सडा : विज्ञान आणि समाज

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Aug-2019   
Total Views |


 

 

पावसाळ्यात कोकणात गेलं की मन मोहवून टाकतात ते रंगीबेरंगी रानफुलांनी बहरलेले विस्तीर्ण सडे! जंगल, नद्या, महासागर या जशा भरघोस पर्यावरणीय सेवा देणाऱ्या परिसंस्था आहेत, तशीच 'सडा' हीसुद्धा एक मौल्यवान, परंतु फारशी दाखल घेतली न गेलेली परिसंस्था आहे. सड्यांवरचा निसर्ग, त्यामागचं विज्ञान लोकसहभागातून ही मौल्यवान परिसंस्था टिकवण्याची गरज हे सगळं उलगडणारी पुण्याच्या वनस्पतिशास्त्रज्ञ डॉ. अपर्णा वाटवे यांची विशेष मुलाखत...

 

सडा म्हणजे 'ओसाड माळरान' असा एक सर्वसाधारण दृष्टिकोन आहे. परंतु, पर्यावरणीय दृष्टिकोनातून 'सडा' ही एक मौल्यवान परिसंस्था आहे. त्याची कोणती खास वैशिष्ट्य सांगता येतील ?
 

'परिसंस्था' म्हणून आपण एखाद्या प्रदेशाचा विचार करतो तेव्हा तेथील भूरूप आणि तिथे वाढलेला निसर्ग (वनस्पती, प्राणी इ.) या दोन्ही गोष्टी येतात. दगड, दगडांमधल्या भेगा आणि खाचखळगे, त्यात साचणारी माती, पावसाळी तळी अशा अनेक छोट्या-छोट्या अधिवासांनी आणि त्यावरील रानफुलोरा, गवतवर्गीय वनस्पती, कीटक आणि प्राणी यांनी मिळून 'सडा' ही एक परिसंस्था तयार होते. सड्यावरच्या प्रत्येक छोट्या अधिवासात असणारी जैवविविधता वेगळी आहे. 'जांभादगड' हे सड्याचे मुख्य वैशिष्ट्य. शिवाय सड्यावर पडणारं पावसाचं पाणी, त्यात मिसळणारी सूक्ष्मद्रव्य (मायक्रोन्युट्रियन्स) आणि त्यांचे पाण्याद्वारे होणारं वहन, तसेच सड्यांवर परागीभवन करणाऱ्या कीटकांची होणारी पैदास या सगळ्या प्रक्रिया 'सडा' या परिसंस्थेचा अविभाज्य भाग आहेत.

 

'गवताळ प्रदेश' (ग्रासलॅण्ड) आणि सडे (लॅटेरिटीक प्लॅट्यू) या दोघांमध्ये नेमका काय फरक आहे ?

 

सड्यांना 'ग्रासलॅण्ड' म्हणण्यापेक्षा 'आऊटक्रॉप इकोस्टिटीम' म्हणणं जास्त योग्य होईल. ज्या भूभागावर 'गवत' हीच प्रामुख्याने आढळणारी वनस्पती प्रजाती असते त्या भूभागाला सर्वसाधारणपणे गवताळ प्रदेश म्हटलं जातं. सड्यावरही वर्षातला काहीकाळ गवत भरपूर उगवत असल्यामुळे भारतात अधिवासांचं वर्गीकरण करताना सड्याला गवताळ प्रदेशांमध्ये समाविष्ट केलं गेलं आहे. मात्र, आफ्रिका, अमेरिका, उत्तरभारत, मराठवाडा, इ. भागांमध्ये जे मोठे गवताळ प्रदेश आहेत, त्यांचं वैशिष्ट्य असे की, तिथे दगडांची झीज होऊन जी सूक्ष्मद्रव्ययुक्त माती तयार झाली आहे, त्या मातीत गवत वाढते. सड्यांवर मातीचे प्रमाण अत्यल्प असते. कारण, खडकाची झीज होऊन माती तयार होण्याच्या वेगाच्या तुलनेत, तयार होणारी माती आणि सूक्ष्मद्रव्ये पावसाने धुऊन जाण्याचा नैसर्गिक वेगच जास्त असतो. त्यामुळे गवताव्यतिरिक्त काही कंदवर्गीय वनस्पती (Geophytes), Utricularia सारख्या कीटकभक्षी वनस्पती (Carnivorous plants) आणि Eriocaulon सारख्या प्रजाती, ज्या इतरत्र तुरळक आढळतात, त्या सड्यांवरती प्रचंड प्रमाणात दिसतात. हे सड्याचे एक वेगळेपण आहे.

