राष्ट्रसेवेची अपूर्व पूर्वतयारी : भाग-२

    दिनांक  17-Aug-2019 19:22:14

 

 
 
राष्ट्राची परतंत्र आणि अवनत अवस्था टिळकांना शल्याप्रमाणे बोचत होती. राष्ट्राच्या अभिवृद्धीचा हा अनोखा प्रयत्न होता. अनेक आव्हानांचा सामना करताना वेगवेगळ्या स्वभावाची माणसे त्यांनी अनुभवली, आजमावली, स्वतःचे विचार आणि धोरणे प्रत्यक्षात उतरवताना अडचणीतून मार्ग काढला. शाळा, कॉलेज आणि वृत्तपत्रे अशा तिहेरी भूमिकांतून लोकजागरण करताना थेट तुरुंगापर्यंत जाण्याची मजल त्यांनी मारली. भोवतालच्या लोकांचे बरेवाईट अनुभव घेताना, आपला विवेक सदैव जागृत ठेवला. या अनुभवातून ‘विवेके क्रिया आपुली पालटावी’ या समर्थवचनाप्रमाणे त्यांनी जागृत राहून समाजात कायापालट घडवण्याचा आगळा प्रयोग आखला. राष्ट्रनिष्ठा बळकट करणारी ही एक अपूर्व पूर्वतयारी ठरली.
 
 

१८७५-७६च्या सुमारास महाराष्ट्र दुष्काळाच्या प्रचंड झळा सोसत होता. टिळकांच्या महाविद्यालयीन जीवनाचा हा काळ. आजूबाजूच्या वर्तमानपत्रांतून किंवा लोकांच्या तोंडून दुष्काळाच्या बातम्या मोठ्या प्रमाणात ऐकायला मिळत. सावकार, जमीनदार आणि सरकार यांच्याबद्दल लोकांच्या मनात चीड निर्माण होऊन दंगे, चोर्‍या-मार्‍या, दरोडे यांनी महाराष्ट्रात धुमाकूळ घातला होता. हजार दोन-हजार माणसे केवळ दंग्यांमुळेच पकडली गेली. भोवतालची परिस्थिती टिळकांना अस्वस्थ करत होती. या काळात सार्वजनिक सभेने न्यायमूर्ती रानड्यांच्या नेतृत्वात शेतकर्‍यासाठी जी चळवळ केली, तिचा टिळकांच्या मनावर फार परिणाम झालेला दिसतो. पुढे दहा-बारा वर्षांनी सार्वजनिक सभा काबीज केल्यानंतर तेव्हाच्या दुष्काळ निवारणाबद्दल आणि शेतसार्‍याबद्दल टिळकांनी ज्या विचाराने आणि ताकदीने आंदोलन घडवून आणले, त्याचे बीजारोपण याच काळात झाले असावेदुष्काळाच्या दंग्यांमुळे लोक आक्रमक झाले खरे; पण त्यांच्या आक्रोशाला संघटीत स्वरूप नव्हते. लोकशक्ती निष्फळ ठरण्याचे कारण म्हणजे नियोजन आणि नेतृत्वाचा अभाव. अशा वेळी ‘सुशिक्षित लोकांनी समाजाच्या उपयोगी पडले पाहिजे’ या भूमिकेतून लोकांना शिक्षित करण्याचा उद्योग टिळकांना सुरू करावासा वाटला. शाळा सुरू करण्यापूर्वी न्यायमूर्ती रानड्यांचा सल्लाही टिळक-आगरकरांनी घेतल्याच्या नोंदी आहेत. पुढच्या काळात रानडे-टिळक विचारसंघर्षाच्या कथा आपल्यापैकी अनेकांनी ऐकल्या असल्या तरी रानड्यांच्या विद्वत्तेबद्दल टिळक-आगरकरांच्या मनात असलेला आदर कधीही ढळलेला नव्हता. त्यांच्याविषयी न्यायमूर्ती म्हणत “....हे तरुण स्वार्थत्याग स्वीकारून देशसेवेला वाहून घेण्यास प्रवृत्त झाले आहेत. या तरुणांचा हिरमोड करण्याऐवजी त्यांना करवेल ती मदत केली पाहिजे. आजवर वकील, डॉक्टर, पेन्शनर, सुखवस्तू नागरिक, व्यापारी वगैरे लोक आपल्या फुरसतीच्या वेळी देशकार्याकडे लक्ष देत आले. ऐशारामाचा स्वार्थ सोडून सारे जीवन देशसेवेत वेचण्याच्या महत्त्वाकांक्षेचे हे तरुण आहेत. त्यांची महत्त्वाकांक्षा सिद्धीस गेली, तर एक नवा संप्रदाय निर्माण होऊन तो इतरांना देशसेवेचा मार्ग दाखवील,” रानड्यांचे हे मत न. र. फाटक यांनी शब्दांकित केले आहे.

