गणेशोत्सवात डीजेचा दणदणाट नको, गणेशोत्सव समन्वय समितीची ‘आचारसंहिता’

17 Aug 2019 21:25:53


सजावटीला येणारा खर्च पूरग्रस्तांच्या मदतीसाठी वळवा

 

 मुंबई: देशभरासह जगाचे आकर्षण असलेल्या मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सवात डीजेचा दणदणाट न करता पारंपरिक वाद्यांचा वापर करावा, सजावटीसाठी वारेमाप खर्च न करता त्यातील निधी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी द्यावा, अशी आचारसंहिताच सावर्जनिक गणेशोत्सव समन्वय समितीने तयार केली असून मंडळांनी या नियमांचे पालन करावे, असे आवाहनही आहे.

 

सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील व तळकोकणातील पूरस्थितीमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. तेथील बांधवांना पुन्हा नव्या ताकदीने उभे करण्यासाठी त्यांना मदतीचा हात देणे गरजेचे आहे. गणेशोत्सव मंडळांनी यासाठी आपला सहभाग नोंदवावा, यासाठी समन्वय समितीने आवाहन केले आहे. केंद्रीय पर्यावरण अधिनियम १९८६ नुसार ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी सरकारने शांतता क्षेत्रांच्या ठिकाणी रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपकावर बंदी घातली आहे. यामध्ये वर्षातील १५ दिवस रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक लावण्याची सवलत आहे. यातील चार दिवस गणेशोत्सवासाठी सवलत देण्यात आली आहे. यावर्षी गणेशोत्सवाच्या दुसर्‍या, पाचव्या, गौरी-गणपती विसर्जन आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी ही सवलत मिळणार असल्याचे गणेशोत्सव समितीचे अध्यक्ष नरेश दहीबावकर यांनी सांगितले.

 

 
रुग्णालय, शैक्षणिक संस्था, न्यायालय व धार्मिक स्थळांच्या ठिकाणांपासून १०० मीटर परिसरात आवाजाची मर्यादा दिवसा ५० डेसिबल, तर रात्री ४० डेसिबल ठेवावी अशी अट आहे. मात्र, या अटींबाबत मंडळाच्या कार्यकर्त्यांना माहिती नसल्यामुळे अनेक वेळा कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले जातात. हे टाळण्यासाठी मंडळाने या सर्व नियमांची माहिती ध्वनिक्षेपकाची सेवा पुरवणार्‍या कंत्राटदाराला द्यावी आणि नियम पाळण्याची जबाबदारी देण्यासाठी करार करावा, अशा सूचनाही समन्वय समितीने मंडळांना दिल्या आहेत.
Powered By Sangraha 9.0