कानडा वो रंग

    दिनांक  16-Aug-2019 19:34:19


 


कलाकारांच्या पंढरीमध्ये... जहांगीर कलादालन, मुंबई येथे कर्नाटकातील चार प्रथितयश कलाकारांच्या कलाकृतींचे प्रदर्शन सुरू आहे. हे चारही कलाकार कर्नाटकातील चार वेगवेगळ्या कलासंस्कृतींची स्वतंत्रपणे ओळख असलेल्या ठिकाणांहून एकत्र आलेले आहेत. कदाचित त्यांनी प्रदर्शित केलेल्या कलाकृतींबद्दलचे हेच वैशिष्ट्य असावे. या चारही कलाकारांच्या कलाकृती निर्माणाची शैली आणि तंत्र जरी भिन्न भिन्न असले, तरी या चारही कलाकृती प्रकारांची नाळही निसर्गाशीच जुळलेली दिसते. निसर्गातील वैविध्यपूर्ण आकारांचे 'क्रिएटिव्ह एक्सप्रेशन' म्हणजे या कलाकारांच्या कलाकृती आहेत.

 

अभिलाष डी. मंड्या हे म्हैसूर येथील श्री कलानिकेतन स्कूल ऑफ आर्ट्सचे विद्यार्थी होते. गुलबर्गा विद्यापीठाचे इतअ आणि चतअ केलेले चित्रकार मंड्या कर्नाटक ललित कला अकादमीचे सदस्य आहेत. त्यांची 'ब्लॅक अ‍ॅण्ड ब्लू' ही कलाकृती पाहिल्यावरच ध्यानात येईल की, ब्रशचे फटकारे, त्यातील गतिमानता, रंगलेपनातील आत्मविश्वास आणि एकूण आकारांतील प्रतिमांकनाचे ले-आऊट हे त्यांच्या रंगयोजनेतील आत्मभाव जागवणारी पद्धती ध्यानात आणून देते. अविनाश सदानंद हे दुसरे एक ज्येष्ठ चित्रकार. त्यांच्या कलाकृतींमध्ये तांत्रिक आकारांचा समावेश आहे. पारंपरिक रंग आणि आकार यांचं विषयानुरूप संकल्पन करून त्यांची प्रत्येक कलाकृती आकारबद्ध झालेली आहे. एका विस्तीर्ण पार्श्वभूमीवर तांत्रिक आकारांना निश्चित करून विशुद्ध रंगांच्या रेंडरिंग करण्यातून एक अफलातून परिणाम साधायची किमया सदानंद यांनी साधलेली आहे. 

 

प्रा. बाबुजत्ताकर हे आणखी एक ज्येष्ठ-श्रेष्ठ चित्रकार. बंगळुरु विद्यापीठाच्या फाईन आर्ट्सचे ते फॅकल्टी असून उपयोजित कला या विभागात ते २४ वर्षांहून अधिक काळ कलाध्यापन करीत आहेत. त्यांच्या कलाकृती देखील वेगळेपण घेऊन आलेल्या आहेत. 'पेन-इंक' आणि 'कॅनव्हास' हे त्यांची हुकूमत असलेले माध्यम. अत्यंत सरावाने, सातत्य राखून निसर्गातील एखादा इंटरेस्टिंग आकार, हा त्यांच्या पेंटिंगचा चित्रविषय. त्याच्या 'पेन-इंक' माध्यमातील प्रत्येक कलाकृती ही अनेक तास सातत्याने केलेल्या कामांनंतरचे लाभलेले फलित होय. चित्रकार रमेश चव्हाण हे या चौघांमधील आणखी एक चित्रकार होय. त्यांनी चितारलेल्या कलाकृती या अमूर्त शैलीतील असून लाल, नारिंगी, तपकिरी, निळा अशा थेट मूळ विशुद्ध रंगांचा प्रभावीपणे आणि रंगसंयोजनाचा आकर्षक रितीने विनियोग केलेला दिसतो. या चारही कलाकारांच्या रूपाने कर्नाटकातील गुलबर्गा, बंगळुरू, विजापूर आणि मंड्या या चार विभागांच्या कलासंस्कृतींचा अभ्यास कलाप्रेमींकडून आपोआपच होतो. हेच या प्रदर्शनाचे फलित असावे.

- प्रा. गजानन शेपाळ