 
 

१ जानेवारी, १९८० रोजी पुण्यात मोरोबादादांच्या वाड्यात शाळेचे मंगलाचरण होऊन दोन तारखेपासून शाळा नियमित सुरू झाली, इथवर तुम्हा-आम्हाला कल्पना आहे. नवे लोक जोडून हे कार्य पुढे चालवणे त्या काळात अतिशय कठीण काम होते. अनेकांनी याबद्दल निराशेचाच सूर प्रकट केला होता. आगरकर परीक्षेसाठी मागे थांबले होते. टिळक, चिपळूणकर तर ठराविक पगारही घेत नसत, असे काही चरित्रकार म्हणतात. टिळक स्वतः लिहितात, “....शाळा उघडण्याचे वेळी विष्णुशास्त्री आणि मी आम्ही दोघेच होतो. मी पुष्कळांना आम्हास मिळण्याबद्दल सांगितले, पण कोणीच कबूल होईना. तेव्हा हे काम आम्हाला कसेबसे रेटावे लागले. दुसर्‍या टर्मच्या सुरुवातीला आमच्या कार्याला अधिक माणसे मिळतील याबद्दल मी तर बहुतेक निराश झालो होतो.” पुढल्या वर्षी आगरकर आणि आपटे शाळेत रुजू झाले, तेव्हा टिळकांना जरा दिलासा मिळाला. पण, अवघ्या वर्षभरात म्हणजेच १८८१ सालाच्या आरंभी लगेचच ‘केसरी’ आणि ‘मराठा’ वृत्तपत्रांची सुरुवात या मंडळींनी केली. युवकांना सुशिक्षित आणि सुसंस्कृत करण्याचे ध्येय शाळा पार पाडत होतीच. शिकलेल्यांसह अशिक्षितांमध्येसुद्धा प्रेरणा जागृत करण्यासाठी टिळक-आगरकरांनी वृत्तपत्रे हाताशी धरली. यात चिपळूणकरांचा पुढाकार होताच. स्वत:चा छापखाना असावा यासाठी त्यांनी धडपड केली.“मी या खांद्यावरून ‘आर्यभूषण प्रेस’च्या टाईपांच्या पेट्या वाहून नेल्या आहेत,” असे टिळक अभिमामाने सांगत. सुरुवातीच्या काळात आगरकर ‘केसरी’चे आणि टिळक ‘मराठा’चे संपादकीय काम सांभाळत.

 
 
 
 
