लघु उद्योग भारतीचा १६ ते १८ ऑगस्ट दरम्यान रजत जयंती महोत्सव

    दिनांक  13-Aug-2019 18:44:05


 


सरसंघचालक, अर्थमंत्री, उद्योगमंत्री, रेल्वेमंत्री उपस्थित राहणार

 

नागपूर : लघु उद्योग भारतीच्या रजत जयंती महोत्सवाचे आयोजन नागपूर येथे १६ ते १८ ऑगस्ट या दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. या महोत्सवात सूक्ष्म आणि लघु उद्योगांशी निगडित विविध विषयांवर चर्चासत्रे होणार आहेत. या महोत्सवाचे उद्घाटन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या हस्ते होणार आहे. केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन्, रेल्वेमंत्री पीयूष गोयल, श्रम व रोजगार राज्यमंत्री संतोषकुमार गंगवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदी मान्यवर या महोत्सवात आयोजित विविध चर्चासत्रांमध्ये सहभागी होणार आहेत.

 

देशभरातील विविध व्यापारी क्षेत्रात कार्यरत असलेले लघु उद्योग भारतीचे २५०० हून अधिक उद्योजक सदस्य (उत्पादक आणि सेवाप्रदाते) या रजत जयंती समारोहात सहभाग घेणार आहेत. विविध क्षेत्रातील उद्योजक संघटित होऊन, उद्योजक आणि विविध सरकारी मंत्रालय यांच्यात अनेक विषयांवर परिसंवादांचे आयोजन करण्यात आले आहे. वेस्ट टू वेल्थ क्रिएशन, प्रेरणा बदल आणि आव्हाने स्वीकारण्याचा दृष्टीकोन, संशोधन आणि विकास, नवीन कामगार संहिता परिचय आणि माहिती, आयात पर्यायी उत्पादने आणि निर्यात प्रोत्साहन या विषयांवर या महोत्सवात परिसंवादांचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात विविध उद्योगांशी निगडित औद्योगिक संघटनांची विशेष परिषदही होणार आहे. देशाच्या विविध भागांतून सुमारे १२५ औद्योगिक संघटनांनी या परिषदेत सहभागी होण्याचे निश्चित केले आहे.

 

लघु उद्योग भारती ही देशभरात ४५० हून अधिक जिल्ह्यांत शाखा असलेली राष्ट्रव्यापी संस्था म्हणून विकसित झाली आहे. आज लघु उद्योग भारती राष्ट्रीय स्तरावर श्रम, वीज, पर्यावरण, अर्थ आणि कर या विषयांतील धोरण आखणीत आपले योगदान देत आहे.