आयुषमान खुरानाचे 'ड्रीम गर्ल' साठी ट्रान्सफॉर्मेशन

    दिनांक  13-Aug-2019 17:31:17


 

'अंधाधुन' चित्रपटासाठी नुकताच सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून राष्ट्रीय पुरस्कार विजेता आयुषमान खुराना आणि नुसरत भरुचा यांच्या 'ड्रीम गर्ल' या बहुचर्चित चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. हा ट्रेलर पाहताना प्रेक्षकांची हसून हसून पुरेवाट होणार आहे. या चित्रपटातील आयुषमानचा एक नवीन अवतार प्रेक्षकांसमोर आला आहे.

ट्रेलरच्या पहिल्याच सीनमध्ये आयुषमान स्त्रीवेषात असून सीता आणि राधाच्या भूमिकेत दिसत आहे, ज्याला प्रेक्षकांकडून टाळ्यांचा वर्षाव होत आहे. पूजा नावाने तो लोकांशी मुलीच्या आवाजात बोलताना दाखवण्यात आले आहे. त्यामुळे आता त्याच्या या आगळ्यावेगळ्या भूमिकेबद्दल प्रेक्षकांना थोडासा अंदाज आलाच असेल आणि चित्रपटाविषयीची उत्सुकता देखील द्विगुणित झाली असेल.

आयुषमानबरोबरच या चित्रपटात अनु कपूर त्याचे वडील म्हणून भूमिका साकारणार आहेत तर मनजोत सिंह त्याच्या मित्राच्या भूमिकेत आहे. नुसरत भरुचा त्याची प्रेयसी म्हणून या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाची निर्मिती एकता कपूर करत आहे. राज शांडिल्य दिग्दर्शित 'ड्रीम गर्ल' १३ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.