‘केसरी’च्या सातव्याच अंकामध्ये ‘बहिष्कार’ या विषयावर एक लेख आहे. या लेखात ‘भांडून घेतल्याखेरीज आता काही मिळणार नाही, पूर्वीच्या राजनीतीतही आता फेरफार झाला पाहिजे, राजकीय शिक्षण लोकमतावर अवलंबून असते,’ अशी वाक्ये हा लेख टिळकांचा आहे याचीच साक्ष देतात. मराठी लोकांना जाग आणण्यासाठी ‘केसरी’ गर्जना करत होता आणि राष्ट्रीय भावनेच्या उद्गारांना इंग्रतीत तोंड फुटले, तर परप्रांतीय लोकांपर्यंत पोहोचता येईल. परिणामी, राज्यकर्त्यांपर्यंत आपला आवाज जाईल, या भूमिकेतून ‘मराठा’ कार्यरत होता. १८८२ सालच्या रिपोर्टमध्ये 'Unfriendly to the government' असा शेरा ‘केसरी’बद्दल दिलेला आहे. पत्रकारितेत स्वतःला झोकून दिल्यानंतरचे टिळक कसे होते, हे सांगताना व्हेलेन्टाईन चिरोल म्हणतो, "he had been amongst the first to revive the incendiary methods.'' प्रक्षोभक पद्धतीचे पुनरुज्जीवन करणारे टिळक हे पहिलेच गृहस्थ! सुरुवातीच्या काळात अतिशय कष्टाने टिळकांनी ‘केसरी’ घराघरात जाण्यासाठी परिश्रम घेतले. मुंबईत किर्लोस्कर कंपनीचे नाटक सुरू होण्याआधी ‘केसरी’बद्दलची पत्रके टिळकांनी स्वतः वाटली, असेही उल्लेख सापडतात. ‘केसरी’चा खप तीन हजार प्रतींवर जाईपर्यंत टिळक आणि मंडळी लोकांच्या घरचे पत्ते स्वतः लिहीत आणि ‘केसरी’ रवाना करत. पत्त्याच्या पट्ट्या छापण्याचा खर्च वाचावा यासाठी ही पदरमोड! आपले महाविद्यालयीन दिवस संपल्यानंतर थेट महाविद्यालयाचीच स्थापना करावी आणि या ज्ञानयज्ञाचा आरंभ करावा, अशीच टिळकांची इच्छा होती, पण सहकार्‍यांच्या सल्ल्याने त्यांनी शाळा आणि वर्तमानपत्रे यासाठी कष्ट घेतले. या दोघांची व्यवस्थित घडी बसवल्यावर या कल्पनेला मूर्त रूप आणण्यासाठी ‘डेक्कन एज्युकेशन सोसायटी’ स्थापन केली, ज्यात रानडे, भांडारकर यांसारख्या अनेक विद्वान मंडळींचा व्यवस्थापनात समावेश होता. त्यानंतर अवघ्या दोन महिन्यात महाविद्यालयाच्या परवानगीसाठी अर्ज केला आणि १८८५च्या जानेवारीत महाविद्यालयाचे प्रत्यक्ष काम सुरूही झाले.
 
 
  

या सगळ्या घटनाक्रमाकडे पाहताना एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, ती म्हणजे तत्कालीन परिस्थितीत मनात ठरवलेल्या राष्ट्रहिताच्या योजना प्रत्यक्षात आणून कार्य करणे अतिशय अवघड होते. चिपळूणकर हे स्वतःच्या सरकारी नोकरीवर पाणी सोडून या क्षेत्रात उतरलेले. टिळक पहिल्या दर्जाचे उत्तीर्ण विद्यार्थी, सोबत एलएलबी झालेले कायद्याचे पदवीधर, शिवाय संस्कृत पंडित. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असताना उच्च शिक्षण घेऊनही शिक्षक होण्यासाठी धडपडणारे आगरकर हे तिघेही तत्कालीन समाजाच्या चर्चेचा विषय ठरले. एकीकडे लोकांना याबद्दल कुतूहल वाटले, तर दुसरीकडे आगरकरांचे मामा या उद्योगाबद्दल म्हणत होते, “...हे मनी मांडे खाण्यासारखेच शुष्क आहे. ज्याचेजवळ अडका नाही, दातही धडका नाही, त्याने बाजारात जाऊन करायचे काय? याचा विचार या तरुण मंडळींच्या मनात येत नाही.” ‘कहां राजा भोज, कहां गंगातेली!’ असं म्हणून घरच्यांनीसुद्धा त्यांचा हिरमोड करण्याचे प्रयत्न केले. हा निर्णय जोखमीचा होता, पण तरीही कष्टाने, त्यागाने टिळक आणि त्यांच्या सहकार्‍यांनी या संस्था उभारल्या, दोन्ही वृत्तपत्रे यशस्वीपणे चालवली हे महत्त्वाचे. राष्ट्रीय शिक्षणाला वाहिलेल्या संस्थेने सरकारकडून देणग्या (ग्रॅण्ट्स) का स्वीकारल्या, असा सवाल काही लोक उपस्थित करतात. त्यांच्या या निर्णयामागील काही महत्त्वाच्या बाबी लक्षात घ्यायला हव्यात. सरकारकडून शिक्षकांच्या पगारासाठी ग्रॅण्ट्स घेताना आपल्या तत्त्वांच्या आड येतील, अशा कुठल्याही अटी टिळकांनी स्वीकारल्या नव्हत्या. पहिली दोन-तीन वर्षं त्यांनी सरकारी देणगीविना या संस्था चालवल्या. पण, फक्त ‘शुल्क’ आणि लहान-मोठ्या देणग्या यावर खर्च भागणे शक्य नाही म्हणून सरकारच्या ग्रॅण्ट्सकडे लक्ष देणे भाग पडले. ‘न्यू इंग्लिश स्कूल’ आणि ‘फर्ग्युसन कॉलेज’ ही नावे ठरवताना या मंडळींनी फार दूरचा विचार केला होता. या संस्था कोणत्या हेतूने सुरू केल्या हे वेळोवेळी टिळक आणि शाळेचे इतर शिक्षक लोकांसमोर प्रकट करत. तरीही शिक्षणसंस्था वाढण्यासाठी संस्थानिक, जहांगिरदार, मोठमोठे इनामदार यांच्या देणग्या येणे महत्त्वाचे होते, याची जाणीव त्यांना होती. या देणगीदारांवर सरकारी नियंत्रण असे. त्यामुळे ते देणग्या द्यायला बिचकत. म्हणून त्यांच्या सुलभतेसाठी महाविद्यालयीन इंग्रज गव्हर्नरचे नाव देण्यात काही गैर वाटले नसावे.

