त्यांना तुरुंगात टाकायचे स्वप्न

18 Aug 2019 21:32:37

 

 

आम्ही सत्तेत आलो की असं करू, तसं करू, याची मी मनातल्या मनात किती जुळवणी केली आहे. मला ना त्या रा. स्व. संघाच्या सरसंघचालकांना तुरुंगात टाकायचं आहे. त्यांच्याकडे एके ४७ आहे म्हणे. तशी मी काही ती पाहिली नाही. पण सवयीनुसार बोललो आपला. काही लोक म्हणतात, मी शुद्धीत नसतो. काय करणार? खरेच नसतो. मला ना रा. स्व. संघाच्या नावाने शिव्या देण्याची नशा आहे. मागे पण मी म्हटलेले की, मला त्या सरसंघचालकांना तुरुंगात टाकायचे आहे. पण लोक असे आहेत ना? मला सत्ताच देत नाहीत. अर्थात त्यांना तुरुंगात का टाकायचे, ते माहिती नाही. पण, त्यांचे नाव घ्यावेच लागते. कसे आहे ना? त्यांची ती संघटना, त्यांचे ते लोक... या सगळ्यांबद्दल काहीबाही बोलले तरच माझे नाव पेपरात येते. मग घ्यावेच लागते. काय पण माणसं आहेत ती, त्यांचं नाव घेऊन म्हणजे त्यांना शिव्या देऊन देऊन मी किती फेमस झालो. इतका फेमस, इतका फेमस की मला वाटते, अरे हे मी पहिले का केले नाही? असू दे... जाऊ दे मनच ते, शांत राहतच नाही.

 

त्यामुळे सत्तास्वप्न पडत आहेत. सत्ता तर मिळत नाही, पण मनाला काय सांगायचे? जळगावच्या बहिणाबाईने तर म्हटलेच ना की, मन उभ्या पिकातले ढोर आहे. मी तर म्हणेन चोरपण आहे. चोरच काय? चोरावर मोरपण आहे. कसे म्हणता? त्याचे काय? माझा वंचित शोषितांचा पक्ष, मला खासदार निवडून आणायचे होते. सत्तेत रिपब्लिकन पक्षाला आम्ही त्यांचे मतदार चोरणारे वाटलो. पण आम्हा चोरावरही मोर झाला तो ओवैसींचा पक्ष. मी खुद्द माझ्या घरात हरलो, सोलापूरच्या दारातही हरलो. पण ओवैसींच्या पक्षाचा खासदार जिंकला. चोरावर मोर झाला, असे काही लोक म्हणतात. पण मी काय म्हणत होतो की, मला या मोराच्या लोकांनी पिसं दिली नाहीत. सॉरी, पिसं नव्हे मतं दिली नाहीत, असे मला वाटते. पण सांगायची सोय नाही. या चोरावरच्या मोरांना खुश करायचे आहे. कसे खुश करायचे, तर त्यासाठीही संघ येई कामा. मी रा. स्व. संघ आणि त्यांच्या लोकांना वेड्याबागड्यासारखे काहीही बडबडलो तर ते खुश होतात, असे मला वाटते. बाकी मला माहिती आहे, माझे स्वतःचे निवडून यायचे वांधे आहेत, तर जिंकून येऊन त्यांना तुरुंगात टाकणे म्हणजे स्वप्नरंजनच आहे.

 

 
काँग्रेसी बडे गुलाम-छोटे गुलाम

 

काँग्रेसचे गुलाम. कोणते गुलाम तर इथेही बडे गुलाम मियाँ आणि छोटे गुलाम मियाँ आहेत. बडे गुलाम मियाँ म्हणजे गुलाम नबी आझाद तर छोटे गुलाम मियाँ म्हणजे काँग्रेसीचे जम्मू-काश्मीरचे प्रदेश अध्यक्ष गुलाम अहमद मीर. आता नावातच गुलाम असल्यावर विचारधारा स्वतंत्र असण्याची शक्यता धूसरच आहे. त्यामुळेच की काय, या छोटे गुलाम मियाँने कठुआ बलात्कार प्रकरणी देशाच्या पोलीस यंत्रणेवर संशय घेतला होता. संविधानाच्या चौकटीनुसार काम करणार्‍या पोलिस यंत्रणेवर छोटे गुलाम मियाँचे संशय व्यक्त करणे हे योग्य नव्हतेच. पुढे समर्थ आणि सबल देशासाठी काश्मीरमधून कलम ३७० हटवले गेले. सगळ्या देशात आनंदीआनंद झाला. मात्र देशाच्या शत्रूराष्ट्राची लाही लाही झाली. त्याचवेळी काश्मीरमध्ये जनजीवन सुरळीत व्हावे, चिथावणीखोर विधान कुणीही करू नये म्हणून प्रशासनाने उपाययोजना केल्या. त्यात छोटे गुलाम मियाँ म्हणजे गुलाम मीर यांना स्थानबद्ध करण्यात आले. कारण कलम ३७० रद्द करण्याच्या सरकारच्या निर्णयाचे स्वागत सर्वत्र झाले. मात्र, यावर छोटे गुलाम मियाँ म्हणाले की, “जोपर्यंत काँग्रेस आहे, तोपर्यंत आम्ही कलम ३७० आणि ३५ अ कलमाचं रक्षण करू.” छोटे गुलाम मियाँच्या विधानाला काय म्हणावे? विशेष म्हणजे कलम ३७० रद्द केले म्हणून याचवेळी लंडन, सेऊल वगैरे ठिकाणी काही लोक आंदोलन करतात.
 
 

भारताला शिव्याशाप देतात, तिरंग्याचाही अपमान करतात. भारतातले काँग्रेसचे गुलाम इथे भारतात जे करतात, तेच भारताचे दुश्मन परदेशात करतात. ही कोणती जोडणी किंवा गठबंधन म्हणायचे? समान विचारांचे लोक एकमेकांच्या विचारांचे समर्थकच असतात. गुलाम मीर आणि परदेशात भारताविरुद्ध आंदोलन करणार्‍यांचे नाते कोणते? हे सगळे पाहून कोणताही भारतीय नागरिक म्हणेल की, मीरसारखे लोक समाजात दुही माजवतात. त्यांच्यावर लक्ष ठेवायला हवे. पण छोटे गुलामला स्थानबद्ध केल्यावर काँग्रेसच्या राजकन्या प्रियांका वाड्रा दुःखी झाल्या. त्या म्हणाल्या, ‘’लोकशाही आहे का?” गुलाम मीरला काश्मीरला जळते करण्याआधीच स्थानबद्ध केले, याचा राग प्रियांकांना आहे का? तसे असेल तर काँग्रेसच्या नेत्यांचे आणि परदेशात भारताविरुद्ध ३७० कलम समर्थनार्थ आंदोलन करणार्‍या फुटीरतावाद्यांचे नाते काय? काश्मीरमधील फुटीरतावाद्यांविषयी बोटचेपी भूमिका घेणारे काँग्रेसी याबाबत काही सांगतील का की, ये रिश्ता क्या कहलाता है?

Powered By Sangraha 9.0