 

सड्याचे सध्याचे रूपही 'शिखर परिसंस्था' (क्लायमॅक्स इकोस्टिटीम) म्हणायची की 'ढासळलेली परिसंस्था' (डीग्रेडेड इकोस्टिटीम) म्हणायची ? पर्यावरणशास्त्र नेमकं काय सांगतं ?

 

'शिखर परिसंस्था' ही तशी जुनी संकल्पना आहे. पर्यावरण तज्ज्ञांकडून ती एक आदर्श अवस्था मानली जात होती आणि निसर्ग संवर्धन करायचं म्हणजे 'शिखर परिसंस्था' निर्माण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करायचे असा एक दृष्टिकोन होता. मात्र, पर्यावरणाचा अभ्यास जसजसा वाढत गेला तसतसं असं लक्षात यायला लागलं की, शिखर परिसंस्था हीसुद्धा एक बहुआयामी आणि प्रवाही संकल्पना आहे. सड्यांवरच्या परिसंस्थेला आपण 'माती-आधारित परिसंस्था' असं म्हणू शकतो. म्हणजे जमिनीवर मातीचे प्रमाण, प्रकार, कसे, किती आहे त्यावरून तेथील परिसंस्था किती उच्चतम पातळी गाठेल ते ठरते. त्यामुळे साहजिकच मातीच्या प्रमाणानुसार आपल्याला सड्यांवर वनस्पतिवैविध्य आढळणार. पर्यावरणसंवर्धनात 'माणूस नसताना निसर्ग जसा राहिला असता तसा तो निर्माण करायचा' हा दृष्टिकोन आता हळूहळू मागे पडतो आहे. कारण, माणूस हा हजारो वर्षांपासून निसर्गाचा अविभाज्य भाग राहिला आहे. त्यामुळे आता 'शिखर परिसंस्थे'पेक्षा निरनिराळ्या ठिकाणचे 'समाज-पर्यावरणीय भूप्रदेश' समजून घेणं आणि जपणं हा नवा दृष्टिकोन विकसित झाला. कोकणातील वा पश्चिम घाटावरचे सडे हे असेच 'समाज-पर्यावरणीय भूप्रदेश' आहेत. कारण, सड्यांच्या आजूबाजूला प्राचीन काळापासून गावं वसलेली आहेत. मानवी वस्तीच्या प्रागैतिहासिक खुणा आहेत. त्यामुळे 'माणसाचा वावर अजिबात नसतानाही परिसंस्था कशी असेल' असा भूतकाळाचा अंदाज कशासाठी करत राहायचा ? असं मला वाटतं. त्यापेक्षा या परिसंस्थेच्या आणि त्यातील मानवासहित जैवविविधतेच्या भविष्याचा विचार जास्त गरजेचा आहे. त्यासाठी अशा परिसंस्थांचे 'संरक्षण' नाही, तर सुयोग्य व्यवस्थापन व्हायला हवे.

 

 
 

कोकणातले सडे सगळ्यांना परिचित आहेत. पण त्याव्यतिरिक्त भारतात असे सडे प्रामुख्याने कुठेकुठे आढळतात ?

 

अशा तर्हेच्या फार कमी परिसंस्था जगात आढळतात. भारतात मेघालयामध्ये असलेले वा चीनमध्ये मोठ्या प्रमाणावर असलेले चुनखडीचे भूभाग हाही सड्यांचाच एक प्रकार म्हणता येईल. तेथील परिसंस्थेची वैशिष्ट्यं वेगळी आहेत. पश्चिम किनारपट्टीवर केरळपर्यंत, तसंच महाबळेश्वर, बेळगाव इ. सह्याद्रीच्या माथ्यावर मोठाले सडे आहेत. मराठवाड्याच्या दक्षिण भागात जत, बिदर इ. भागांत असेच फार प्राचीन सडे पाहायला मिळतात. ओडिशामध्येही खूप विस्तृत असे सडे आहेत. तिथे सालचे जंगल मोठ्या प्रमाणावर आढळते. मध्यप्रदेश, छत्तीसगढमध्येही बेलाडी वगैरे ठिकाणी सडे आढळतात. मात्र, पश्चिम घाट, कोकण आणि मलबार किनारपट्टीवरचे सडे हे जैवविविधतेच्या बाबतीत सर्वाधिक श्रीमंत आहेत. जगाचा विचार केला, तर ब्राझील, आफ्रिकेतील आयव्हरी कोस्ट, मादागास्कर आणि ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये विस्तृत सडे पाहायला मिळतात.

 

बऱ्याचशा सड्यांवर गेली वर्षानुवर्षं स्थानिक लोकांकडून गुरेचराई होते आहे. याचा तेथील परिसंस्थेवर नेमका काय परिणाम झालेला आढळतो?

