भारतस्य प्रतिष्ठे द्वे संस्कृतं संस्कृतिस्तथा...

    दिनांक  14-Aug-2019 19:47:55केंद्र सरकारने १९६९ साली संस्कृत दिन किंवा संस्कृत महोत्सवाची घोषणा केली. तद्नुसार दरवर्षी श्रावण महिन्यातील (इंग्रजी-ऑगस्ट महिना) पौर्णिमेला संस्कृत दिन साजरा केला जातो. योगायोगाने याच दिवशी बहीण-भावातील अतूट नाते सांगणारा 'रक्षाबंधन' हा सणही असतो. सोबतच याच शुभदिनापासून विद्यार्थी गुरुकुलात राहून वेदाध्ययनाची सुरुवात करतात. परिणामी, संस्कृत विद्वान, विद्यापीठे, शैक्षणिक संस्था, स्वयंसेवी संस्था आणि हितचिंतक मोठ्या उत्साहाने राखी पौर्णिमेसह 'संस्कृत दिन'ही साजरा करतात.


संस्कृत दिन साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे, संस्कृत भाषा व साहित्याने मानवी आयुष्यात दिलेल्या योगदानाचे स्मरण करणे. तसेच प्राचीन काळापासून चालत आलेल्या संस्कृतचा गौरव करणे, संस्कृतसंबंधित अभ्यासक्रमांची माहिती देणे, संस्कृत पुस्तकांचे प्रकाशन, प्रख्यात संस्कृत पंडितांचा सन्मान करणे, विविध साहित्यविषयक स्पर्धांचे आयोजन, नृत्य, नाट्य आणि संगीतविषयक कार्यक्रमांचे आयोजन करणे आणि संस्कृतसंबंधित अकादमीय व सांस्कृतिक उपक्रम राबवणे, हा उद्देशही यामागे असतो. संस्कृत ही जगातल्या सर्वात प्राचीन भाषांपैकी एक असून ती इंडो-युरोपियन भाषा कुळातली आहे. नेमके उच्चार आणि अतिशय प्रमाणबद्ध व्याकरण हे संस्कृतचे वैशिष्ट्य. पाणिणी, पतंजली, भर्तृहरी, कात्यायन आदी विद्वानांनी संस्कृतच्या व्याकरणाची रचना केली आहे. त्याचमुळे संस्कृत हजारो वर्षांपासून जीवंत आहे. स्वामी विवेकानंद यांनी एकदा यावरूनच असे म्हटले होते की, "संस्कृतचे स्पष्ट उच्चार भारतीयांना प्रतिष्ठा, शक्ती आणि बळ देतात." संस्कृत एखाद्या प्रवाही नदीसारखी आहे. भारतीय चैतन्य वैदिक काळापासून आजपर्यंत संस्कृतच्या प्रकाशात झळाळून निघाले, असे मत बंगळुरुतील एसव्यासा योग विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. एच. आर. नागेंद्र यांनी व्यक्त केले. "प्राचीन भारताची सांस्कृतिक, सामाजिक, नैतिक, आध्यात्मिक आणि राजकीय नीतिमूल्ये-परकीय आक्रमणांनंतरही संस्कृत भाषा व त्यातील साहित्यानेच जपली. संस्कृत भाषेत दाखवलेल्या संस्कृतीने भारतीय जनतेला एकत्र ठेवले आणि तसेच देशाचा श्वासोच्छवासही चालू ठेवला. म्हणजे सांस्कृतिक वैविध्य, वांशिक वैविध्य, भाषाभाषांतील वैविध्य, सांप्रदायिक वैविध्य असूनही संस्कृतमुळे इथली एकता अबाधित राहिली," असे माजी न्यायमूर्ती, माजी राज्यसभा खासदार आणि माजी राज्यपाल डॉ. ए. रामा जोईस सांगतात. इंडो-युरोपियन भाषा कुळातील भाषाभगिनी जसे की, लॅटिन व ग्रीक या सतराव्या शतकानंतर त्यांच्याच मायदेशातून आधुनिक युगाच्या उदयाने हद्दपार झाल्या. परंतु, केवळ भारतातील संस्कृत भाषा आणि वारसाच सांस्कृतिक घटक म्हणून अस्तित्वात राहिला. विशेष म्हणजे, भारतीयांच्या आयुष्यातील मुश्किलीने-छिद्रान्वेषी दृष्टीनेच असे दिसेल की, ज्यावर संस्कृत ग्रंथांचा, महाकाव्यांचा, पुराणांचा, व्यक्तिमत्त्वांचा, लोककथांचा प्रभाव नसेल. तसेच अद्वैतवाद, भक्ती, निष्काम कर्मयोग, सेवा, असंग, त्याग, संन्यास, सर्वधर्म समभाव, सत्य, धर्म, अहिंसा, विश्वबंधुत्व आणि अन्यही कितीतरी गोष्टी संस्कृतोद्भवच आहेत. सनातन धर्माची वैयक्तिक, सामाजिक, राष्ट्रीय आणि वैश्विक श्रेयसहित नि अभ्युदयादी तत्त्वे संस्कृतमध्येच लिहिली-सांगितली गेली.

