महाराष्ट्र सरकार पूरग्रस्तांच्या पाठीशी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

15 Aug 2019 13:17:46


 

मुंबई : देशभरात आज स्वातंत्र्य दिनाचा उत्साह आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मंत्रालयात ध्वजारोहण केले. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्रवासीयांना संबोधित केले. यादरम्यान त्यांनी महाराष्ट्रातील पूरपरिस्थितीविषयी चिंता व्यक्त केली. आजचा स्वातंत्र्य दिन अनोखा असा आहे. लडाख, काश्मीरमध्ये आज शांततेत तिरंगा फडकावला गेला. आज राज्यात पूरपरिस्थिती आहे. सरकारने आणि इतर सर्व यंत्रणांनी प्रचंड परिश्रम करुन पूरग्रस्तांना सुरक्षित स्थळी नेले. आता आपल्यासमोर आव्हान आहे, ज्याचे संसार उद्ध्वस्त झाले, त्यांना उभे करण्याचे काम सरकारला करावे लागेल,'' असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
 
 

केंद्राकडे सहा हजार आठशे कोटींच्या निधीची मागणी केली असून विक्रमी वेळेत प्रत्येक पूरग्रस्तांचे पुनर्वसन केले जाईल, याची ग्वाही दिली. अनेक जण पूरग्रस्तांच्या पाठीशी उभे राहिले, त्यांची मदत केली, त्याबद्दल त्यांचेही आभार मानले. गेल्या दहा पंधरा दिवसांत राज्य सरकार, विविध संघटना, संस्था, विशेषतः भारतीय लष्कर, नौदल, हवाई दल, तटरक्षक दल, एनडीआरएफ आदींनी प्रचंड मेहनत करून, अहोरात्र परिश्रम करून पुरात अडकलेल्यांना बाहेर काढून सुरक्षित स्थळी नेण्याचे काम अव्याहतपणे केले. जवळपास पाच लाखाहून अधिक नागरिकांना वाचवण्याचे काम यशस्वी करू शकलो याचा आनंद आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

 
यावेळी मुख्य प्रधान सचिव, माजी प्रधान सचिव, विविध विभागाचे सचिव, इतर सनदी अधिकारी, आजी-माजी आमदार आणि पोलीस दलाचे प्रमुख उपस्थित होते. या कार्यक्रमाला मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती उपस्थित राहिले. दरम्यान, मानवंदना देण्यासाठी खास गुजरात पोलिसांचीही तुकडी आली. यासोबतच बृहन्मुंबई पोलिसांची तुकडी आणि एसआरपी अशा तीन तुकड्यांनी सलामी दिली.
 
Powered By Sangraha 9.0