चिदंबरी रडगाणे...

    दिनांक  13-Aug-2019 20:03:27   '३७० कलमा'वरून देशात किती आगी लावता येतील, त्याचा खेळ चिदंबरम खेळत आहेत. या खेळात सुदैवाने कुणी सामील होताना दिसत नाहीत. तामिळनाडूचे मुख्यमंत्री पलानीस्वामी यांनी चिदंबरम यांना सणसणीत हाणली आहे.

 

पी. चिदंबरम हे काँग्रेसचे वरिष्ठ नेते आहेत. काँग्रेसचे सरकार असताना कधी अर्थमंत्री, कधी गृहमंत्री अशी महत्त्वाची खाती त्यांच्याकडे होती. सगळी हयात राजकारणात गेल्यामुळे काँग्रेसच्या राजकीय नेत्याकडे जे गुण-दोष असायला पाहिजेत, ते सर्व त्यांच्याकडे आहेत. सत्तेवर राहिल्यानंतर स्वकुटुंब कल्याण करण्यात त्यांनी कोणतीही कसूर ठेवलेली नाही. काँग्रेसचा सर्वोच्च नेता व्हायचे असेल तर हिंदुहिताची भूमिका घेऊन चालत नाही. जे कुणी हिंदुहिताची भूमिका घेतील त्यांच्यावर तुटून पडावे लागते. संघाची बदनामी करावी लागते, सावरकरांना कमी लेखावे लागते. आपणच मुसलमानांचे रक्षणकर्ते, पालक-मालक, सर्वकाही आहोत, या भूमिकेत कायम जगावे लागते. चिदंबरम तसे जगतात, म्हणून ते काँग्रेसचे सर्वोच्च नेते आहेत. समजा, उद्या त्यांनी या गोष्टी सोडल्या तर काँग्रेस त्यांना सोडून देईल.

 

घटनेचे 'कलम ३७०' अर्थहिन करून केंद्र सरकारने ऐतिहासिक पाऊल उचललेले आहे. हे पाऊल देशहिताचे आहे, सर्वांच्या कल्याणाचे आहे, काश्मीरच्या विकासातील अडसर दूर करणारे आहे, काश्मीरमधील घराणेशाही संपविणारे आहे, काश्मिरी पंडितांना पुन्हा आपल्या जन्मभूमीत घेऊन जाणारे आहे, असे चिदंबरम म्हणू शकत नाहीत. ज्या काँग्रेसचे त्यांनी दूध प्यायले आहे, त्या दुधाला जागून ' कलम ३७० ' हटविल्याबद्दल त्यांनी गळा काढलाच पाहिजे. राज्यसभेत या विधेयकावर चर्चा चालू असताना त्यांनी काश्मीरच्या विभाजनास विरोध केला. आज काश्मीरच्या बाबतीत जे होते आहे ते उद्या अन्य राज्यांच्या बाबतीतही केले जाईल, हाच विषय त्यांनी नंतर वेगवेगळ्या लेखातूनही मांडलेला आहे. बंगालमधून दार्जिलिंग वेगळा काढून केंद्रशासित प्रदेश केला जाऊ शकतो. तसेच पूर्वोत्तर राज्यांचेही होऊ शकते, असे ते म्हणतात.

 

सध्या चिदंबरम यांना अन्य काही कामधंदा नसल्यामुळे वर्तमानपत्रांतून त्यांचे लेखन चालू असते. 'इंडियन एक्सप्रेस' गटाच्या वर्तमानपत्रात त्यांचे लेख येतात. त्यांच्या लेखाच्या भाषांतरातील शेवटचा परिच्छेद असा आहे, "माझ्या मते जम्मू-काश्मीर हा स्थावर मालमत्तेचा किंवा जमिनीचा तुकडा आहे व तो आपल्या अधिपत्याखाली असला पाहिजे, एवढीच भाजपची भूमिका आहे. तेथील ७० लाख लोकांना काय वाटते याला भाजपच्या मते शून्य किंमत आहे. काश्मीरचा इतिहास, तेथील भाषा, संस्कृती, धर्म, संघर्ष हे भाजपच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे नाही. काश्मीरमध्ये अशी हजारो माणसे आहेत, ज्यांनी आधी फुटीरतावाद व हिंसाचाराला विरोध करतानाच हल्ली निषेधप्रदर्शनाचा व दगडफेकीचा मार्ग पत्करला.

