आयुष्याचे सार्थक

    दिनांक  13-Aug-2019 22:20:55
आयुष्याचे सार्थक कशात आहे? नुसते दिर्घायुषी जगण्यात आहे का? तर तसे नाही. आपले आयुष्य दिर्घ नव्हे तर कसे जगलो याला महत्व आहे. आयुष्याच्या संध्याकाळीही समाजभान जपत समाजासाठी कार्य करत राहणे यापेक्षा आयुष्याचे सार्थक काय हे सांगणारी सार्थक संस्था.

 

'मै त्रिबंध कट्टा' सर्वांच्या आयुष्यात असतो. वेगवेगळ्या वयामध्ये निरनिराळ्या पद्धतीने तो तयार होतो. शाळा, कॉलेज, कार्यालय, लोकल ट्रेन, सेवानिवृत्त झाल्यानंतरच्या अशा अनेक गु्रप्समधून मानव आपल्या जीवनाची वाटचाल करीत असतो. प्रत्येक व्यक्तीमध्ये एक लहान मूल लपलेले असते. जसे जसे वय वाढते तसतसे आपण त्या भावनेला व्यक्त होऊ देत नाही. या कट्ट्यावर मैत्रीबंधावर आम्ही त्या बालपणाला, त्या नटखटपणाला, खोडकरपणाला पूर्ण वाट करून दिली. तो सर्व आनंद अनुभवत असतो. प्रत्येकाला व्यक्त होण्याची संधी या ग्रुपमध्ये मिळते. परिपक्वतेबरोबर लाभलेलं हे दुसरं बालपण आम्ही पूर्णपणे अनुभवत असतो. आयुष्याची ही 'इनिंग' मजेत, आनंदात एकमेकांच्या सहकार्याने सोबतीने सांभाळण्याचा आमचा प्रयत्न आहे.

 

आमचा सकाळी ७.३० वाजता १५ ते ३० जणांचा गु्रप भागशाळा मैदान, डोंबिवली येथे जमतो. सर्वश्री नंदकुमार लेले, नंदकुमार लोहकरे, अशोकराव विजय, राजेंद्र कुलकर्णी, रवींद्र सराफ, रवि पिल्ले, देवीदास व दशरथ मोरे,पितांबरे, साळवी, मुकुंद जोशी, नितीन देशमुख, रवींद्र खानवेलकर, पुजारे, दिलीप कुलकर्णी, भास्कर पाटील, काशीद बंधू, लाड, रवि साळुंखे सकाळी ७.५० वाजताच्या दरम्यान भागशाळा मैदानात उपस्थित असतो. आम्ही सर्वजनमराठा मंदिर हॉल येथे ८ वाजल्यापासून ते ९.३० पर्यंत योगाभ्यास करतो.

 

आम्ही सर्व योगप्रवेश परीक्षा उत्तीर्ण झालो आहोत. आम्ही सवार्र्ंनी मिळून एकत्रितपणे ज्येष्ठ नागरिक योग मित्रमंडळ तीन वर्षांपूर्वी स्थापन केले. आम्ही डोंबिवलीच्या नववर्ष स्वागत यात्रेमध्ये भाग घेऊन योगाभ्यासाची प्रात्याक्षिके दाखवतो. याबद्दल गणेश मंदिर संस्थानने आमचा गौरवही केला आहे. या व्यतिरिक्त आम्ही नववर्ष स्वागत यात्रा आणि दीपावलीनिमित्त पहाटे सकाळी ५.३० वाजता भागशाळा मैदानात पणत्या लावून दीपोत्सव साजरा करतो.

 

दररोजच्या धकाधकतीतून जरा निवांतपणा मिळावा म्हणून आम्ही सहलीला जातो, पावसात भिजतो, हिरव्यागार झालेल्या निर्सगाच्या कुशीत फिरतो, चुलीवर शिजवलेल्या चविष्ट जेवणाचा आस्वाद घेतो. हे सगळेे करत असताना आमच्या कौटुंबिक जबाबदार्‍यादेखील समर्थपणे सांभाळत आहोत. आमच्या ग्रुपचे स्नेहबंध दिवसेंदिवस वृद्धिंगत होत आहेत. ते संबध आम्ही सातत्याने जपत असतो. यासाठी ग्रुपमधल्या सर्वांचे वाढदिवस साजरे करून तो दिवस आनंदात घालवतो.

 

जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीचा शेवट अटळ आहे, पण शेवट असला तरी आपण समाजाचे देणेकरी आहोत हे विसरता नये. आम्हाला स्वत:साठी जगायचं तर आहेच, पण समाजातील गरजवंताच्या मदतीसाठी काही कार्य करायला हवे. तर आपल्या जीवनाचे 'सार्थक' झाले असे वाटेल. या विचारातूनच आम्ही आमच्या परीने कार्य करत असतो किंबहुना हिच आमच्या दीर्घायुष्याची शिदोरी आहे.

 

- रवि साळुंखे (८८७९१०५२३९)