पाकच्या शोभाकाकी!

    दिनांक  13-Aug-2019 21:12:25
भारतीय भूमिकेच्या विपरित लेख लिहायला पाकिस्तानने जरी प्रेरणा वगैरे दिलेली नसली तरी शोभाकाकींना स्वतःला या लेखातल्या मुद्द्यांबद्दल काही वावगे वाटत नाही का? की हा लेख लिहित असताना शोभाकाकींचा विवेक कुठे हरवला होता? की त्यांची सद्सद्विवेकबुद्धी साकीनाक्यातल्या वाहनांच्या दाटीवाटीत अडकली होती? असा प्रश्न निर्माण होतो.

 

साकीनाक्याच्या भयंकर रहदारीला वैतागलेल्या शोभाकाकींचे सत्य पाकिस्तानचे भारतातील माजी उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी नुकतेच उघड केले. परिणामी, आधीच वाहनांच्या भोंग्याने अन् गर्दीने त्रासलेल्या, पिचलेल्या, शिणलेल्या डे काकी जरा जास्तच विचलित झाल्या नि त्यांनी या रहस्योद्घाटनाला थेट देशाचाच अपमान-अवमान म्हटले. मुद्दा पाकिस्तानचा, जम्मू-काश्मीरचा असो वा अन्य कोणताही, नेहमीच देशविरोधी भूमिका घेणार्‍या शोभाकाकींना स्वतःच्या नाचक्कीवरून देशाचा मान-सन्मान वगैरे आठवला. अर्थात स्वतःचा जीव वाचवण्यासाठी, धुतल्या तांदळासारखे दाखवण्यासाठी काकी असल्या उठाठेवी करणारच म्हणा! कारण प्रश्न प्रतिमेचा आहे नि तीच जर नेस्तनाबूत झाली तर? पाकिस्तानविषयी आपुलकी दाखवण्याचे जे काम आतापर्यंत लपूनछपून व्हायचे तेच जर ठसठशीतपणे समोर आले तर? तर आताच्या काळात-या वयात पुन्हा एकदा जनतेकडून छी थू व्हायची नि जी कमावली तीही जायची-पत/प्रतिष्ठा! म्हणून काकी बोलू लागल्या नि बोलता बोलता बासित यांच्यावरच घसरल्या.

 

भारतीय सैनिकांनी धडाकेबाज कामगिरी करत २०१६ साली काश्मीर खोर्‍यातील कुख्यात दहशतवादी बुर्हान वानीचा खात्मा केला. तद्नंतर दहशतवाद्यांना, दगडफेक्यांना 'मासूम' आदी विशेषणे लावणार्‍या जमात-ए-पुरोगाम्यांनी मोठाच कल्ला केला. बुद्धीजीवी, उदारमतवादी, विचारवंत, धर्मनिरपेक्ष या नावांनी ओळखल्या जाणार्‍या स्वयंघोषित विद्वानांनी सरकारला, सैन्याला आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करत ढगात गेलेल्या बुर्‍हानप्रति सहानुभूती दाखवली. मात्र, तोंडाची वाफ दवडणार्‍या या शहाण्यांनी माध्यमांत लेख खरडले नाहीत नाहीत, असे वाटल्याने पाकिस्तानची खप्पामर्जी झाली. हीच गोष्ट पाकिस्तानच्या इथल्या राजदूताला बोचली व त्याने आपली खंत प्रख्यात पत्रकार शोभा डे यांची भेट घेऊन बोलून दाखवली. हाती काही काम नसल्याने रिकामटेकड्या शोभाकाकींनीही मग अब्दुल बासित यांच्या मागणीला प्रतिसाद देत लेखासाठी होकार भरला. त्यातूनच बुर्‍हान वानीच्या मृत्यूवर, जम्मू-काश्मिरातल्या परिस्थितीवर भाष्य करत काकींनी शब्दांच्या बाहुल्या नाचवल्या. शोभाकाकींनी पाकिस्तानची तळी उचलून धरली आणि अतिरेक्यांबद्दल वाटणार्‍या कळवळ्याला वाट मोकळी करून दिली.

