'कन्फेशन' ते 'कबुली'

    दिनांक  15-Aug-2019 20:40:02   जगात सर्वाधिक अनुयायी असलेल्या ख्रिश्चन धर्माने किंवा ख्रिस्तमतावलंबीयांनी स्वतःची प्रतिमा नेहमीच दीनदुबळ्यांना आधार देणारा, अशी निर्माण केली. पाश्चात्त्य देश, अमेरिका, युरोपसह आफ्रिका खंडातही ख्रिस्ती पंथ याच प्रतिमेचे महिमामंडन करत पसरला व अजूनही पसरताना दिसतो.

 

भारतातही ख्रिश्चन मिशनर्यांसह विविध स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून ते आपला प्रचार व प्रसार करतच असतात. कधी आजार्‍यांची सेवा करण्याच्या रूपात, कधी गरिबांना दारिद्य्रमुक्त करण्याच्या रूपात, कधी शिक्षणाच्या तर कधी पापक्षमेच्या साह्याने त्या धर्माचे अनुयायी हे काम करतात. परंतु, गेल्या काही काळात उघडकीस आलेल्या घटना व प्रसंगांतून ख्रिश्चन धर्माचा किंवा त्याच्या अनुयायांचा दुसरा चेहराही समोर आला.

 

भारताचा विचार केला तर झारखंड, उत्तर प्रदेश, केरळ वगैरेतील जमीन घोटाळ्यात, लैंगिक शोषण प्रकरणात आणि इतरही अवैध धंद्यांत ख्रिश्चन धर्ममार्तंड किंवा पाद्री, फादर वगैरे मंडळी अडकल्याचे समोर आले. तसेच या अत्याचाराला विरोध करणार्‍यांनाच दडपण्याचे, दाबून टाकण्याचे प्रकारही या लोकांकडून झाल्याचे केरळच्या एका ननवरील अत्याचारानंतर देशाने पाहिले. म्हणजे एका बाजूला धर्माचे सोज्वळ, सेवामय स्वरूप तर दुसर्‍या बाजूला असे घृणास्पद स्वरूप. परंतु, अशा घटना भारतातच घडतात का, घडल्या का, तर नाही, जगभर असे उद्योग सुरूच असतात. गेल्या शेकडो वर्षांपासूनच नव्हे तर आधुनिक काळातही चर्चच्या वा मिशनरी संस्थेच्या आडून असे प्रकार झाले.

 

काही काळापूर्वी पोप फ्रान्सिस यांनीही या सर्वांची कबुली दिली होती. बाल व स्त्रियांवरील लैंगिक अत्याचार चर्च व चर्चमधील लोकांकडून झाल्याचे ते म्हणाले होते. तसेच यासंबंधीच्या अनेक तक्रारीही जगभरात भिन्न भिन्न ठिकाणी केलेल्या आहेत. आजही तशा तक्रारी वेळोवेळी समोर येतात, परंतु, त्यावर ठोस कारवाई झाल्याचे फारशा प्रकरणात दिसलेच नाही. आताही चर्च व ख्रिश्चन संस्थांवर श्रद्धा, आस्था असलेल्यांना विचलित करणारे वृत्त उजेडात आले आहे. घटना अमेरिकेतील आहे आणि कॅथलिक चर्चशी संबंधित आहे. अमेरिकेतील ७० पेक्षा अधिक लोकांनी रोमन कॅथलिक चर्चच्या विरोधात खटला दाखल करत कारवाईची मागणी केली आहे. तक्रार करणार्‍या सर्वांनीच आपल्या याचिकेत दावा केला की, बालपणी चर्चमधील पाद्य्रांनी आमचे लैंगिक शोषण केले.

 

तसेच यासंबंधी काही वाच्यता केली तरी चर्चमधील उच्चपदस्थ अधिकारी कशाप्रकारे पाद्य्रांच्या कृत्यांवर पडदा टाकत असत, हेही त्यांनी सांगितले. म्हणजेच इथे केवळ शोषण करणाराच गुन्हेगार असल्याचे नव्हे, तर त्याला पाठीशी घालणारेही दोषी असल्याचे दिसते. सोबतच ही प्रकरणे दाबली गेल्याने गुन्हेगारांना अशाच प्रकारची आणखी कृत्ये करण्यासही प्रोत्साहन मिळत असते. हे जितके तिथे येणार्‍यांच्या दृष्टीने दुर्दैवी तितकेच धर्माच्या, देवाच्या नावावर स्वतःला त्याचा दूत म्हणवून घेणार्‍यांच्या नैतिक अधःपतनाचे, विश्वासघातकी वृत्तीचेही निदर्शक.

 

दरम्यान, अमेरिकेने बालकांच्या लैंगिक शोषणाविरोधात नवीन कायदा केला असून बुधवारपासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. अशातच कायदा लागू होण्याच्या पहिल्याच दिवशी इतक्या मोठ्या संख्येने (७० लोकांनी) याचिका दाखल केली आहे. उल्लेखनीय म्हणजे, नव्या कायद्यानुसार कित्येक दशकांपूर्वीच्या शोषणाच्या, अत्याचाराच्या घटनांआधारेही खटला चालवता येणार आहे. शिवाय नव्या कायद्यातील तरतुदीनुसार आता चर्च, शाळा आणि बिगरसरकारी संघटनांविरोधात शेकडो गुन्हे दाखल होण्याची शक्यताही व्यक्त करण्यात येत आहे.

 

दरम्यान, लॉ फर्म 'विट्ज अ‍ॅण्ड एएमपी लक्झेनबर्ग'ने असे म्हटले की, “आमच्याकडे बाललैंगिक शोषणाच्या १२०० तक्रारी असून आगामी काही दिवसांत त्यांची संख्या वाढू शकते.” परंतु, या सर्वांत चर्च व संबंधित संस्थांवर लैंगिक शोषण झाल्याचे सर्वाधिक आरोप होत आहेत. खरे म्हणजे व्यक्ती मग ती लहानगी असो वा मोठी आशेने, उमेदीने काहीतरी मागणे घेऊन, आपल्या दुःख-कष्ट निवारणासाठी किंवा श्रद्धेपोटी चर्च किंवा धर्मस्थळी येत असते. दुनियादारीत उभ्या ठाकलेल्या अडचणी, समस्यांचे निवारण या ठिकाणी होईल, असे माणसाला वाटत असते. परंतु, त्यांचा सामना अशा प्रकारच्या प्रवृत्तींशी होत असेल, तर त्याला अमानुषच म्हटले पाहिजे. यावर भावनेच्या आहारी न जाता, ख्रिश्चन धर्मानुनयांनीच काहीतरी तोडगा काढला पाहिजे. केवळ आंधळा विश्वास ठेऊन पाद्री वा इतरांना पाठीशी न घालता दोषींच्या शिक्षेसाठी प्रयत्न केले पाहिजे.