घरीच उपचार घेणार्‍यांसाठी आरोग्य विम्याचे संरक्षण

    दिनांक  15-Aug-2019 20:12:20   कित्येक रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांनाही घरीच उपचार घेत असलो तरी आरोग्य विम्याचे संरक्षण उपलब्ध असते, याची फार कमी माहिती असते. त्या अनुषंगाने अशा रुग्णांसाठीही विम्याचे कवच उपलब्ध असून आजच्या लेखातून यासंदर्भात अधिक माहिती जाणून घेऊया...

 

बर्‍याच रुग्णांकडून आणि त्यांच्या नातेवाईकांकडून काही आजारांवर हॉस्पिटलमध्ये न राहाताही घरी राहूनच उपचार केले जातात. बहुतेक आजारी व्यक्ती हा खर्च स्वत:च्या खिशातून करतात, पण या खर्चाचा विमा उतरविणार्‍या पॉलिसीज कित्येक विमा कंपन्यांकडे आहेत. हा विमा दोन प्रकारे उतरविता येतो. एक म्हणजे तुमच्या आरोग्य विमा (मेडिक्लेम) पॉलिसीत हे संरक्षण अंतर्भूत करता येते किंवा यासाठी स्वतंत्र 'प्रीमियम' भरता येतो. आरोग्य विमा पॉलिसीज या प्रामुख्याने हॉस्पिटलच्या खर्चाचे, तसेच डे केअर उपचार पद्धती संमत करतात. हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यापूर्वी घेतलेली औषधे, डॉक्टरांचे शुल्क, केल्या गेलेल्या चाचण्या यांचा हॉस्पिटलमध्ये भरती होण्यापूर्वी साधारणपणे ३० दिवसांच्या खर्चाचा दावा संमत केला जातो, तर हॉस्पिटलमधून बाहेर पडल्यानंतरच्या औषधोपचाराचा ६० दिवसांपर्यंतचा खर्चाचा दावा संमत केला जातो.

 

याशिवाय तुम्ही स्वतंत्र/वेगळी बाह्य रुग्ण उपचारांची पॉलिसी घेऊ शकता. या पॉलिसींचा प्रीमियम मात्र जास्त असतो. समजा, ३० वर्षांच्या माणसाने ५ लाखांचा बाह्यरुग्ण उपचारपद्धतीचा विशेष 'क्लॉज' टाकून विमा उतरविला, तर त्याला वर्षाला जीएसटीसह १४ हजार, २२४ रुपये प्रीमियम भरावा लागेल व बाह्यरुग्ण उपचारांसाठी पाच हजार रुपयांपर्यंतचे दावे संमत होतील. एखाद्याने बाह्य रुग्ण उपचारांचा विशेष क्लॉज न टाकता पॉलिसी घेतली, तर त्याला फक्त ५ हजार, ७९५ रुपये प्रीमियम भरावा लागेल. बाह्यरुग्ण उपचारासाठीचा विशेष क्लॉज टाकल्यास ७ ते ८ हजार रुपये प्रीमियम अधिक भरावा लागतो.

 

बाह्यरुग्ण उपचारांसाठीच फक्त काही पॉलिसी उपलब्ध आहेत. यात तुम्ही 'कॅशलेस' पर्याय निवडलात, तर विमा कंपनीने ठरवून दिलेल्या हॉस्पिटलच्या ओपीडी (आऊट पेंशट डिपार्टमेंट) मध्येच उपचार घ्यावे लागतात. 'कॅशलेस' पर्यायाला प्रीमियम कमी आकारला जातो आणि हा पर्याय निवडला तर तुम्ही कुठल्याही हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊ शकता. पण, मग यासाठी तुम्हाला जास्त प्रीमियम भरावा लागतो. ओपीडी पॉलिसीजच्या बाबतीत विमा कंपन्याच्या व्यवस्थापनात बर्‍याच त्रुटी आहेत. मात्र, गेल्या ऑगस्टपासून मानसिक आजार हा शारीरिक आजारासारखाच मानावा, असा नियम करण्यात आला आहे.

