ज्येष्ठ अभिनेत्री विद्या सिन्हा यांचे निधन

15 Aug 2019 14:41:56

 

मुंबई : हिंदी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री विद्या सिन्हा यांचे मुंबईतील क्रिटीकेअर रुग्णालयात निधन झाले. वयाच्या ७२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्या हृदयविकार आणि फुफ्फुसाच्या आजाराने त्रस्त होत्या. जुहू येथील क्रिटीकेअर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. श्वसनाचा त्रास होत असल्याने त्यांना व्हेंटिलेटर वर ठेवण्यात आले होते. पण आज उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
 
 

स्टार प्लसवरील लोकप्रिय मालिका 'कुल्फी कुमार बाजेवाला' यात त्या महत्वाची भूमिका करत होत्या. परंतु काही दिवसांपूर्वी प्रकृती अस्वस्थामुळे त्यांनी मालिकेतून विश्रांती घेतली. सत्तर च्या दशकात त्यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर वेगळा ठसा उमटविला होता. छोटीसी बात, रजनीगंधा, पती पत्नी और वो हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट. नंतरची बरीच वर्षे त्या हिंदी चित्रपटसृष्टीपासून दूर होत्या. २०११ मधील सलमान खानच्या बॉडीगार्ड या चित्रपटातून त्यांनी कमबॅक केले. त्यानंतर छोट्या पडद्यावरील अनेक हिंदी मालिकांमधून काम करायला सुरुवात केली. आपल्या कारकिर्दीत प्रेक्षकांच्या मनावर अभिनयाची छाप पडणाऱ्या या अभिनेत्रीच्या जाण्याने हिंदी चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली.

Powered By Sangraha 9.0