टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी पुन्हा 'रवि शास्त्री'

    दिनांक  16-Aug-2019 18:54:54
 


नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षक पदी कोण असेल याची चर्चा होती. रवी शास्त्री यांचा कार्यकाळ संपल्यानंतर अनेकांनी प्रशिक्षक पदासाठी अर्ज केले होते. अखेर या नाट्यावरून पडदा उठला असून कपिल देव यांच्या अध्यक्षतेखाली निवडण्यात आलेल्या समितीने भारतीय संघाच्या नव्या प्रशिक्षकाची आणि मुख्य स्टाफच्या नावाची घोषणा केली आहे. भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी रवी शास्त्रींची पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे.

 

२०१७मध्ये याआधी रवी शास्त्री यांची निवड झाली होती. दरम्यान विश्व चषकामधील पराभवानंतरही रवी शास्त्री यांची निवड करण्यात आली आहे. कपिल देव यांनी सकाळी मुलाखती घेण्यास सुरुवात केली होती. या समितीमध्ये माजी क्रिकेटर अंशुमन गायकवाड आणि माजी महिला क्रिकेटर शांता रंगास्वामी यांचा समावेश आहे. प्रशिक्षक पदासाठी रवी शास्त्री, रॉबीन सिंग, ला लचंद राजपूत, माईक हेसन, टॉम मूडी यांच्यात लढत होती. मुलाखतीच्या आधीच अफगाणिस्तानचे प्रशिक्षक फिल सिमन्स यांनी या शर्यतीतून माघार घेतली होती. प्रशिक्षक पदासोबतच इतर पदांबाबतच्या नावांचीही घोषणा करण्यात आली.

 

प्रशिक्षक रवी शास्त्रींचा वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी कार्यकाळ वाढवण्यात आला होता. शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरच्या मैदानावर भारतीय संघाने नमवले होते. जुलै २०१७मध्ये शास्त्रींच्या मार्गदर्शनाखाली भारताने २१ कसोटी सामने खेळले त्यातील १३ सामन्यात विजय मिळवला. तर, टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात ३६ सामन्यांपैकी २५ सामन्यांत विजय मिळवला. पण रवी शास्त्रींच्या नेतृत्वाखाली भारताला विश्वचषक जिंकता आला नाही. तरीही ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक विजय आणि भारताच्या आयसीसी रॅकिंगमुळे रवी शास्त्रींच्या नावावर शिक्कामोतर्ब झाले.