 

गुरेचराई हा खरंतर खूप गुंतागुंतीचा विषय आहे. जगात बहुधा सगळीकडेच 'चराई' हा 'आऊटक्राप इकोस्टिटीम'चा भाग राहिलेला आहे. गंमत अशी की, पूर्वी गवे, हरणं, ससे असे रानटी प्राणी चरत होते. पशुपालन सुरू झाल्यापासून मग हळूहळू गुरं चरायला लागली. एक लक्षात घेण्यासारखं शास्त्रीय सत्य असं आहे की, 'मर्यादित हस्तक्षेप हा जैवविविधतेला पूरक ठरतो.' त्यामुळे निरनिराळ्या वनस्पतींसाठी संधी उपलब्ध होते. कास पठार किंवा अन्य काही ठिकाणी गुरेचराई पूर्णतः बंद केल्यामुळे गवत अतिप्रमाणात वाढल्याची उदाहरणंही साध्या निरीक्षणात आढळली आहेत. फक्त एखाद्या सड्यावर किती गुरं चरली तर ते फायदेशीर ठरेल आणि किती चरली तर धोकादायक ठरेल याच्यातली सीमारेषा सांगणं अवघड आहे. त्यासाठी नुसत्या फुलांचं निरीक्षण नाही तर विविध संवेदनशील प्रजातींचा आणि प्रक्रियांचा अजून सखोल अभ्यास होण्याची गरज आहे.

 

मानवकेंद्री विचार करायचा झाला तर हे सडे कुठल्या कुठल्या पर्यावरणीय सेवा पुरवतात?

 

खरं सांगायचं झालं तर जंगल, नद्या, महासागर यांच्या पर्यावरणीय सेवांबाबत जेवढा अभ्यास झालाय तेवढा सड्यांच्या बाबतीत अजून झालेला नाही. परंतु, पाणी धरून ठेवणं ही सड्याची मोठी पर्यावरणीय सेवा आहे. सड्यांवर थोड्या प्रमाणात वाढणारं गवत हे स्थानिक लोकांना चारा म्हणून उपयोगी पडतं. पावसाळ्यात जेव्हा सड्यांवर भरपूर रानफुलं फुलतात तेव्हा परागीभवन करणाऱ्या कीटकांची तिथे प्रचंड पैदास, आवक होते. त्याचा फायदा निश्चितपणे आजूबाजूच्या शेती-बागायतीला होत असणार. सडे परिसर हा 'न्यूट्रीयन्ट कॅचमेट' आहे. म्हणजेच सड्यांवर वनस्पतिवैविध्यामुळे निर्माण झालेली सूक्ष्मद्रव्य (Micronutrients) पाण्याबरोबर वाहत जाऊन आजूबाजूच्या खोलगट भागात जमा होतात आणि तेथील माती पोषक बनते. अनेक सड्यांवरील देवस्थानं, गुहा, लेणी, किल्ले, तळी ही स्थानिकांची श्रद्धास्थाने आहेत. पावसाळ्यात दिसणाऱ्या सड्यांच्या मोहकरुपामुळे निसर्गपर्यटनाच्या दृष्टीनेही सडे महत्त्वाचे ठरतात.

कोकणातल्या काही सड्यांवर अलीकडेच कातळ शिल्पं आढळली आहेत. ही कातळशिल्प काय सूचित करतात ?

कातळशिल्पांच्या रूपाने सड्यांवरचा एक मोठा प्रागैतिहासिक वारसा आपल्या दृष्टीस पडलाय. अर्थात, माझा इतिहास, पुरातत्त्व इ. विषयांचा फारसा अभ्यास नाही, पण कातळशिल्पांवरून एक गोष्ट निश्चित कळते की, चार-पाच हजार वर्षांपूर्वीसुद्धा सड्यांवर माणसांचा वावर होता आणि एक संस्कृती नांदत होती. याच्यावर अनेक लोकांच्या 'डॉक्टरेट्स' होतील एवढा मोठा हा अभ्यासाचा विषय आहे. ही कातळशिल्पं बघायला आता सड्यांवर पर्यटन वाढेल. त्याचे चांगले-वाईट दोन्ही परिणाम होऊ शकतात, हे लक्षात घेऊन त्याचं नियोजन आत्ताच चालू केलं पाहिजे. कर्नाटकात हंपी अथवा मध्यप्रदेशातलं भीमबेटका हे जसे ऐतिहासिक वारसा स्थळांमुळे जगाच्या नकाशावर आले, तशीच एक वेगळी ओळख या कातळशिल्पांमुळे कोकणाला मिळेल. याचा अभिमान वाटावाच, पण जबाबदारीची जाणीव आपल्याला ठेवावी लागेल.

