कारागृह नव्हे, परिवर्तनगृह !

    दिनांक  16-Aug-2019 23:14:20   

 


नाशिक मध्यवर्ती कारागृह हे एक कारागृह म्हणून ओळखले जात नसून ते एक परिवर्तन आणि सुधारगृह म्हणून ओळखले जाते. याचे सर्व श्रेय जाते येथील कारागृह प्रशासन आणि बंदी यांना.नाशिक मध्यवर्ती कारागृहाला मोठा इतिहास आहे
. महाराष्ट्र कारागृह विभागाच्या मध्य क्षेत्रात प्रशासकीयदृष्ट्या या कारागृहाचे स्थान आहे. या कारागृहाची स्थापना ब्रिटिश राजवटीत १९२७ साली झाली. याच कारागृहात बंदी असताना साने गुरुजी यांनी ‘श्यामची आई’ हे प्रसिद्ध पुस्तक लिहिले, तर आणीबाणीच्या काळात राजकीय क्षेत्रातील अनेक धुरीण या कारागृहात राजबंदी म्हणून होते. तसेच, अनेक फाशीची शिक्षा सुनावलेले, टोळीयुद्धाचे म्होरके आणि राज्यातील गंभीर गुन्ह्यातील बंदीदेखील याच कारागृहात होते आणि आजही आहेत.

कारागृह म्हणजे जिवंतपणी नरकयातना, असा आपला समज. आप्तेष्ट आणि मित्र यांचा विरह देणारे ठिकाण म्हणजे कारागृह. हा समज खरा जरी असला तरी, नाशिक येथील कारागृह मात्र यातील काही बाबतीत अपवाद आहे, हे येथे गेल्यावर जाणवते. कारागृहात असणारी नकारात्मकता येथे तशी तुलनेने कमी जाणवते. अत्यंत रुक्ष आणि कायम संवेदनाहीन कर्मचारीवर्ग येथे पाहावयास नक्कीच मिळत नाही. या सर्वांचा परिपाक म्हणूनच हे कारागृह न राहता एक ‘परिवर्तनगृह’ म्हणून ओळखले जात आहे. येथे दाखल होणारा बंदी हा कोणत्या कलमाअंतर्गत दाखल आहे, हे पाहण्यास प्राधान्य न देता तो माणूस म्हणून कसा आहे, हे पाहण्यात आणि त्यानुसार त्याला काम देण्यात येथील कर्मचारी आणि अधिकारी प्राधान्य देतात, हे विशेष. त्यांच्या याच मनोवृत्तीमुळे बंदीवानांना खाकी वर्दीत आपला माणूस दिसून येतो.

या कारागृहाचे संपूर्ण परिक्षेत्र ७८.४७ हेक्टर असून कारागृह वास्तूचे क्षेत्रफळ १६.७२ हेक्टर आहे. तसेच शेतीचे परिक्षेत्र ४४.२७ हेक्टर आहे. कारागृहाचे बांधकाम दगडी असून छतावर मंगलौरी कौले बसविलेली आहेत. कारागृहात एकूण ५४ बरॅक व ३८६ विभक्त कोठड्या आहेत. येथे स्त्री-पुरुष मिळून एकूण ३४३१ बंदी आहेत.

या कारागृहाचे वैशिष्ट्य म्हणजे, या कारागृहात बंदी व्यस्त राहावेत, यासाठी उपाहारगृह, चर्मकला, शिवणकाम, कृषी, लोहारकाम, मूर्तीकला, बेकरी यांसारखे विविध विभाग असून या विभागांच्या माध्यमातून बंदींना प्रशिक्षण दिले जाते व त्यांच्याकडून विविध प्रकारचे कार्य करवून घेतले जाते. या कारागृहात विणण्यात येणार्‍या पैठणी साडी खरेदीसाठी प्रतीक्षा करावी लागते, तर येथील गणेशमूर्तींना अवघ्या भारतातून मागणी आहे. यंदाच्या गणेशोत्सवासाठी येथील बंद्यांनी ११ फूट उंच संपूर्ण कागदाची पर्यावरणस्नेही गणेशमूर्ती घडविली आहे. तर, बेकरीमधील उत्पादनासदेखील सर्वत्र मागणी असते. येथील सुतार विभागातील खुर्चीची भुरळ तर चक्क नाशिकच्या जिल्हाधिकार्यांनादेखील पडली आणि त्यांनी ती खरेदीदेखील केली.