 

‘Burhan Wani is dead, but he'll live on till we find out what Kashmir really wants’ शीर्षकाच्या या लेखात शोभाकाकींनी आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे बुर्‍हान वानीसह अराजकी ताकदींची बाजू घेतली. “भारतीय नेते वातानुकूलित खोल्यांत बसून शांतताप्रिय काश्मिरींबद्दल खोटीनाटी विधाने करतात, गैरसमज पसरवतात,” असे त्या म्हणाल्या. राजकारण्यांवर तोंडसुख घेतल्यानंतर शोभाकाकींना भारतीय सैन्य व सैनिकांतही खोट दिसली. परिणामी त्यांनी खोर्‍यातील सैनिकांनाही निरपराध काश्मिरींवर अन्याय-अत्याचार करणार्‍यांच्या पंक्तीत नेऊन ठेवले. खरे म्हणजे शोभा डे यांची ही भूमिका पाकिस्तान जे आजवर बडबडत आला, त्याला साजेशी व नेमकी भारताच्या विपरितच होती. सोबतच लेखात शेवटपयर्र्ंत याच पाकी चष्म्यातल्या मताला त्या चिकटून राहिल्या. इतकेच नव्हे तर पुढे शोभाकाकींनी, “आता (बुर्‍हान वानीला कंठस्नान घातल्यानंतर) जम्मू-काश्मीरमध्ये जनादेश घेण्याची (भारत वा पाकिस्तान किंवा स्वातंत्र्याची निवड) वेळ आली असून यातूनच हा प्रश्न सुटू शकेल,” असेही म्हटले. वस्तुतः हे शब्द पाकिस्तानचे आहेत आणि तेच शोभाकाकींनी आपल्या लेखातून मांडले. पण कसे? तर त्याचेच उत्तर अब्दुल बासित यांनी एका मुलाखतीत दिले व पाकिस्तानची भाषा आपल्या लेखणीतून उतरवण्यासाठी आपण शोभा डे यांना कसे राजी केले, हेही सांगितले.

 

अर्थात, शोभा डे अब्दुल बासित यांच्या राजीकरणाआधी असे काही लिहित वा बोलत नव्हत्या का? तर तसे नव्हे. २० ऑगस्ट, २०१४ रोजीही शोभाकाकींना पाकप्रेमाचा उमाळा आला होता-तो त्याआधीही यायचाच! परंतु, तेव्हा पाच वर्षांपूर्वी नरेंद्र मोदींनी नुकताच पंतप्रधानपदाचा कायर्र्भार स्वीकारला होता व स्वातंत्र्यदिनाचे संबोधनही देऊन झाले होते. दरम्यानच्या काळात 'जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही'चा प्रत्यय देत, पाकिस्तानने कुरापती काढायला सुरुवातही केली होती. मात्र, देशात सत्ताबदल झालेला असल्याने या आगळिकीला जशास तसे प्रत्युत्तरही मिळत होते. अर्थात, पाकिस्तानची कड घेणार्‍यांच्या पचनी ही गोष्ट पडत नव्हती नि ते आपल्या वर्तणुकीतून हे दाखवूनही देत होते. याचवेळी शोभाकाकींनी 'अल्लाहने पाकिस्तानची मदत करावी,' अशी करुणा भाकली! म्हणजे भारतात राहणार्‍या, इथल्या सोयी-सुविधांचा वापर करणार्‍या काकींना काळजी वाटली ती कोणाची, तर पाकिस्तानची! यातूनच त्यांच्या निष्ठा कुठे गहाण टाकलेल्या आहेत, हेही दिसते. आज त्याचाच उलगडा बासित यांनी केला तर शोभा डे यांना ती देशाची बदनामी वाटली व त्यांनी अब्दुल बासित यांची 'नीच' या शब्दांत निर्भर्त्सनाही केली. सोबतच, मी 'टाइम्स ऑफ इंडिया'तील वरील लेख पाकिस्तानच्या/अब्दुल बासित यांच्या सल्ल्याने लिहिलेला नाही, असेही सांगितले.