 

सडा-परिसंस्था संरक्षण-संवर्धनासाठी आपण 'रॉक आऊटक्रॉप ऑफ इंडिया' या नावाने एक चळवळ सुरू केली आहे. त्याबद्दल सविस्तर जाणून घ्यायला आवडेल.

 

'रॉक आऊटक्रॉप ऑफ इंडिया' हा पर्यावरण क्षेत्रात, विशेषतः 'आऊटक्रॉप इकोस्टिटीम' क्षेत्रात अभ्यास आणि काम करणाऱ्या विविध क्षेत्रातील मंडळींचा एक गट आहे. जांभ्या दगडाचे सडे, ग्रॅनाईटचे पर्वत आणि बेसॉल्टची पठारं अशा तिन्ही प्रकारच्या 'आऊटक्रॉप इकोस्टिटीम'चा अभ्यास, माहिती संकलन या माध्यमातून आम्ही करत असतो. आफ्रिका, ऑस्ट्रेलिया इ. देशांमध्ये अशा प्रकारच्या परिसंस्थेच्या संवर्धनासाठी काम करणाऱ्या लोकांशीही आम्ही या माध्यमातून संपर्कात असतो. 'रॉक आऊटक्रॉप नेटवर्क' आम्ही २०१२ साली सुरू केलं. अगदी सुरुवातीला आम्ही पश्चिम घाटाच्या नाशिक ते आंबोली या पट्ट्यातल्या १५ जागा निवडल्या. या भागांमधल्या अभ्यासपूर्वक संवर्धन करण्यासाठी उत्सुक असलेल्या लोकांशी संवाद करत एक साखळी जोडून घेतली. यातून अभ्यास आणि विचार विनिमय यांना एक गती मिळाली. आता कोकणातल्या सड्यांवरही हळूहळू लक्ष केंद्रित करत आहोत. तेथे सडे वाचविण्याचे काम करणाऱ्या स्थानिक संस्थांच्या कार्याला या माध्यमातून हातभार लावायचा प्रयत्न आहे.

 

अवाजवी मानवी हस्तक्षेपापासून सडे मुक्त राहावेत आणि तेथील मौल्यवान परिसंस्थेचे संरक्षण व्हावे यासाठी आज नेमके काय होणे आवश्यक आहे?

 

निसर्ग संवर्धन हे लादलेले असू नये. लादलेल्या निसर्ग संवर्धनाचे दुष्परिणाम भारतात अनेक ठिकाणी अनुभवायला मिळाले आहेत. सड्यांच्या बाबतीत म्हणायचं झालं तर सड्यांवरची जैवविविधता, तिचं महत्त्व याबाबत वैज्ञानिक जागरूकता निर्माण करण्याचं काम आम्ही शास्त्रज्ञ लोक करू शकतो. परंतु, प्रत्यक्षात संवर्धन होणं हे बऱ्याच अंशी स्थानिक लोकांवर अवलंबून आहे. 'ही मौल्यवान परिसंस्था आपली आहे. आपण जपली पाहिजे' अशी समाज भावना निर्माण होणं गरजेचं आहे. ती एकदा झाली की मग स्थानिक लोकच विविध मार्ग शोधून संवर्धनात पुढाकार घेतील. त्यासाठी जैवविविधता कायदा, अशी अनेक साधनं उपलब्ध आहेत. एक गोष्ट मात्र मला इथे ठामपणे मांडावीशी वाटते ती म्हणजे शासनाने 'पडिक जमिनी' म्हणून जे सड्यांचं नामकरण केलंय ते ताबडतोब बदलण्याची गरज आहे. शासनाने पडिक जमिनींचा अ‍ॅटलास तयार केला आहे. ज्यामध्ये भारतातल्या सुमारे 20 टक्क्यांपेक्षा जास्त भूभागाला एकमार्गी 'पडिक जमीन' म्हणून संबोधलं गेलं आहे. यामध्ये सगळ्या सड्यांचा समावेश होतो. यामुळे विज्ञान समजून न घेता सड्यांकडे बघण्याचा एक नकारात्मक दृष्टिकोन उगाचच निर्माण झालाय. हे कुठेतरी बदलायला हवंय. जैवविविधतेच्या दृष्टीने संवेदनशील असलेले सडे पडीकजमिनीच्या परिभाषेतून वगळायला हवेत. तर मग पुढे सकारात्मक दृष्टिकोन विकसित होऊन 'लोकसहभागातून सड्यांचं संवर्धन' वगैरे गोष्टी शक्य होऊ शकतील.

@@AUTHORINFO_V1@@