 

त्यामुळे ओपीडी पॉलिसीत मानसिक आजाराच्या खर्चाचेही दावे संमत होऊ शकतात. औषधे अतिप्रमाणात घेणार्‍यांचे व स्वत:ला शारीरिक इजा करून घेणार्‍यांचे या उपचारांसाठी केलेले खर्चाचे दावे संमत केले जात नाहीत. फार थोड्या कंपन्यांनी ओपीडी पॉलिसी ग्राहकांसाठी उपलब्ध करुन दिल्या आहेत व ज्यांनी सुरु केल्या आहेत, त्यांनी त्यात बर्‍याच अटी व नियमांचा समावेश केला आहे. 'रेलिगेअर हेल्थ इन्शुरन्स'ची 'एनसीबी सुपर प्रीमियम' नावाची पॉलिसी आहे. हिचा वार्षिक प्रीमियम ८ हजार, ६७५ रुपये इतका असून या पॉलिसीमध्ये ओपीडीचे संरक्षण पाच हजार रुपयांपर्यंत आहे. यात ओपीडीचा क्लॉज विशेषकरुन समाविष्ट करण्यात आला असून यासाठी तीन हजार, १०३ रुपये इतका वेगळा प्रीमियम आहे. यामध्ये विमा कंपनीतर्फे हॉस्पिटल ठरविण्यात आलेली नाहीत.

 

'मॅक्स बुपा हेल्थ इन्शुरन्स' कंपनीचा यासाठी 'गो अ‍ॅक्टिव' हा प्लान आहे. या पॉलिसीचा वार्षिक प्रीमियम ११ हजार, ७४७ रुपये आहे. यात कॅशलेस पर्याय उपलब्ध आहे. महानगरांत व गुजरात राज्यात 'ओपीडी कन्सल्टेशन'साठी ६०० रुपये विमाधारकाला दिले जातात, तर अन्य ठिकाणी ५०० रुपये दिले जातात.ही नेहमीची आारोग्य विमा पॉलिसी असून 'ओपीडी क्लॉज' यात अंतर्भूत आहे. विमा कंपनीने ठरवून दिलेली हॉस्पिटल्स यात समाविष्ट आहेत.'अपोलो म्युनिक हेल्थ इन्शुरन्स' कंपनीचा 'हेल्थ वॉलेट' हा प्लॅन असून याचा वार्षिक प्रीमियम २२ हजार, ९०८ रुपये आहे. यात डोळ्यांचे आजार, दातांचे आजार यांच्या ओपीडी खर्चाने दावे संमत होतात. या पॉलिसीतही ओपीडी नेहमीच्या पॉलिसीत समाविष्ट आहे. या पॉलिसीसाठी हॉस्पिटल ठरलेली आहेत.

 

'मणिपाल सिग्ना हेल्थ इन्शुरन्स'चा 'प्रो हेल्थ-प्लस' हा प्लान आहे. याचा वार्षिक प्रीमियम १० हजार, ११९ रुपये आहे. ओपीडीचे दावे २ हजार रुपयांपर्यंत संमत होऊ शकतात. यात नेहमीच्या आरोग्य विमा पॉलिसीत ओपीडी संरक्षण अंतर्भूत आहे. यात उपचारासाठी हॉस्पिटल्स निश्चित केलेली आहेत. 'स्टार हेल्थ इन्शुरन्स'ची 'स्टार कॉम्प्रिहेन्सिव्ह' ही पॉलिसी आहे. हिचा वार्षिक प्रीमियम ११ हजार, ४७६ रुपये आहे. यात जास्तीत जास्त सात कन्सल्टन्सींसाठी प्रत्येक वेळेस रु. ३००/- संमत होऊ शकतात. यात नेहमीच्या पॉलिसीत ओपीडी अंतर्भूत आहेत. यासाठी हॉस्पिटल निश्चित करण्यात आली आहे.

 

रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार व अन्य काही आजारांना आयुष्यभर औषधे घ्यावी लागतात. अशा रुग्णांना यासाठी कायमचा खर्च करावा लागतो. अशांसाठी नेहमीच्या आरोग्य विमा पॉलिसीत काही कंपन्या डोेमिसिलरी खर्च हा क्लॉज समाविष्ट करतात. हा क्लॉज समाविष्ट केल्यावर प्रीमियम जबरदस्त भरावा लागतो. पण, सतत जी औषधे घ्यावी लागतात, त्यांच्या खर्चाचा दावा संमत होऊ शकतो. कधी कधी औषधांवर होणार्‍या वार्षिक खर्चापेक्षा 'प्रीमियम' जास्त रकमेचा भरावा लागतो, त्यामुळे हा क्लॉज समाविष्ट करणार्‍यांचे प्रमाण फारच कमी आहे. जर जेनेरिक औषधे घेतली तर ती फारच कमी किमतीत उपलब्ध आहेत. यामुळे ओपीडी किंवा डोमिसिलरी पॉलिसी घ्यावी की नाही, याबाबत प्रत्येकाने स्वतंत्र विचार करून योग्य निर्णय घ्यावा. पण नेहमीचा सर्वसाधारण आरोग्य विमा मात्र उतरवावाच!