 

चोर चोरी पकडली गेली की, आधी खोट्याचा आधार घेतो, हे आपल्याला माहितीच आहे. शोभा डे यांची आताची धडपडही अशीच, 'मी नाही त्यातली'सारखीच असल्याचे दिसते. परंतु, खोटे बोलणे, देशविरोधी बोलणे, भारत व हिंदूंविरोधात, गोमांसबंदीविरोधात बोलणे, हे उद्योग शोभा डे नेहमीच करत आल्या. भारतात स्वतःच्याच देशाला, सैन्याला शिव्या घालणार्‍यांची कमतरता नसल्याने असले नग पाकिस्तानलाही हवेच असतात. स्वतःच्या सैनिकांवर, जिहादी दहशतवाद्यांवर विश्वास नसल्याने पाकिस्तान असल्यांना दत्तक घेऊन भारतविरोधी वातावरण तापते ठेवत असतो. शोभा डे, अरुंधती रॉय, उमर खालिद, कन्हैय्या कुमार, हुर्रियतचे म्होरके आदी मंडळी त्यापैकीच-टुकडे टुकडे गँगचे सन्माननीय सदस्यच! प्रसिद्धीच्या हव्यासापायी, अर्थपूर्ण व्यवहारांसाठी पाकिस्तानची, फुटीरतावाद्यांची, दहशतवाद्यांची बाजू घ्यायलाही त्यांना शरम वाटत नाही. 'कलम ३७०' निष्प्रभ केल्यानंतर यातल्या अनेकांनी त्यावरून देशविरोधी भूमिका घेतल्याचे आपण पाहतच आहोत. परंतु, आपले हेच पाकप्रेम चव्हाट्यावर आल्याने त्यांच्यातल्याच एक असलेल्या शोभाकाकी चवताळल्या. आपण पाकच्या इशार्‍यावर लेख लिहिला नाही, असे स्पष्टीकरण त्या देऊ लागल्या.

 

एकवेळ डे यांचे म्हणणे मान्यही करूया, पण इथे त्यांनी लेखातील मते नाकारलेली नाहीत. म्हणजे त्यात जी विघातक भूमिका घेतलेली आहे, ती अजूनही शोभाकाकींना मान्यच आहे. म्हणूनच जरी पाकिस्तानने प्रेरणा वगैरे दिलेली नसली तरी शोभाकाकींना स्वतःला या लेखातल्या मुद्द्यांबद्दल काही वावगे वाटत नाही का? की हा लेख लिहित असताना शोभाकाकींचा विवेक कुठे हरवला होता? की त्यांची सद्सद्विवेकबुद्धी साकीनाक्यातल्या वाहनांच्या दाटीवाटीत अडकली होती? असा प्रश्न निर्माण होतो. अर्थात, आपल्या चित्रविचित्र, वादग्रस्त विधानांनी स्वतःचीच 'शोभा' करून घेणार्‍या काकी याचे उत्तर देणार नाहीतच आणि जरी दिले तरी त्यात पुन्हा एकदा तोच तो मानवाधिकाराचा, अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा बेसूर सूर आळवला जाईल, हे खरेच. मात्र, देशात सध्या काँग्रेसचे पाकधार्जिणे सरकार नाही तर राष्ट्रप्रेमी, राष्ट्रवादी विचार सत्तेवर आहेत, हे शोभाकाकींनी लक्षात ठेवावे. त्यामुळे इथे आता देशाच्या एकता-अखंडतेला सुरुंग लावणार्‍या, पाकिस्तानची, दहशतवाद्यांची भलामण करणार्‍या प्रवृत्तींची कितीही प्रयत्न केले तरी डाळ शिजणार नाही!