वर्षानुवर्षांच्या प्रयत्नांमुळे कलम ३७० रद्द : सरसंघचालक

    दिनांक  15-Aug-2019 11:58:06


 

नागपूर : देश स्वतंत्र होण्यासाठी ज्यांनी बलिदान दिले त्यांचे स्मरण करून परत नवा संकल्प केला पाहिजे. वर्षानुवर्षे संकल्प करत आल्यामुळेच काश्मीरमधून कलम ३७०कायदा रद्द करण्यात यश आले आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी गुरुवारी केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या महाल येथील मुख्यालयात सहकार्यवाह भय्याजी जोशी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी सरसंघचालक मोहनजी भागवत यांचीही प्रमुख उपस्थिती होती. ध्वजारोहण कार्यक्रमानंतर सरसंघचालक मोहनजी भागवत आणि सहकार्यवाह भय्याजी जोशी यांनी जम्मू-काश्मीरला असलेला विशेष राज्याचा दर्जा काढल्यानंतर प्रतिक्रिया दिली. यापूर्वीच कलम ३७० रद्द करायला हवे होते, असे म्हणत. सरकारचे काम योग्य दिशेने सुरू असल्याची पावतीही त्यांनी सरकारला दिली.

 

रेशीमबाग परिसरात आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमादरम्यान मोहनजी भागवत यांनी उपस्थितांना संबोधित केले. ते म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इच्छाशक्तीला समाजाच्या संकल्पशक्तीचे बळ मिळणे फार गरजचे आहे. सरकारच्या इच्छाशक्तीमुळेच सध्या तेथील परिस्थिती बदलण्यास मदत होत आहे. जम्मू-काश्मीरमधून कलम-३७०आणि ३५-एरद्द करण्यासाठी अनेक वर्षांपासून प्रयत्न करण्यात येत होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा यात फार मोठा वाटा राहिला आहे. केंद्र सरकारने याबाबत निर्णय घेतल्याने अनेक वर्षांच्या प्रयत्नांना यश आलेअसे म्हणत मोहनजी भागवत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयाचे स्वागत केले.आपल्या भाषणात भागवत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुतीसुमने उधळली. ते म्हणाले, “ काही लोक म्हणतात, ‘मोदी है तो मुमकिन हैहे ठीक असून यात काहीच चुकीचे नाही. देशाच्या अन्य राज्यांप्रमाणे त्या राज्यातही पूर्ण स्वातंत्र्य असणे फार गरजेचे आहे. तेथील नागरिकांनाही इतर राज्यांतील नागरिकांप्रमाणे जगण्याचा अधिकार मिळायला हवा. संविधानात ज्या पद्धतीने समानतेचा उल्लेख करण्यात आला आहे, ती समानता प्रत्यक्षात अनुभवण्यास मिळणे गरजेचे आहे, ” असे ते म्हणाले.

 

स्वातंत्र्यानंतर जगभरातून टीका

 

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जगभरातील अनेक बड्या लोकांनी याबाबत टीका केली होती. भारतात हे स्वातंत्र्य फार काळ टिकणार नाही, असे त्याकाळी म्हटले जात. मात्र त्यावेळी मनात विश्वास होता. योग्यरित्या या देशाचा कारभार तर चाललाच परंतु एकामागोमाग एक अनेक क्षेत्रांत प्रगती करत भारताने यशाचे नवे शिखर गाठले. प्रगतीसाठी देशाचे नेतृत्व करणार्यांची इच्छा फार गरजेची असते. यात नागरिकांच्या संकल्पशक्तीची साथ मिळणेही फार आवश्यक असते, ” असे ते म्हणाले.