 

ते 'स्वायत्तता' मागत होते. दुसरीकडे दहशतवादी तरुणांनी बंदुकाच उचलल्या होत्या. ज्यांनी आतापर्यंत संयम बाळगला ते जर या दुसर्‍या गटात म्हणजे दहशतवादी व भडकलेल्या तरुणांमध्ये येऊन सामील झाले, तर त्याइतके दुर्दैव असणार नाही." एवढ्यावरच चिदंबरम थांबले नाहीत, त्यांनी 'काश्मीर हिंदुबहुल असते तर '३७० रद्द केले नसते,' असे म्हटले. चिदंबरम महाशयांना हे माहीत नाही की, काश्मीर जर हिंदुबहुल असते, तर तिथल्या हिंदूंनी '३७०' कलमाची मागणीच केली नसती. भारतातून फुटून निघण्याची बतावणी हिंदू स्वप्नातही करू शकत नाही. भारत त्यांच्या दृष्टीने देवभूमी, ऋषिभूमी, तपोभूमी, कर्मभूमी, धर्मभूमी, सर्वकाही आहे. 'मी भारतात जन्मलो, भारतातच राहणार, भारतातच मरणार, माझा स्वर्ग मोक्ष सर्वकाही इथेच,' ही हिंदूंची मानसिकता असते. चिदंबरम, तुमची मानसिकता कोणती? ती सांगाल का? त्यासाठी जमल्यास खरडा एक आणखी एक लेख...

 

भारत स्वतंत्र झाल्यानंतर कुठल्याही राज्याने, अगदी तुमच्या तामिळनाडूनेदेखील वेगळ्या दर्जाची, वेगळेपणाची, विशेष सवलतीची मागणी केली नाही. 'जे सर्वांसाठी ते आमच्यासाठी,' हीच भारतातील सर्व राज्यांची मागणी होती. कालही होती आणि आजही आहे. काश्मीरची मानसिकता वेगळी बनविली गेली, 'आम्ही वेगळे आहोत, आमचा ध्वज वेगळा आहे, आम्हाला वेगळी राज्यघटना पाहिजे, आम्हाला आझादी पाहिजे,' या मागण्या काश्मीर खोर्‍यातील मुसलमानांच्या आहेत. त्या वाढविण्याचे काम पाकिस्तानने केले. त्याचे बीज रोवण्याचे काम काँग्रेसने केले आणि तिला खतपाणी घालण्याचे काम अब्दुल्ला आणि मुफ्ती परिवाराने केले. या भावना तशाच ठेवायला पाहिजेत, असे चिदंबरम यांचे मत असू शकते. कारण, ते काँग्रेसचे दूध प्यायले आहेत. परंतु, ते देशाचे मत नाही. देशाला जसा पंजाब, बिहार, ओडिशा, केरळ तसा काश्मीर पाहिजे. कुणालाही तिथे जाता आले पाहिजे, उद्योेग-व्यापार करता आला पाहिजे. मोदी शासनाने हे करून दाखविले. कारण, त्यांनी भारतमातेचे दूध प्राशन केलेले आहे.

 

हेच चिदंबरम तामिळ लोकांच्या भावना भडकविण्यासाठी म्हणाले,"जर केंद्र सरकारने काश्मीरप्रमाणे तामिळनाडूला केंद्रशासित प्रदेश केले तर सत्ताधारी एआयडीएमके पक्ष त्याचा विरोध करणार नाही." '३७० कलमा'वरून देशात किती आगी लावता येतील, त्याचा खेळ चिदंबरम खेळत आहेत. या खेळात सुदैवाने कुणी सामील होताना दिसत नाहीत. तामिळनाडूचे मुख्यमंत्री पलानीस्वामी यांनी चिदंबरम यांना सणसणीत हाणली आहे. ते म्हणाले की, "काँग्रेसचे ज्येष्ठ नेते चिदंबरम हे भूमीला भार झाले आहेत." त्यांना हे म्हणायचे आहे की, भूमीला भार झालेला माणूस पापीतला पापी माणूस असतो, हा झाला घरचा आहेर. पलानीस्वामी पुढे म्हणाले की, "दीर्घकाळ चिदंबरम केंद्रात मंत्री होते. परंतु, तामिळनाडूच्या जिव्हाळ्याच्या कावेरी प्रश्नावर त्यांनी कधी तोंड उघडले नाही. तामिळनाडूसाठी त्यांनी कोणत्या योजना आणल्या? तामिळनाडूच्या विकासात त्यांचे योगदान काय?" असे प्रश्न त्यांनी विचारले.

