'या' माजी क्रिकेटपटूची आत्महत्या?

    दिनांक  16-Aug-2019 14:35:49


 


नवी दिल्ली : गुरुवारी भारतीय क्रिकेट संघाचे माजी क्रिकेटपटू व्ही.बी चंद्रशेखर यांच्या निधनाच्या बातमीने क्रिकेटप्रेमींना धक्का बसला. ५७ वर्षीय चंद्रशेखर हे त्यांच्या राहत्या घरामध्ये मृत अवस्तेमध्ये आढळले. त्यांनी आत्महत्या केल्याच्या प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तविण्यात आला आहे. ते तामिळनाडू प्रीमिअर लीगमधील विबी कांची वीरम या संघाचे मालक होते.

 

कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, संघ चालवत असताना त्यांना अनेक तोट्यांमधून जावे लागत होते. तसेच ते कोचिंग सेंटरही चालवत होते. तपास अधिकारी सेन्थिल मुरुगन यांनीही पुष्टी केली की, कोणतीही सुसाइड नोट सापडली नाही. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.

 

कोण आहेत 'व्हीबी' ?

 

फटकेबाजीसाठी प्रसिध्द या सलामी फलंदाजाने भारतासाठी सात एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळले. याशिवाय ८१ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये ४९९९ धावा त्यांच्या नावावर आहेत. यात १० शतकी खेळी खेळण्यात आल्या आहेत. १९८८च्या रणजी ट्रॉफी विजेत्या तामिळनाडू संघाचे ते सदस्य होते. त्यांनी तामिळनाडू संघाचे नेतृत्वही केले. त्यानंतर गोव्याचेही त्यांनी प्रतिनिधित्व केले. यानंतर त्यांनी प्रशिक्षक आणि समालोचक अशीसुध्दा भूमिका पार पाडली. चेन्नई सुपर किंग्जचे ते पहिले तीन वर्ष व्यवस्थापक होते. एम.एस.धोनी सीएसकेकडून खेळण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका होती. २००४ ते २००६ दरम्यान ते राष्ट्रीय निवडसमीतीचे सदस्यही होते.