 
 

‘डेक्कन कॉलेज’ हे ‘डेक्कन सोसायटी’च्या हवाली करावे असा प्रस्ताव सरकारकडून ठेवण्यात आला, तेव्हा टिळक आणि मंडळींनी त्याला नकार दिला. इथेही त्यांनी या निर्णयापूर्वी रानड्यांचा सल्ला घेतल्याचा उल्लेख सापडतो. ‘डेक्कन कॉलेज’ चालवण्यास घेतले, तर सरकारच्या मर्जीप्रमाणे इंग्रजी प्राध्यापक आपल्याला संस्थेत सामील करून घ्यावे लागतील, या निमित्ताने सरकार आपल्या अंतर्गत बाबीत शिरकाव करू शकते, या विचारांनीच त्यांनी या प्रस्तावाला सरळ नकार दिला हेही लक्षात घ्यायला हवे. आर्थिक साहाय्य दिले तरी सरकारने शाळांच्या अंतरव्यवस्थेत फारशी ढवळाढवळ करू नये, शिक्षणाची सूत्रे संस्थाचालकांच्याच हाती राहावी, याच मताचे टिळक आणि सर्व संस्थाचालक होते. सुशिक्षित तरीही आत्ममग्न, अशिक्षित आणि अडाणी अवस्थेतील मरगळलेल्या समाजाला कार्यप्रवण करण्याचे व्रत विचारपूर्वक घेतले असले तरी आजूबाजूची परिस्थिती अनुकूल नव्हती. सळसळत्या तारुण्यातील राष्ट्रभक्तांचा हा अभिनिवेश बेफिकीर कधीच नव्हता. लोकजागरणाची ही विवेकी चळवळ होती. प्रतिकूलतेला अनुकूलतेमध्ये बदलण्यासाठीचा हा ध्येयवादी झगडा होता. चिपळूणकर, टिळक आणि आगरकर या त्रयीचे एकत्रीकरण ही महाराष्ट्रमानसाच्या सुप्त शक्ती जागृत करणारी एक विलक्षण घटना ठरली. २१ मार्च, १८८२चा ‘केसरी’ म्हणतो, “सत्याचा कैवार घेऊन शुद्ध अंत:करणाने लोकहितासाठी भांडणारांना कोणत्याही प्रकारची धास्ती बाळगण्याचे कारण आहे, असे आम्हास वाटत नाही. असे असूनही प्रसंग येऊन बेतलाच तर तो साहण्यास आम्ही कचरू अशी कोणीही शंका घेऊ नये!” आपले सत्त्व पणाला लागेल, असे प्रसंग लवकरच आपल्यावर येणार आहेत, याची टिळक-आगरकरांना चाहूल लागली असावी का?

(क्रमशः)

पार्थ बावस्कर

९१४६०१४९८९