'दि जंगल मॅन'

    दिनांक  13-Aug-2019 20:19:56


 


सोमवारीच 'मॅन व्हर्सेस वाईल्ड'च्या भागात पंतप्रधान नरेंद्र मोदींसह झळकलेला चेहरा म्हणजे बेअर ग्रील्स. परदेशात सुपरिचित, तर भारतात काहीशा अपरिचित असलेल्या बेअरच्या संघर्षमय जीवनाचा उलगडलेला हा जीवनपट...

 

जगात अशी काही माणसे आहेत जी स्वतःच्या जिद्दीच्या बळावर आव्हानांवर मात करतात आणि आयुष्य सार्थकी लावतात. 'मॅन व्हर्सेस वाईल्ड'या कार्यक्रमात झळकणारा बेअर ग्रील्स त्यांपैकीच एक. जीवनात आव्हानांचा सामना करत ध्येय गाठणारी माणसे आपण पाहिली आहेत. मात्र, आपले संपूर्ण जीवनच संघर्षमय करणार्‍या बेअर ग्रील्सच्या आयुष्याची कहाणीही अगदी निराळीच. बेअर ग्रील्सचा जन्म ७ जून, १९७४ साली उत्तर आयर्लंडमधील फिनी या गावात झाला. त्याचे मूळ नाव 'एडवर्ड मायकल ग्रील्स.' त्याच्या बहिणीने लहानपणी हे नाव त्याला दिले. मात्र, वन्यभागात धाडसाने आयुष्य जगत विविध पर्वतशिखरे गाठणार्‍या ग्रील्सला जगाने दिलेले 'बेअर ग्रील्स' हे नाव.

 

उत्तर आयर्लंड हा संपूर्ण बर्फाळ प्रदेश असून या भागात मानवी वस्ती फार तुरळक. वर्षाचे बाराही महिने या भागात काढणे फार कठीण. त्यामुळे लहानपणीच युनायटेड किंग्डममधील अनेक भागांत ग्रील्स कुटुंबीयांचे स्थलांतर होत राहिले. बेअर ग्रील्सचे वडील हे युनायटेड किंग्डममधील नौदलात कार्यरत होते. बेअर ग्रील्स हा शिक्षणात हुशार असला तरी वन्यभागांमध्ये जाऊन जगण्याची आवड त्याला अगदी लहानपणापासूनच होती. पर्वत चढणे, जंगलातील भटकंती आदी त्याचे हे छंद जोपासण्यासाठी वडिलांनी बेअरला सर्वतोपरी सहकार्य केले. त्यांनी बेअरला गिर्यारोहण आणि बोटिंगसारखे साहसी खेळ शिकवण्यास सुरुवात केली. त्याच्यामध्ये अशा साहसाची आवड रुजवण्यामध्ये या खेळांचा खूप मोठा वाटा आहे. वडिलांसोबत किनार्‍यावर बोटी बनवून खोल समुद्रात जाऊन विविध माशांची पाहणी करणे आदी प्रकार अगदी हौशीने तो लहानपणापासून करत असे.

 

त्यामुळे 'धाडसी प्रकार' हा त्याच्यासाठी नित्याचाच भाग झाला होता. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर बेअर महाविद्यालयीन शिक्षणासाठी लंडनला आला. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करतानाही त्याने विविध ठिकाणच्या जंगलात भटकंतीचा आस्वाद घेतला. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण होत नाही, तोच वयाच्या एकविसाव्या वर्षी बेअरची युनायटेड किंग्डममधील विशेष राखीव दलासाठी निवड झाली. सरकारी नोकरीत रुजू झाल्यानंतर बेअर केवळ युनायटेड किंग्डमपुरता मर्यादित न राहता संपूर्ण युरोपात भटकंती करू लागला. वयाची काही वर्षे बेअरने नोकरी केली. मात्र, नोकरीतील सुट्ट्यांचे गणित जमवून छंद जोपासणे फार अवघड होऊ लागले. युरोपानंतर आफ्रिका आणि आशिया खंडातील जंगलांत भटकंती करण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याने नोकरीतून निवृत्ती घेत एका स्थानिक वाहिनीसाठी काम करण्यास सुरुवात केली. मात्र, जगभर सैर करण्याची इच्छा बाळगणार्‍या बेअरने तातडीने जगभरात प्रसिद्ध असणार्‍या वाहिन्यांमध्ये काम करण्यासाठी प्रयत्न सुरू केले.