 

चिदंबरम यांच्या वक्तव्यावर भाजपचे नेते तुटून पडणे स्वाभाविक समजले पाहिजे, पण हा घरचा आहेर फारच सणसणीत आहे. चिदंबरम आणि त्यांच्या मुलावर पैसा हस्तांतरित करण्याच्या केसेस चालू आहेत. फेब्रुवारीमध्ये त्यांच्या मुलाला अटकही करण्यात आली होेती. केंद्रातील सत्ता गेल्यामुळे हे 'धंदे' सध्या बंद झाले आहेत. पहिल्या श्रेणीतील राजकीय नेते अनेक भानगडी करूनही सहीसलामत राहतात, चिदंबरम किती काळ सहीसलामत राहतात हे बघायचे. लालूप्रसाद यांना तुरुंगवास काही चुकवता आला नाही. तशीच वेळ आल्यास आमची केंद्र सरकारला विनंती राहील की, चिदंबरम यांना थंड हवेच्या काश्मीरमध्ये पाठवून द्यावे.

 

काँग्रेसच्या नेत्यांना परिस्थितीने दिलेले फटके समजत नाहीत. हे नेते असेच बडबडू लागले तर काँग्रेसचा र्‍हास फार वेगाने घडण्यापलीकडे काही होणार नाही. २०१४ साली देश बदलतो आहे, विशेष करून हिंदू समाज हजारो वर्षांच्या मोहनिद्रेतून जागा होत आहे. २०१९ साली या हिंदू समाजाने जगाला संदेश दिला की, २०१४ची माझी जागृती तात्कालिक नव्हती. मी आता पूर्ण जागा होत आहे. इतकी वर्षे म्हणजे जवळजवळ ७० वर्षे संघ आणि संघसंबंधित संस्था सोडून ३७० कलमावर कुणी काही बोलत नव्हते. लोकसभेत चर्चा होत नव्हती. आता हा विषय रिक्षा आणि टॅक्सीचालकापर्यंत पोहोचला आहे. अनेक सामान्य माणसे प्रवासात भेटतात. काश्मीरचा विषय निघाला की, ते मनमोकळेपणाने बोलतात, 'कलम ३७०' हटवून खूप चांगले काम केले आहे. मोदीच हे काम करू शकतात, त्यांचे अभिनंदन...!'

 

ही देशभावना आहे. चिदंबरम म्हणतात त्याप्रमाणे काश्मीरचा विषय जमिनीच्या तुकड्याचा नाही, काश्मीरचा विषय स्थावर मालमत्तेचा विषय नाही, हा मातृभूमीच्या पवित्र शिराचा विषय आहे. तो तुमच्यासाठी जमिनीचा तुकडा असेल, स्थावर मालमत्तेचा विषय असेल, आमच्यासारख्या कोट्यवधी भारतीयांसाठी तो चैतन्यदायी जननी, जन्मभूमी भारतमातेचा अविभाज्य भाग आहे. लडाखची भूमी जेव्हा चीनने हडप केली, तेव्हा पं. नेहरु लोकसभेत म्हणाले की, "या भूमीत गवताचे पातेदेखील उगवत नाही." आपल्या मातृभूमीविषयी अशी भावना व्यक्त करणार्या काँग्रेसचे दूध प्यायले असल्यामुळे जमिनीचा तुकडा, स्थावर मालमत्ता असले शब्द तुम्ही वापरणार, तुम्हाला काश्मिरातील मुसलमानांची आठवण होणार, काश्मिरातील हिंदूंची आठवण तुम्हाला जागेपणी होणार नाहीच, स्वप्नातदेखील होणार नाही. खरं म्हणजे हा हिंदू, तो मुसलमान हा विचारच चुकीचा आहे. आपण सर्व भारतवासी, भारतमातेची संतान हीच आपली ओळख, ती आम्हाला आहे, तुम्हाला होेणे या जन्मात तरी शक्य नाही.