कारागृहाच्या शेतीतून ३०० ते ३५० किलो भाजीपाला येथील बंदी उत्पादित करतात. संपूर्ण सेंद्रिय खतांचा वापर करून लागवड करण्यात आलेल्या याच भाजीपाल्याच्या माध्यमातून बंदीवानांचे जेवण बनविले जाते. सामान्य व्यक्तीदेखील इतके पौष्टिक अन्न सेवन करत नसेल इतके पौष्टिक अन्न त्यामुळे येथील कैद्यांना उपलब्ध होत आहे, हे विशेष. गेल्यावर्षी या शेतीतून ४५ लाख रुपयांचे उत्पादन घेण्यात आले होते. प्रतिमाह ३५०० रुपये खर्च करण्याची बंदींना मुभा असून ते त्यांना सरळ हातात न देता कारागृह प्रशासनाच्या माध्यमातून खर्च करण्याची मुभा देण्यात आली आहे. विविध ग्रंथांचे वाचन व्हावे यासाठी सुसज्ज वाचनालय येथे असून शिक्षण घेऊ इच्छिणार्‍या बंदीवानांसाठी मुक्त विद्यापीठांचे शिक्षण उपलब्ध करून देण्यात आले आहे. या माध्यमातून नुकतेच ९६ बंदी पदवीधर झाले आहेत.

विविध सामाजिक संस्थांच्या मदतीने बंदीवानांच्या पुनर्वसनासाठी त्यांना रोजगार प्रशिक्षण दिले जाते. संगणक प्रशिक्षण, वायरमन कोर्स, शिवणकाम प्रशिक्षण, दुचाकी दुरुस्ती प्रशिक्षण इत्यादी व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाते. व्यवसायाबाबत विविध संस्थेमार्फत मार्गदर्शन व प्रात्यक्षिक शिबिरांचे कारागृहात आयोजन केले जाते. कैद्यांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी तक्रार पेटीदेखील येथे आहे. नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहामध्ये बंदी पंचायतीची स्थापना करण्यात आलेली असून अधीक्षक, उपअधीक्षक, वरिष्ठ तुरुंगाधिकारी यांच्यामार्फत महिन्यात दोन सभा घेण्यात येतात. त्यामुळे कैद्यांमध्ये असलेली लहानसहान बाब व त्यांच्या तक्रारी, विनंती ऐकून घेऊन त्याच ठिकाणी त्याचे निराकरण केले जाते. या कारागृहात खुले कारागृह असून तेथे दिवसभर कामासाठी कैद्यांना खुले सोडले जाते व नंतर बंद केले जाते.

बंदीवानांमध्ये देशप्रेमाची भावना टिकून राहावी, याकरिता स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, मुंबई यांच्यामार्फत सावरकरांच्या जीवनावर आधारित ’मृत्युंजय’ नाटक सादर करण्यात आले. कारागृहातील कैद्यांनी केरळ पूरग्रस्तांसाठी स्वेच्छेने जमा केलेल्या १ लाख,७८ हजार,७४२ रुपये एवढ्या रकमेचा धनादेश गेल्या वर्षी जिल्हाधिकारी, नाशिक यांना कैद्यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला. कैद्यांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. या कारागृहाचे स्वतःचे रेडिओ स्टेशन असून बंदी रेडिओ जॉकीच्या माध्यमातून तेथे गाणे ऐकविली जातात. कैद्यांना सातत्याने व्यस्त ठेवत त्यांना त्यांचा भूतकाळ विसरण्यास आणि आगामी आयुष्य सन्मानाने व्यतीत करण्याकरिता विविध उपक्रम राबविले जातात. त्यामुळे खर्‍या अर्थाने हे कारागृह नसून परिवर्तनगृह आहे, असेच वाटते.