पणतूगिरीची अंधश्रद्धा

    दिनांक  13-Aug-2019 21:40:42   
एखाद्याला काय जगवते? कुणी म्हणेल ‘ढाई अक्षर प्रेम के.’ पण, छे, काही काही माणसे दोन अक्षरांवरच अख्खी हयात घालवत आहेत. ती दोन अक्षरे आहेत ‘हत्या’ आणि ही अक्षरं उच्चारणारी आणि त्यावर जगणारी व्यक्ती आहे तुषार गांधी. तुषार गांधी कायमच ‘गांधी हत्या’ या विषयावर भाषण करतात, त्यावरच गुजराण करतात. नाही म्हणायला, २००१ साली महात्मा गांधींचा एक विशेष फोटो अमेरिकन कंपनीला जाहिरातीसाठी वापरायला देऊन पैसे उकळण्याचा कुटील डाव तुषार यांनी केला होता. पण, त्यांना जनक्षोभाला सामोरे जावे लागले. मग तो मार्ग त्यांनी सोडला. ‘महात्मा’ असलेल्या पणजोबाच्या कर्तृत्वाचा असा क्षुद्र फायदा उठवू पाहणारे तुषार गांधी... यांच्याकडे पाहिले की वाटते, इस्पितळात मुलं अदलीबदली करण्याचे प्रकार चित्रपटात दाखवतात तसे काहीसे झाले आहे का? तर तुषार म्हणाले की, "दुर्दैवाने सरदार वल्लभभाई पटेल देशाचे पंतप्रधान झाले नाहीत. ते पंतप्रधान झाले असते तर त्यांनी संघ नेस्तनाबूत केला असता." हा तुषार यांचा जावईशोधच आहे, पण सत्य काय आहे? सरदार वल्लभभाई पटेलांनीच रा. स्व. संघावरील बंदी उठवली होती. देशासाठी सर्वोच्च त्याग आणि बलिदानाची भावना रा. स्व. संघाची विचारशक्ती आहे. नेमकी हीच विचारशक्ती सरदार वल्लभभाई पटेलांच्या कर्तृत्वामध्ये आहे. १०० टक्के सत्य परिस्थिती ही त्या परिस्थितीमध्ये असलेल्या व्यक्तीलाही कळत नाही. सरदार वल्लभभाई पटेल हे पंतप्रधान न बनता नेहरू का पंतप्रधान बनले, याची तत्कालीन कारणे तुषार गांधी यांनी जाणून घ्यावीत. आपल्या आजा-पणजाचे नावही तुकड्या तुकड्यांसारखे वापरणारे आणि त्यावरच आजन्म भाकरीचे आणि मानसन्मानाचे तुकडे पदरात पाडून घेणारे देशात पैशाला पासरी आहेत. त्या सर्व सापांचे मुकुटमणी तुषार गांधी शोभतात. असो. तर तुषार अंधश्रद्धा निर्मूलनसारख्यांना आवाहन करतात की, राजकीय अंधश्रद्धा (लोकांनी मोदींना आणि भाजपना निवडून दिले आणि त्यांनी कश्मीरचे ३७० कलम रद्द केले हे) मोडून काढा. देशामध्ये सध्या ‘राजा का बेटाही राजा नही बनता, जो काबिल है वही राजा बनेगा,’ असे वातावरण आहे. नेमके हेच तुषारसारख्या वंशराजांना पचनीच पडत नाही. आपण महात्म्याचे पणतू म्हणून वाट्टेल ते बोलण्याची मुभा आहे, अशी त्यांची अंधश्रद्धा आहे. पणतूगिरीच्या अंधश्रद्धेतून आजन्म बाहेर पडणारच नाही, कारण त्यावरच तर ते जगतात.

 

माँ-बेटे परदेशातही प्रसिद्ध

 

एका धर्मगुरूने म्हटले आहे की, "राहुल हे अत्यंत वाईट राजकारणी आहेत. मोदींना विरोध करण्यासाठी ते शत्रूंची सोबत करतात. हे दोघे स्वार्थासाठी काम करतात आणि कॅमेरासमोर येऊन रडतात." यावर काँग्रेसचे उरलेसुरले नेते आणि तेवढेच कार्यकर्ते म्हणतील? हे नक्कीच भाजपवाले म्हणत असतील. पण, हे मत कुणाही भाजपवाल्याचे नाही बरं का, राहुल आणि सोनिया गांधी यांच्याबद्दल असे शाब्दिक फटाके फोडणारे आहेत, ऑस्ट्रेलियाचे मुस्लीम धर्मगुरू इमाम मोहम्मद तौवहिदी. मुस्लीम धर्मगुरूंनी महाराणी सोनिया आणि त्यांच्या राजकुमार पुत्राबाबत हे विधान करणे म्हणजे उरल्या सुरल्या काँग्रेसच्या डोळयात, मनात आणि सर्वत्रच झणझणीत अंजन टाकल्यासारखे आहे. डोळे मिटून वाट्टेल ते करण्याची मांजरवृत्ती राहुल यांना अवगत आहे, हे सांगायला हवे. याची प्रचिती त्यांनी वेळोवेळी दिलीच आहे. आपण खूप भोळे आहोत वगैरेचा आव आणण्यात तर ते आणि त्यांची आई पटाईतच. त्यामुळे मागे त्यांच्या आईने आतला की काय असा आवाज ऐकला आणि पंतप्रधानपद नाकारले आणि मनमोहन सिंग पंतप्रधान झाले. सावकाराने आपला मुनिमाला कामाला लावावे तशी ती खेळी होती. ही भारतभूमी, इथली संस्कृती याविषयी या दोघांनाही अजिबात आपुलकी प्रेम नसावे, असेच त्यांचे वागणे असते. त्यामुळेच काश्मीरचे ३७० कलम रद्द केल्यावर सगळ्या देशाला आनंद झाला, पण यांना दुःख झाले. बरे वायनाडने यांना मोदीलाटेत बचावले. पण, याच वायनाडला पुराने त्राही त्राही करून सोडले, तेव्हा इथल्या खासदाराचे पहिले कर्तव्य होते की तिथे जाऊन लोकसेवा करावी. पण, हवापालट करावा तसे ते दोन दिवस वायनाडच्या दौर्‍यावर होते. वायनाडच्या जनतेचेही डोळे आता उघडले असतीलच, तर अशा या राजकुमारांना आणि त्यांच्या मातोश्रींना देश तर देश, परदेशातील लोकही चांगलेच ओळखू लागले आहेत. त्याशिवाय का, ऑस्ट्रेलियाचे इमामही त्यांच्याबद्दल बोलले. मोदी आणि भाजप, तसेच देशाबद्दल कुणीही सकारात्मक बोलले. माँ-बेटे आणि त्यांच्या दरबारातले हुजर्‍यांना वाटते की, देशातली हिटलरशाही, असहिष्णुता वाढली. तौवहिदी यांच्या वक्तव्याने हे लोक म्हणतील की, हिटलरशाही असहिष्णुता ऑस्ट्रेलियाला पोहोचली की काय?