 

'अभिज्ञान शाकुंतलम' हे कालिदासाने लिहिलेले नाटक संस्कृतमधून इंग्रजीत अनुवादित करणाऱ्या आणि तत्कालीन कलकत्ता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश असलेल्या सर विल्यम्स जोन्स यांनी १७८९ साली असे सांगितले की, "भारताला वा भारतीयांना समजून घेणे यात संस्कृत भाषा आणि संस्कृती समजून घेणे समाविष्ट आहे. संस्कृत भाषा, साहित्य आणि संस्कृती या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. प्रत्येक सुशिक्षित भारतीयाची आपल्या प्राचीन भाषा व संस्कृतीचे संरक्षण व जतन करणे ही प्राथमिक जबाबदारी असायला हवी. आपण संस्कृतला विसरलो म्हणजे असे होईल की, आपण आपले भारतीयांचे अंतःसत्त्वच विसरलो आहोत." संस्कृत भाषेला राज्यघटनेच्या आठव्या परिशिष्टात स्थान देण्यात आले आहे. ही प्राचीन व शास्त्रीय भाषा असून तिला संगणकासाठी सर्वात योग्य भाषाही म्हटले जाते. आजघडीला देशातील जवळपास दोन कोटी व्यक्ती इयत्ता पहिलीपासून ते पीएच.डीपर्यंत संस्कृतचे शिक्षण घेत आहेत. देशात सुमारे १७ संस्कृत विद्यापीठे असून ही आंतरराष्ट्रीय भाषा आहे. कारण, जगभरातल्या जवळपास ५० देशांत आणि २५० विद्यापीठांमध्ये संस्कृत भाषा शिकवली जाते. भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संस्कृत ही भारताची प्रशासकीय भाषा असावी आणि केंद्र सरकारने याबद्दलचा निर्णय घ्यावा, असे सूचवले होते. दुसरीकडे महाराष्ट्राने गेल्या कित्येक शतकांपासून संस्कृत भाषेतील अभ्यासाला व संशोधनाला प्रोत्साहन दिले, चालना दिली. आधुनिक काळातील रा. गो. भांडारकर, उटगीकर, पुसाळकर, व्ही. एस. सुकथनकर, पां. वा. काणे, व्ही. एस. आपटे, डॉ. सदानंद जोशी, डॉ. सरोज भाटे आणि अन्य विद्वानांनी गेल्या १०० वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर संस्कृत भाषेसाठी योगदान दिले. पुण्यातील भांडारकर ओरिएन्टल रिसर्च इन्स्टिट्यूटद्वारे देशभरातील भारतविद्याविद्वानांशी चर्चा करुन 'द ऑल इंडिया ओरिएन्टल कॉन्फरन्स'ची स्थापना १९१८ साली करण्यात आली.

 

यंदा देशभरातील संस्कृतप्रेमी संस्कृतोत्सवाचे सुवर्णमहोत्वसी वर्ष साजरे करणार असतानाच त्याच दिवशी योगायोगाने भारताचा ७३वा स्वातंत्र्य दिनही आहे. अशात केंद्र व राज्य सरकारे, स्वयंसेवी संस्था, संस्कृत बंधूंसमोर देशातील प्रतिष्ठित असा संस्कृत भाषेच्या संवर्धन, जतनाची आव्हानेही आहेत. वेदाध्ययनाची मौखिक परंपरा आजही सुरू असून वंशपरंपरेने त्याचे जतनही केले जात आहे. यात डिजिटल तंत्रज्ञानाचाही (ध्वनिचित्रफिती) उपयोग करून घेतला जात आहे. तसेच मौखिक वेदाध्ययनाची परंपरा जपणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीही देण्यात येत आहे. ज्ञानसंपत्तीपूर्ण बहुमोल अशी संस्कृत हस्तलिखिते डिजिटल माध्यमातून सुरक्षित केली जात आहेत. विद्यार्थ्यांना देशी भारतीय भाषांतील साहित्याचे संस्कृतमध्ये भाषांतर, अनुवाद करण्यासाठीही निधी देण्यात येत आहे. संस्कृतची वाढ व प्रगती यातूनही होऊ शकते. कितीतरी चर्चासत्रे-परिषदा, संमेलने, काव्य तसेच कल्पक लिखाणाचे उपक्रमही विविध विद्वान, संस्था आणि संघटनांकडून राबवले जात आहेत. राज्य व केंद्र सरकारने स्थापन केलेल्या संस्कृत विद्यापीठांनी विविध देशांच्या नागरिकांना आणि संस्कृतींना स्थान देऊन 'ग्लोबल संस्कृत स्टडी फोरम'च्या माध्यमातून संस्कृत प्रचार आणि प्रसारासाठी कार्यरत व्हावे. सोबतच या संस्कृत विद्यापीठांचा भर संशोधनप्रधान आणि संस्कृतप्रधान असलेल्या ज्ञाननिर्मितीवर असला पाहिजे. ही संस्कृत विद्यापीठे शेकडो वर्षे नालंदा, तक्षशीला, काशी विद्यापीठाच्या धर्तीवर एक रोल मॉडेल म्हणून समोर येऊ शकतात. विष्णुशर्मा यांचे पंचतंत्र, चरकसंहिता व सुश्रुतसंहिता, भगवद्गीता, अभिज्ञान शाकुंतलम यांनी आपल्याला गेल्या दीड हजार वर्षांपासून जगात प्रतिष्ठा दिली आहे. निरनिराळ्या माध्यमे व आयसीटी पद्धतीमध्ये संस्कृत भाषेचा प्रचार आणि प्रसार करण्याची, त्यातल्या बरोबरी होऊ न शकणाऱ्या अथांग ज्ञानाची जगाला ओळख करुन देण्याची हीच योग्य वेळ आहे. चला तर मग जगाची सांस्कृतिक आणि आध्यात्मिक राजधानी असलेल्या संस्कृत भाषेच्या व त्यातील साहित्याच्या वाढीसाठी योगदान देऊया.

 

- प्रा. एम. के. श्रीधर

(लेखक एस-व्यासा विद्यापीठाच्या योग

आणि मानवता शाखेचे प्रमुख आहेत.)

(अनुवाद : महेश पुराणिक)