 

प्रवास तसा सोपा नव्हता. मात्र, एका वाहिनीने त्याच्यातील जिद्द पाहून त्याला आफ्रिकेतील जंगलात भटकंती करून व्हिडिओ तयार करण्याची संधी दिली. आधीपासूनच विविध ठिकाणी जंगल सफारी करण्यात तरबेज असणार्‍या बेअरने योग्यप्रकारे काम करत वरिष्ठांचा विश्वास संपादन केला. नद्या-नाल्यांमध्ये भर पाण्यातून जीवघेणा प्रवास करणे, वाटेतच आग पेटवून स्वयंपाक करणे, घनदाट जंगलात अनेक दिवस वास्तव्य करणे, प्राण्यांचे मांस कच्चेच खाणे आदी त्याचे कार्यक्रम दर्शकांच्या पसंतीस उतरले. लवकरच जगभरात त्याची नवी ओळख निर्माण झाली आणि 'एडवर्ड मायकल ग्रील्स' हा 'बेअर ग्रील्स' म्हणून सर्वत्र प्रसिद्धीस आला.

 

बेअर हे कार्यक्रम २००६ पासून सादर करत आहे. जंगलामध्ये राहण्याची वेळ आली, तर जीवंत राहण्यासाठी माणसाला नेमके काय करावे लागते आणि कठीण परिस्थितीमधून स्वतःची सुटका कशी करून घ्यायची, हे बेअर आपल्या कार्यक्रमांतून सांगतो. वाहिन्यांमधून जगभरात प्रसिद्ध होण्याआधी १९९६ साली केनिया येथे पॅराशूटमधून उडी मारताना बेअरला एकदा जीवघेणा अपघात झाला. मणक्यासह शरीरातील तीन हाडे तुटली. डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे यापुढे जंगलातील भटकंती त्याच्यासाठी फार अवघड होती. मात्र, बेअर यावर मात करत वर्षभरातच आपल्या पायांवर उभा राहिला. तो केवळ हिंडायला-फिरायला लागला नाही, तर त्याने नेपाळमध्ये गिर्यारोहणही केले. वयाच्या २४व्या वर्षी त्याने माऊंट एव्हरेस्टही सर केला. त्यानंतर २००० साली त्याने अजून एक धाडस केले.

 

थेम्स नदीत एका बाथटबमध्ये बसून ही नदी ओलांडण्याचे धाडस केले. त्याची ही यशोगाथा आजही जगात प्रचलित आहे. २००५ साली बेअर ग्रील्सने अजून एक विक्रम केला. जमिनीपासून तब्बल २५ हजार फूट उंचीवर हॉट एअर बलूनमध्ये त्याने जेवण केले. 'द ड्युक्स अवॉर्ड'साठी त्याने हे साहस केले. २००९ साली अंटार्क्टिकच्याच बर्फाळ प्रदेशात पॅरामोटार चालविण्याचा प्रयोग त्याने केला. मात्र, यावेळी बर्फाच्या वादळात त्याच्या खांद्याला गंभीर दुखापत झाली.

 

या दुखापतीमुळे बेअर पुन्हा काही काळ कार्यक्रमांपासून लांब राहिला. मात्र, पुन्हा जिद्दीने २०१० साली थंडीने गोठवणार्‍या अंटार्क्टिका सागराच्या वायव्य भागात एका उघड्या जहाजातून अडीच हजार मैलांचा प्रवास केला. २०११ साली त्याने 'सरव्हाईवल अकॅडमी' नावाचे पुस्तकही लिहिले. आतापर्यंत बेअरने विविध वाहिन्यांच्या कार्यक्रमात सहभाग घेतला असून अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांसारख्या दिग्गजांसोबत कार्यक्रम केलेले आहेत.

 

- रामचंद्र नाईक