उद्ध्वस्त किल्लारी उभारणारे प्रवीण परदेशी सांगलीत

    दिनांक  13-Aug-2019 19:27:22


 


मुंबई : महापुराच्या अस्मानी संकटानंतर पूरग्रस्तांना पुन्हा उभे करण्याची जबाबदारी कर्तव्यदक्ष सनदी अधिकारी प्रवीण परदेशी यांना देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत जवळचे आणि सध्याचे मुंबई महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी त्यांच्या याच कौशल्यासाठी ओळखले जातात. १९९३ मध्ये लातूर जिल्ह्यातील किल्लारीला जेव्हा भूकंप झाला, तेव्हा जे काम परदेशी यांनी केले, त्या कामाची आठवण अजूनही प्रशासकीय व राजकीय वर्तुळात काढली जाते. आता पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी परदेशी यांच्याकडे विशेष पुनर्वसन विभागाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे.

 

सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. या सर्व भीषण परिस्थितीत प्रशासन प्रमुख म्हणून प्रवीण परदेशी सांगलीत दाखल झाले आहेत. नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी याबाबत आढावा बैठकही घेतली. १९९३ ला किल्लारी भूकंप झाला, तेव्हा प्रवीण परदेशी लातूरचे जिल्हाधिकारी होते. १९८५ च्या बॅचचे ते आयएएस अधिकारी आहेत.

 

कोणत्याही नैसर्गिक आपत्तीनंतर लोकांना पुन्हा उभे करणे हे सर्वात मोठे कठीण काम असते. पुरानंतर पसरणारी रोगराई, पडलेली घरे पुन्हा बांधणे, संसार उभे करण्यासाठी लोकांना बळ देणे, संबंधितांना पुरेशी नुकसानभरपाई मिळवून देणे अशा अनेक गोष्टींचा यामध्ये समावेश होतो. त्यामुळे याबाबतचा अनुभव असलेल्या अधिकार्‍यावरच ही जबाबदारी टाकण्यात येते. तशी आता परदेशी यांना ही अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे. पूर पूर्ण ओसरायला अजून किमान तीन दिवस लागतील, असे सांगितले जात आहे.