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मनात सध्या एका नवीनच कल्पनेने जन्म घेतला आहे. ती कल्पना म्हणजे ग्रीनलँड बेट विकत घेण्याचा विचार सध्या ट्रम्प महाशय करत आहेत. हे बेट विकत घेण्याबाबतची चाचपणी करण्याचे आदेश ट्रम्प यांनी आपल्या सल्लागारांना दिले असल्याची बातमी ‘दी वॉल स्ट्रीट जर्नल’ने दिली असल्याचे वृत्त आहे. मात्र, ट्रम्प यांच्या या प्रस्तावाबाबत व्हाईट हाऊसची अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. असे असले तरी, ट्रम्प असा विचार करू शकतात याची शक्यता जास्तच आहे. कारण, यापूर्वीदेखील त्यांनी उत्तर कोरियातील बंदरे ताब्यात घेण्याची इच्छा प्रदर्शित केली होती.

 
 

मात्र, मुळात येथे प्रश्न काय, कार्यवाही केली किंवा नाही यापेक्षा मनस्वी अभिलाषा उत्पन्न होण्याचा आणि त्यातून निर्माण होणार्‍या संभाव्य समस्यांचा आहे. जगाच्या इतिहासात सरंजामशाही, जमादारशाही आणि राजेशाही यांच्यामुळे निर्माण झालेले संघर्ष संपूर्ण विश्वाने अनुभवले आहेत. जगाच्या एका कोपर्‍यातील प्रदेशावर एका विशिष्ट अभिलाषेचा ध्यास धरत आपली हुकूमत निर्माण करणे आणि संपूर्ण जगाचे स्वामित्व बाळगणे, ही आसुसलेली वृत्ती सिकंदरमध्येदेखील दिसून आली आणि त्याची झळ सर्वसामान्य नागरिकांना बसली. आज ट्रम्प यांच्या मनात येणारी अशी कल्पना म्हणजे त्याच अभिलाषेचा एक भाग तर नाही ना, अशी शक्यता निर्माण होण्यास नक्कीच जास्त वाव देत आहे. आज जगातील बहुतांश देशांत लोकशाही नांदत आहे. अनेक स्वयंसेवी संस्था, संयुक्त राष्ट्र संघटनेसारख्या संघटना या विश्वातील राष्ट्रांत संघर्ष निर्माण होऊ नये, निर्माण झालेले संघर्ष सामोपचाराने मिटावे यासाठी प्रयत्नरत आहेत. अशा वातावरणात ट्रम्प सरंजामशाहीचे नवे बीज या आधुनिक जगात रोवू इच्छित आहेत काय, हा प्रश्न यानिमिताने पुढे येत आहे.

 
 

ग्रीनलँड हा देश नैसर्गिक साधनसंपत्तीने समृद्ध असा देश आहे. येथील सुमारे ८५ टक्के भाग हा १.९ मैल जाड बर्फाने व्यापला आहे. त्यामुळे जगातील १० टक्के पाणी येथे असून हे जगातील मोठ्या बेटांपैकी एक बेट आहे. मात्र, जागतिक हवामान बदलाच्या परिणामांचा फटका ग्रीनलँडलादेखील बसत आहे. अशा स्थितीत जगात महासत्ता म्हणून मिरवत असताना जगाचे पालकत्व या नात्याने अमेरिकेने आणि पर्यायाने ट्रम्प यांनीदेखील ग्रीनलँडमधील नैसर्गिक साधनसंपत्तीचे संरक्षण कसे होईल, यासाठी संघटित आणि सामूहिक प्रयत्नांची दिशा ठरविण्याकरिता कल्पना आणि नियोजन करणे जास्त संयुक्तिक ठरेल. तसेच, ग्रीनलँडसारख्या बेटांना हवामान बदलाच्या परिणामांचा फटका बसत आहे. अशा स्थितीत संभाव्य धोका लक्षात घेत जागतिक हवामानासंबंधी आपणास काय आणि कसे योगदान देता येईल, याबाबत विचार करणे आणि तशी कृती प्रत्यक्षात आणणे, हे महासत्ता म्हणून अपेक्षित आहे.

 
 

आधी नमूद केल्याप्रमाणे कल्पना करण्यास काहीच हरकत नाही, मात्र त्या कल्पनांचा परीघ हा मानवतेच्या आणि सौहार्दतेच्या अक्षाशी जोडलेला असणे आवश्यक आहे. ट्रम्प यांच्या आजवरच्या कार्यपद्धतीनुसार असा काही भाव त्यांच्या कल्पनेत असण्याची शक्यता धूसरच वाटते. मात्र, त्यांच्या कल्पनेत महासत्तेचा साम्राज्यविस्तार धोरण असण्याची शक्यता जास्त वाटते. त्यामुळे जर, ट्रम्प यांनी आपली कल्पना प्रत्यक्षात आणली तर, मात्र जग पुन्हा स्वामित्व आणि गुलाम यांच्या दिशेने वाटचाल करण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे ट्रम्प यांनी केवळ कल्पनाविलासच केलेला बरा, कृती करू नये, हीच अपेक्षा. दरम्यान, ग्रीनलँड या देशाने आपण विक्रीसाठी उपलब्ध नाहीत, असेही नुकतेच सांगितले आहे, हेही इथे लक्षात घेतले पाहिजे.