दूरदर्शनच्या ‘वतन’ या देशभक्तीपर गीताचे प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते प्रकाशन

13 Aug 2019 16:13:39


 

स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत वतनया दूरदर्शनने निर्मित केलेल्या देशभक्तीपर गीताचे प्रकाशन झाले. हे गीत नवभारताला समर्पित करण्यात आले आहे. या गीतात सरकारने केलेल्या अनेक उपक्रमांचा तसेच 'चांद्रयान-2' या मोहिमेमागच्या दृष्टीकोनाचे वर्णन करण्यात आले आहे. तसेच देशासाठी बलिदान देणाऱ्या शहीद जवानांच्या पराक्रमाचाही त्यात उल्लेख आहे. यावेळी बोलताना जावडेकर यांनी या गीताच्या निर्मितीबद्दल दूरदर्शन आणि प्रसारभारतीचे अभिनंदन केले. या गीतामुळे स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यात रंगत येईल, असे ते म्हणाले.

 

जावेद अली यांनी स्वरबद्ध केलेल्या या गीताचे बोल आलोक श्रीवास्तव यांनी लिहिले आहेत, तर दुष्यंत यांनी त्याला संगीतबद्ध केले आहे. दूरदर्शनची विशेष निर्मिती असलेले हे गीत दूरदर्शन आणि आकाशवाणीच्या सर्वच केंद्रातून प्रक्षेपित केले जात आहे. या गीताचा अधिकाधिक प्रसार व्हावा,  या हेतूने त्यावर कुठलाही कॉपीराईट ठेवण्यात आलेला नाही.

यावेळी प्रसारभारतीचे अध्यक्ष डॉ. ए. सूर्यप्रकाश, कार्यकारी प्रमुख शशी शेखर वेंपत्ती यांच्यासह माहिती आणि प्रसारण विभागाचे अनेक अधिकारी उपस्थित होते.

Powered By Sangraha 9.0